esakal | सन्डे स्टार्टअप : बीडच्या तरुणाचे 'समजदार श्रीकांत' आता औरंगाबादेतून
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

आणेराव यांच्या 'समजदार श्रीकांत'ला पश्चिम महाराष्ट्रातून मोठी मागणी आहे. त्यांना आतापर्यंत १६३ यंत्रांची ऑर्डर मिळाली असून, या यंत्रांना शासनाची ४० टक्के सबसिडीदेखील लागू झाली आहे. 

सन्डे स्टार्टअप : बीडच्या तरुणाचे 'समजदार श्रीकांत' आता औरंगाबादेतून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : आपल्याला शेतकऱ्याला सुटाबुटात काम करताना पाहायचे आहे, असे म्हणणाऱ्या नामदेव आणेराव या तरुणाने एक चांगला स्टार्टअप सुरू केला आहे. शिकून दुसऱ्याकडे नोकरी करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, पिंपळनेर (ता. बीड) येथील या अल्पशिक्षित शेतकरीपुत्राने स्वतःचा कारखाना उभारण्याचा करिष्मा केला आहे. आणि आता औरंगाबादेत हा कारखाना लॉन्च होत आहे. 

'समजदार ऍग्रो इक्विपमेंट' या शेतकरी उत्पादन कारखान्याची सुरवात वर्षभरापूर्वी झाली. याची सुरवात झाली, ती एका प्रयोगातून. नामदेव आणेराव यांनी शेत नांगरणारे 'श्रीकांत' नावाचे यंत्र तयार केले आणि त्यावर तीन वर्षे प्रयोग केले. याचे त्यांनी 'पेटंट'ही मिळविले. आता हे यंत्र व्यावसायिक स्वरूपात तयार करण्यासाठी नामदेव आणेराव सज्ज आहेत.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

बैलजोडीच्या साहाय्याने जेवढी कामे एका शेतकऱ्याला करावी लागतात, तेवढीच कामे चारा-पाण्याच्या खर्चापेक्षा स्वस्तात करणारे यंत्र नामदेव आणेराव यांनी तयार केले आहे. वडील शेतात काम करीत असताना मनुष्यबळाअभावी थांबणाऱ्या कामातून ही संकल्पना आपल्याला सुचल्याचे नामदेव यांनी सांगितले. या कारखान्यात अनेक तरुणांना रोजगार मिळाला असून, गावातील हे तरुण आता हा कारखाना चालवतात. 

'मॅजिक'चा भक्कम पाठिंबा 

'सीएमआयए'च्या मराठवाडा ऍक्‍सिलरेटर फॉर ग्रोथ ऍण्ड इन्क्‍युबेशन कौन्सील (मॅजिक) या संस्थेने गेल्या चार वर्षांपासून या उद्योग उभारणीसाठी आणेराव यांना मदत केली आहे. संकल्पनेला बळ, आर्थिक रसद, कारखाना चालविण्याच्या तंत्राविषयीचे मार्गदर्शन मेंटॉर प्रसाद कोकीळ, सुनील रायठठ्ठा, मिलिंद कंक, आशिष गर्दे आदींनी त्यांना केले आहे. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

ग्राहकालाच केले भागीदार

ग्राहकाला भागिदारी देण्याचे काम नामदेव आणेराव यांनी केले. त्यांना कंपनीचे शेअर्स दिले आणि त्यातून पैसा उभा केला. यातून उभा राहिलेला पैसा घेऊन वेल्डिंगच्या कामात पारंगत असलेले नामदेव यांनी आपल्या कंपनीचे शेड उभे करून कामाची सुरवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी १३ यंत्रांची ऑर्डर पूर्ण केली आहे. 

शासनाची सबसिडीही लागू

आणेराव यांच्या 'समजदार श्रीकांत'ला पश्चिम महाराष्ट्रातून मोठी मागणी आहे. त्यांना आतापर्यंत १६३ यंत्रांची ऑर्डर मिळाली असून, या यंत्रांना शासनाची ४० टक्के सबसिडीदेखील लागू झाली आहे. 

औरंगाबादेत होणार जोडणी

बीडमधल्या आपल्या लहानशा गावात राहून ही ऑर्डर पूर्ण करणे आता शक्य होणार नाही. त्यामुळे हा कारखानाच आता औरंगाबादला हलवण्याचे काम सुरू आहे. तसेच ही ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी गुजरातच्या एका कंपनीची मदत घेतली जाणार आहे. यंत्राचे कास्टिंग आणि फोर्जिंग गुजरातमधील कंपनीकडून करून घेत औरंगाबादेत त्याची जोडणी करण्यात येणार असल्याचे नामदेव आणेराव यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.