(((ABD26J79986 हे चित्र वापरा ))))
---------------
निकृष्ट दर्जाच्या स्क्रीन गार्डवर बंदी
---
स्मार्टफोन स्क्रीन प्रोटेक्टरसाठी बीआयएसचे कडक नियम १ एप्रिलपासून होणार लागू
----------------
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. २२ ः स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या टेम्पर्ड ग्लास आणि स्क्रीन प्रोटेक्टरमुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२७ पासून बीआयएस नोंदणी नसलेल्या कोणत्याही स्क्रीन प्रोटेक्टरची विक्री, आयात किंवा उत्पादन करण्यावर देशात पूर्णपणे बंदी असणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) अंतर्गत मोबाईल स्क्रीन प्रोटेक्टरसाठी नवीन आणि अनिवार्य गुणवत्ता मानके अधिसूचित केली आहेत. सरकारने स्मार्टफोन स्क्रीन प्रोटेक्टरसाठी आयएस १९३४८:२०२५ (ग्लास स्क्रिन प्रोटेक्टर-स्पेसिफिकेशन) हे नवीन मानक अनिवार्य केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान वस्तूचा २०२१ च्या आदेशामध्ये सुधारणा करून नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता केवळ बीआयएस प्रमाणित स्क्रीन गार्डच बाजारात विकता येतील.
---
१ एप्रिल २०२७ पासून नियम देशभर लागू
उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांना नव्या मानकांनुसार उत्पादन करण्यासाठी आणि जुना साठा संपवण्यासाठी सरकारने पुरेसा वेळ दिला आहे. १ एप्रिल २०२७ पासून हे नियम देशभरात काटेकोरपणे लागू केले जातील. या तारखेनंतर विनानोंदणी किंवा निकृष्ट दर्जाचे स्क्रीन गार्ड विकताना आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-
ग्राहकांना काय फायदा होणार?
सध्या बाजारात ३०, ४०, ५० ते १०० रुपयांत मिळणारे अनेक टेम्पर्ड ग्लास सुरक्षिततेच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. अनेकदा स्क्रीन गार्ड सुरक्षित राहते आणि आतला मूळ डिस्प्ले फुटतो, ज्यामुळे ग्राहकांचे हजारो रुपयांचे नुकसान होते. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित स्क्रीन प्रोटेक्टर मिळतील, ज्यामुळे फोनच्या महागड्या डिस्प्लेचे खऱ्या अर्थाने संरक्षण होण्यास मदत होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
---------
कोणत्या बाबींची तपासणी होणार?
मजबुती आणि टिकाऊपणा : फोन पडल्यानंतर स्क्रीनला सुरक्षित ठेवण्यासाठी काचेची क्षमता.
जाडी आणि अचूक आकार : स्क्रीनच्या सेन्सर्स आणि टच रिस्पॉन्सवर परिणाम होणार नाही, अशी योग्य जाडी.
अँटी-शॅटर फिल्म ः काच फुटल्यास त्याचे बारीक तुकडे होऊन बोटांना इजा होऊ नये, यासाठी आवश्यक सुरक्षा स्तर.
ओलिओफोबिक कोटिंग : बोटांचे ठसे, तेलकट डाग आणि पाण्याचे थेंब रोखणाऱ्या कोटिंगची गुणवत्ता.
ऑप्टिकल क्लॅरिटी : स्क्रीनची दृश्यमानता (Display Clarity) आणि रंग स्पष्ट दिसण्याची क्षमता.