Chhatrapati Sambhajinagar : शहरात कायदा, नियम ‘बाटलीत’; ‘बुटलेगिंग’ने अवैध दारू विक्रीला बळ, विक्रेत्यांकडून पेट्या

शहरात वाइन शॉपचालक आणि अवैध दारू विक्रेते यांच्या मिलीभगतमधून अवैध दारूविक्रीला बळ मिळत आहे.
bootlegging illegal distribution of liquor at chhtrapati sambhajinagar crime
bootlegging illegal distribution of liquor at chhtrapati sambhajinagar crimeSakal

- विजय देऊळगावकर

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाइन शॉपचालक आणि अवैध दारू विक्रेते यांच्या मिलीभगतमधून अवैध दारूविक्रीला बळ मिळत आहे. याला विक्रेत्याच्या कोड भाषेत ‘बुटलेगिंग’ म्हटले जाते. दारूच्या अवैध धंद्यातील हा कोडवर्ड आहे.

दारू विक्रेते वाइन शॉपमधून अवैधरीत्या जो दारूचा साठा उचलतात, त्यासाठी हा शब्द वापरला जातो. विशेष म्हणजे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळे हा प्रकार खुलेआम सुरू आहे.

शहरातील विविध भागांत देशी-विदेशी दारू मद्यपींना सहज उपलब्ध होते. मात्र, ही अवैध दारू विक्रेत्यांकडे पोचते तरी कशी, याबाबत ‘सकाळ’ने या व्यवसायात असलेल्यांची साखळी शोधण्याचा प्रयत्न केला.

यासाठी खोलात जाऊन माहिती घेतली. यात अवैध दारू विक्रेत्यांकडे दारूचा लागेल तेवढा साठा उपलब्ध असतो. नेहमीच्या मद्यपीला हे अवैध विक्रेते पूर्णपणे माहीत आहेत. या अवैध विक्रेत्यांकडे बुटलेगिंगद्वारे हा साठा प्राप्त होत असल्याची माहिती समोर आली.

‘गुर्गे’ पोचवतात दारू

बुटलेगिंग हा साधारणपणे स्मगलिंग किंवा अवैध वस्तू मिळविण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. दारूच्या धंद्यात शहरात हा शब्द प्रचलित आहे. यामध्ये वाइन शॉपवरून अवैध विक्रेते दारूचे बॉक्सचे बॉक्स दारू उचलतात.

या दारूची नंतर शहरातील स्लम एरिया, ढाबे, मटण खाणावळ येथे विक्री करण्यात येते. यासाठी वाइन शॉपचालकांनीच त्यांचे पंटर या कामासाठी नेमले. कोडवर्डमध्ये त्यांना ‘गुर्गे’ हा शब्द वापरण्यात येतो. या गुर्ग्याची जबाबदारी दारूच्या दुकानातून साठा उचलून अवैध विक्रेता सांगेल त्या ठिकाणी माल पोचवणे आणि नंतर मालाची रक्कम घेणे अशी आहे.

पाच रुपयांनी स्वस्त

देशी-विदेशी दारूचे विक्रेते बुटलेगिंगमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध विक्रेत्यांना मालाची विक्री करतात. यामध्ये एमआरपीपेक्षा पाच रुपये कमी दराने हा माल विकला जातो. यामध्ये दारूचा सेल एकत्रितच मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाइन शॉपचालकाला याचा फायदाच होतो. जास्त विक्री होत असल्याने दारूनिर्मिती कंपन्यांचाही फायदा होतो, तो वेगळाच.

नियम काय सांगतो?

दारू विकत घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाचा मद्य पिण्याचा परवाना तपासून दारू विक्री करणे गरजेचे आहे. मात्र, कोणत्याच वाइन शॉपमध्ये असा परवाना मागितला जात नाही. दारू विक्रेते हे विकली गेलेली दारू त्यांच्याकडे रेकॉर्डला असलेल्या मोजक्याच परवान्यावर दाखवितात.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला याचे मासिक विवरण असलेले रजिस्टर देताना त्यात हा घोळ केला जातो. मात्र, एक्साइज विभागाचे वाइन शॉपचालकाशी नेहमीचे लागेबांधे असल्याने या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते.

हप्तेखोरीचा स्टँडर्ड रेट अडीच हजार

बुटलेगिंगच्या या धंद्यात पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हप्ते बांधलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये एका दुकानातून दरमहा अडीच हजार रुपये हा हप्त्याचा स्टँडर्ड रेट असल्याची माहिती या सूत्रांनी दिली.

वाइन शॉपमध्ये जाऊन कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. मात्र, दुकानाबाहेर अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करू शकतात. ही कारवाई होऊ नये म्हणूनही अवैध दारू विक्रेत्यांकडून सेटिंग लावण्यात येते.

एखाद्या अवैध दारू विक्रेत्याला जर शहरातील पैठणगेट, गुलमंडी भागातून बुटलेगिंगद्वारे दारूचा साठा मुकुंदवाडी भागात आणायचा असेल तर त्याला त्या मार्गावरील ज्या-ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दी लागतील, तेथील संबंधित कलेक्शन करणाऱ्याला ठरावीक रक्कम देणे अलिखित नियम असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

ड्राय डे पथ्यावर

शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवर सव्वाशे अवैध दारू विक्रेते आहेत. यामध्ये मुकुंदवाडी, आंबेडकरनगर, राजनगर, विश्रांतीनगर, जयभवानीनगर, गारखेडा, विटखेडा, मिसारवाडी, पिसादेवी, मसनतपूर, नारेगाव, ब्रिजवाडी, चिकलठाण्यातील काही भाग, भावसिंगपुरा, पडेगाव,

मिटमिटा, छावणी, बनेवाडी, राहुलनगर, हमालवाडा, कांचनवाडी, वाळूज एमआयडीसीतील काही भाग, रांजणगाव, जोगेश्वरी, वडगाव कोल्हाटी, देवळाई तसेच असे अनेक भाग आहेत, जेथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येते. ‘

गंदा है पर धंदा हैं’ म्हणत अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री करणारी मंडळी या व्यवसायात आहे. यात जी देशी दारूची बाटली अधिकृत दुकानात ७५ रुपयांना मिळते, तीच ब्लॅकमध्ये अवैध दारू विक्रेते १०० रुपयांना विक्री करतात. ‘ड्राय डे’च्या दिवशी तर गरजवंत पाहून ही बाटली १२५ रुपयांपर्यंत विकली जाते.

‘सकाळ’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची दखल पोलिस प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. ज्या-ज्या ठिकाणी उघड्यावर दारू पिण्याचे प्रकार घडत होते, त्या ठिकाणी कारवाईचे कडक आदेश देण्यात आले. सिडको बसस्थानकाजवळचा परिसर पूर्णपणे मोकळा करण्यात आला. या प्रकाराकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानेही लक्ष देणे गरजेचे आहे. ही कारवाई सुरूच राहील.

— नवनीत कॉवत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com