esakal | बौद्ध धम्माच्या पाऊलखुणांतून तथागतांच्या पदकमलांचे दर्शन 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

पुण्ण भिक्खू महाराष्ट्रातील ‘नालासोपारा’ पूर्वीचे सुप्पारक येथून संपूर्ण महाराष्ट्रभर बुद्ध विचारांचा प्रसार करतात. आजही नालासोपारा येथे पूज्य भिक्खुंच्या स्मरणार्थ निर्माण केलेला स्तूप अस्तित्वात आहे. 

बौद्ध धम्माच्या पाऊलखुणांतून तथागतांच्या पदकमलांचे दर्शन 

sakal_logo
By
डॉ. भन्ते चंद्रबोधी

‘‘लेणी संकल्पनेच्या पाठीमागे सामाजिक व सांस्कृतिक संघर्ष आहे. ऐतिहासिक परंपरा आहे. केवळ स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर वैज्ञानिक भूमिकेतून दृष्टिक्षेप टाकल्यास आपणाला स्पष्टपणे प्रतिपादन करता येते, की लेण्या या राजाज्ञेच्या प्रेरणेतून आणि दानशुरांच्या दानातून साकारल्या जाऊ लागल्या. ज्या ठिकाणी चैत्य किंवा विहार बांधणे शक्य नाही, तेथे लेण्या कोरल्या जाऊ लागल्या. लेण्या सार्थवाह पदावर कोरल्या गेल्या. याचे कारण की, भारतदेशाला भेटी देणाऱ्या पर्यटकांना भगवान बुद्धांच्या धम्माचे दर्शन व्हावे हा उदात्त हेतू होता. जेव्हा कोणताही धर्म हा लोकधर्म होतो तेव्हा त्या धर्माचे सांस्कृतिक प्रतिबिंब चिरंतन गुणगान करण्यात येते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून लेण्या कोरल्या गेल्या.’’

महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार सर्वप्रथम पुण्णस्थवीर यांनी केला आहे. तसा उल्लेख बौद्ध साहित्यातील पाली त्रिपीटक ग्रंथातील ‘सुत्तपीटक’ या ग्रंथात ‘पुण्ण सुत्त’ यात आढळतो. या पुण्णसुत्तात महाराष्ट्राचे बुद्धकाळातील नाव ‘सुनापरांत’ असे आहे. पुण्ण भिक्खू हे तथागत बुद्धांना विनंती करतात की, मला माझ्या देशात जाऊन धम्माचा प्रसार करावयाचा आहे. मला परवानगी द्यावी. बुद्ध त्यांना परवानगी देतात. पुण्ण भिक्खू महाराष्ट्रातील ‘नालासोपारा’ पूर्वीचे सुप्पारक येथून संपूर्ण महाराष्ट्रभर बुद्ध विचारांचा प्रसार करतात. आजही नालासोपारा येथे पूज्य भिक्खुंच्या स्मरणार्थ निर्माण केलेला स्तूप अस्तित्वात आहे. 

मूळ पाली त्रिपीटकात बुद्धकाळातील महाराष्ट्राची नाळ जोडणारा पतिठ्ठाण म्हणजे आजचे पैठण येथील गोदावरीच्या तीराजवळील बावरी ब्राह्मण यांचा संदर्भ आढळतो. बावरी ब्राह्मण यांना वार्ता समजते की, बुद्ध जन्माला आले आहेत. बावरी ३२ शुभलक्षणे व ८४ उपलक्षणांचे जाणकार असतात. ते त्यांच्या सात शिष्यांना बुद्धामध्ये ३२ शुभ लक्षण आणि ८४ उपलक्षणे आहेत का? हे जाणण्यासाठी बिहारच्या श्रावस्ती नगरीला पाठवतात. त्यांचे सातही शिष्य बुद्धांची सुमधुर धम्मवाणी श्रवण करून तिथेच बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन बौद्ध भिक्खू होतात ते काही परत येत नाहीत, यामुळे स्वत: बावरी श्रावस्तीला जातात. बुद्धांचे ३२ शुभ लक्षणे आणि ८४ उपलक्षणे ओळखतात. या शुभ लक्षणांनी व उपलक्षणांनी परिपूर्ण महापुरूषच बुद्ध आहेत. त्यांना पटते की जगात बुद्धांचा जन्म झाला आहे. ते बुद्ध वाणी श्रवण करतात आणि तथागत भगवान बुद्धांकडून प्रवज्जा ग्रहण करतात. 

बाबासाहेब करायचे योगा, त्यांच्या या पाच गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का...

तिसरा संदर्भ येतो सुप्रसिद्ध व अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या तिसऱ्या धम्म संगतीमध्ये की, ज्यामुळे बौद्ध धर्म जगामध्ये प्रसार होण्यास मदत झाली होती व बौद्ध धर्म भारताचा राष्ट्रधर्म झाला होता. सम्राट अशोकने तिसऱ्या धम्म संगतीचे आयोजन केले होते. यामधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, दहा देशामध्ये अर्हंत भिक्खुंना धम्मप्रचारार्थ पाठविले होते. महाराष्ट्रात महादेवस्थवीर व धम्मरक्षीत स्थवीर यांना पाठविले हेते. ८४ हजार धर्मस्कंदाला अनुसरून ८४ हजार स्तूप, चैत्य, विहार व लेण्यांची निर्मिती सम्राट अशोकने केली. जवळपास २ हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत. 

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार बौद्ध भिक्खु संघाद्वारे केला जात असे आणि आजही केला जात आहे. वर्षावासाच्या काळात आणि अन्य काळात भिक्खुंच्या निवासासाठी अध्ययन व अध्यापनासाठी तसेच धम्मोपदेशासाठी पूर्वी पर्वतांच्या कडेकपारीचा उपयोग करीत होते. परंतु, जसजशी भिक्खु आणि उपासक यांची संख्या वाढली तसतशी ही निसर्गनिर्मित स्थाने कमी पडू लागली तेव्हा त्या कडेकपारी पोखरून त्यांचा विस्तार करण्यात आला. नंतर त्याचाच विकास करून सर्व सुखसोईंनी युक्त अशा लेण्यांमध्येच विहार, चैत्य, स्तूप, श्रृंगार, जातककथांची चित्रमालिका, बुद्ध जन्म व तत्त्वज्ञानाशी संबंधित चित्र, शिल्पपट कोरण्यात आले. चिनी प्रवाशांच्या वर्णनावरून भारतामध्ये पाच हजार लेण्या असल्याची माहिती मिळते. 

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार उर्दूतून

औरंगाबाद जिल्ह्यातील पितळखोरा लेणी ही पैठणच्या एका उपासिकेने दान दिल्याचा शिलालेख ब्राह्मी भाषेत आहे. औरंगाबाद लेणीचा दान शिलालेख काण्हेरी लेणीत कोरून ठेवला आहे. महाराष्ट्रामध्ये नालासोपारा स्तूप, एलीफंटा लेणी, काण्हेरी-लेणी, पुण्याजवळील कार्लेभाजे व जुन्नर लेणी, नाशिकच्या त्रिरश्‍मी लेणी, इगतपुरीच्या लेणी, वेरूळ लेणी, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, घटोत्कच लेणी, पूर्वीच्या भोगवर्धन व आत्ताच्या भोकरदन येथील लेणी असा अनेक लेणी समूह पूर्वीच्या रेशीम राजमार्गावर (सिल्क रूटवर) कोरून ठेवण्यात आलेला आहे. 

ह्युएनत्संग व फाहियान या चिनी बौद्ध भिक्खू महाराष्ट्रात येऊन गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात येथे बौद्ध धम्माच्या तत्कालीन स्थितीचे विस्ताराने वर्णन केले आहे. अनेक स्तूप, विहार, लेण्या, संघाराम यांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. पैठणला बुद्धांचे खूप विशाल स्तूप त्यांनी पाहिले होते. बौद्ध धम्माच्या पाऊलखुणा आजही लेणी, स्तूप, विहार, चैत्य, संघाराम याद्वारे दिसून येत आहेत. हजारो वर्षांपूर्वीच्या बुद्धांच्या पदकमलाचे दर्शन या पाऊलखुणांच्या माध्यमातून आपल्याला होत आहे. या पाऊलखुणा आणखी हजारो वर्षे टिकून राहतील या दृष्टीने त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे ठरेल. 

loading image