esakal | औरंगाबादेत कचऱ्यात जिवंत काडतुसे आढळल्याने उडाली खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

औरंगाबादेत कचऱ्यात जिवंत काडतुसे आढळल्याने उडाली खळबळ

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: रस्त्यालगत पडलेल्या कचऱ्यातील कॅरीबॅगमध्ये जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार जालना रस्त्यालगतच्या संत एकनाथ हाऊसिंग सोसायटीजवळ गुरुवारी (ता.२९) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. साफसफाईचे काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती तात्काळ जिन्सी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी पथकासह धाव घेत पॉईंट (.२२) चे १३ आणि बारा बोरच्या बंदुकीचे दोन काडतुसे जप्त केली.

संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात जुलैच्या प्रारंभीच कुरियरने आलेला मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला होता. यामध्ये सुमारे ५३ तलवारी, कुकरी, गुप्ती अशी घातक शस्त्रे होती. तर नारेगाव येथील कचरा डेपोत काही वर्षांपूर्वी जिलेटीनच्या कांड्या आढळल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी सकाळी महापालिकेचे सफाई कामगार हे नेहमीप्रमाणे रस्त्यालगत पडलेला कचरा उचलण्याचे काम करत होते. जालना रोडवरील आकाशवाणी समोरील संत एकनाथ हाऊसिंग सोसायटीजवळ एकाजागी सकाळी नऊच्या सुमारास कचऱ्यात कॅरीबॅग पडलेली सफाई कामगाराला दिसली. त्याने ती उघडून पहिली असता त्यात त्याला काडतुसे दिसून आली.

हेही वाचा: बीडमध्ये दुचाकींचा भीषण अपघात; दोन जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

घाबरलेल्या कर्मचाऱ्याने याची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली. तेथून जिन्सी पोलिसांना याची तात्काळ माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कॅरीबॅगमधील पॉईंट (.२२) चे १३ काडतुसे आणि बारा बोरच्या बंदुकीची दोन काडतुसे जप्त केली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक साईनाथ गीते हे करत आहेत.

loading image
go to top