गॅस पाइपलाइनचा उद्योगांनाही लाभ; हरदीपसिंह पुरी

हरदीपसिंह पुरी : चार हजार कोटींच्या योजनेचे औरंगाबादेत भूमिपूजन
Hardeep singh puri
Hardeep singh purisakal

औरंगाबाद : केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या माध्यमातून आगामी काळात प्रत्येक घरात पाइपलाइनद्वारे गॅस देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याअंतर्गत मराठवाड्याच्या विकासासाठी औरंगाबादेतील ही पीएनजी गॅस पाइपलाइन योजना महत्त्वाची ठरणार आहे. ऑटोमोबाइलचे हब असलेल्या या शहराच्या औद्योगिक क्षेत्रालाही याचा लाभ होणार आहे. नव्याने येणाऱ्या उद्योगांना गॅस पाइपलाइन गरजेची असते. यामुळे या उद्योगांची ही अटही आता पूर्ण होणार आहे. योजनेच्या माध्यमातून जवळपास चार हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम व गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी (ता.२) सांगितले.

सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी हरदीपसिंग पुरी ऑनलाइन सहभागी झाले होते. आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, प्रशांत बंब, शहराध्यक्ष संजय केणेकर, अनिल मकरिये, बसवराज मंगरुळे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलिस अधीक्षक निमित गोयल, राजू शिंदे, समीर राजूरकर, जालिंदर शेंडगे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बीपीसीएलचे सीडीएम अरुण सिंग, कार्यकारी संचालक पी. एस. रवी, कार्यकारी संचालक सुखमल जैन, अमित मीना यांची उपस्थिती होती.

केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले, की शहरातील ७ लाख ८ हजार लोकांना गॅस जोडणी देणार आहोत. यात ४ हजार ५०० औद्योगिक जोडण्या असून यातून जवळपास चार हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. याचा फायदा रोजगार निर्मिती, हॉटेल, खाद्य उद्योग, धातू उद्योगांना होणार आहे. यासह १०० हून अधिक नवीन स्टेशन सुरू करण्याचे नियोजन आहे.

डिसेंबरमध्ये मिळणार गॅस जोडणी ः कराड

शहरवासीयांना डिसेंबरपर्यंत गॅस कनेक्शन मिळेल. हा गॅस एलपीजीपेक्षा ३० टक्क्यांनी स्वस्त असेल. उद्योग क्षेत्राला अधिक चालना देणारा हा प्रकल्प ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यातील सत्ताधारी ५५ किलोमीटरहून शहराला लवकर पाणी आणू शकत नाहीत, असा टोलाही श्री. कराड यांनी मारला. जॅकवेलच्या कामासाठी अद्याप परवानगी घेतली नाही. राष्ट्रीय महामार्गालगत पाइप टाकण्याच्या कामासाठी आवश्यक ते शुल्क राज्य सरकार भरत नसल्याचा आरोप डॉ. भागवत कराड यांनी केला. स्मार्ट सिटीतून अनेक कामे झाली. अखंड उड्डाणपुलासह मेट्रो लाइनसाठी प्रयत्न, विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा आणि इमिग्रेशनचा दर्जा आणि कार्गो सेवा सुरू केल्या जाणार आहेत, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.

मनमाड-नांदेडच्या विद्युतीकरणाचे लवकरच लोकार्पण ः दानवे

सुवर्णमहोत्सवी वर्षात गॅसची पाइपलाइन येत असून औरंगाबाद शहराच्या विकासाला चालना देणारी ठरणार असल्याचे श्री. दानवे यांनी सांगितले. मनमाड-नांदेड रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणासाठी गेल्या २५ वर्षांपासून मागणी करत होतो. या कामाचे उद्‍घाटन पुढील आठवड्यात जालन्यात करणार असून हे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार आहे. रेल्वे दुहेरीकरणासाठी साडेचार हजार कोटी रुपये खर्च करीत सर्व्हेचे काम सुरू केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

माजी खासदार घेताहेत कोणत्याही कामाचे श्रेय

मी नगरसेवक होतो तेव्हा तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियममंत्री सुरजितसिंग बर्नाला यांना पत्र दिले होते, त्यामुळे आज ही पाइपलाइन आली, असे शहरातील माजी खासदार सांगतात. एवढेच नव्हे, तर मी पुण्यासाठी रेल्वे सुरू केली. पुण्यासाठीची ही रेल्वे ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना मीच मागणी केली होती, असेही माजी खासदार सांगत असल्याचा टोला रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लगावला. तर माजी खासदारांनी वीस वर्षांत एकही योजना आणली नाही, समांतरची योजना त्या खासदारांनी पाठीवरून उतरूच दिली नसल्याचा टोला आमदार हरिभाऊ बागडेंनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com