Chh. Sambhaji Nagar Crime : भांडण दोन कुटुंबांत; खून झालेला अन् खून करणारे दुसरेच, खुनाने हादरले पुंडलिकनगर

जुन्या भांडणातून हा खून झाल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली
chhatrapati sambhaji nagar crime dispute between two family leads to murder
chhatrapati sambhaji nagar crime dispute between two family leads to murderEsakal

छत्रपती संभाजीनगर : एकाच गल्लीत आजूबाजूलाच राहणाऱ्या दोन कुटुंबीयांमध्ये भांडण सुरू असताना तिथे गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. विशेष म्‍हणजे, भांडण करणारे शेजारी वेगळे आणि खून झालेला व खून करणारे हे दुसरेच आहेत! जुन्या भांडणातून हा खून झाल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ही खळबळजनक घटना सहा नोव्हेंबरच्या रात्री पुंडलिकनगरातील गुरुदत्तनगर, गल्ली क्र. दोनमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी रात्रभर ‘सर्च ऑपरेशन’ राबवून पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

गणेश मारुती राऊत (वय २८, रा. गुरुदत्तनगर, साईमंदिर कमानीच्या बाजूला, गारखेडा परिसर) असे मृताचे नाव आहे. मृत गणेशची आई पूजा मारुती राऊत (५५) यांच्या फिर्यादीवरून सागर विक्रम केसभट (पाटील, २५), अमृता कमलाकर दीक्षित (२२), नीलेश कमलाकर दीक्षित (२४), गिरिजा कमलाकर दीक्षित (५०, सर्व रा. गल्ली क्र. २, गुरुदत्तनगर, शिवाजीनगरजवळ) आणि सागर याचा साथीदार शुभम मदन राठोड (रा. भारतनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

रात्री नेमके काय घडले?

फिर्यादीनुसार मृत गणेश हा प्रीती राहुल मुळे (३२) यांच्या ओळखीचा होता. प्रीती मुळे आणि आरोपी गिरिजा दीक्षित या समोरासमोर राहतात. त्यांच्यात नेहमी खरकटे पाणी, कचरा टाकण्यावरून वाद होत. सहा नोव्हेंबरच्या सकाळीच दोन्ही कुटुंबांत वाद झाला होता. तो वाद शमला नव्हता.

पुन्हा रात्री पावणे अकरादम्यान दीक्षित कुटुंबीय आणि प्रीती मुळे यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू झाले. त्याचवेळी प्रीती यांनी ओळखीतील गणेश राऊत याला फोन करून बोलावून घेतले, तर आरोपी गिरिजाची मुलगी आरोपी अमृता हिनेदेखील आरोपी सागर केसभटला बोलावून घेतले. त्यानंतर झालेल्या वादात खुनाचा प्रकार घेडला.

निर्घृण करून तो झाला शांत

प्रीती यांच्या फोनवरून मागच्या गल्लीत राहणारा गणेश धावत आला, त्याने दीक्षित कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी दीक्षितांच्या बाजूने भांडणासाठी आलेल्या सागर केसभट आणि त्याचा मित्र शुभम राठोड यांनी गणेशला बेदम मारहाण सुरू केली. दीक्षित कुटुंबातील चौघांनीही गणेशला मारहाण केली.

सर्वांनी गणेशचे हातपाय धरून ठेवले तर राग अनावर झालेल्या सागरने गणेशच्या छातीत चाकूने भोसकून त्याचा क्रूरपणे खून केला. गर्दी होताच सर्वच आरोपी पसार झाले. भांडण, गर्दीचा आवाज ऐकून गणेशच्या घरातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मुलगा गणेश हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता.

कोण, कोणाचे कोण?

आरोपी सागर केसभट हा आरोपी अमृता दीक्षितच्या ओळखीचा आहे. मृत गणेश राऊत हा प्रीती मुळेंच्या ओळखीचा होता. मुळे अन् दीक्षित कुटुंबीयांच्या वादात त्यांनी या दोन्ही तरुणांना बोलावून घेतले खरे;

पण सागर आणि गणेश यांचा जुना वाद असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मृत गणेश हा चारचाकी, रिक्षा चालवत असे तर त्याच्या भावालाही कंपनीत मदत करत असे. त्या भागात सर्वांच्या परिचयाचा असलेल्या गणेशबद्दल सागरच्या मनात याबद्दल कटुता असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील करीत आहेत.

सागर रेकॉर्डवरील गुन्हेगार

आरोपी सागर हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरोधात जिन्सी पोलिसात मारामारीचा गुन्हा दाखल आहे, तसेच त्याचा मित्र शुभम राठोड याच्यावरही जवाहरनगर, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात मारामारी तसेच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

आरोपी अमृता ही उच्चशिक्षित आहे, अशी माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली. ही कारवाई निरीक्षक राजेश यादव, सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक कल्याण शेळके, अंमलदार सुनील म्हस्के, गणेश डोईफोडे, संदीप बीडकर, दीपक देशमुख, कल्याण निकम, प्रशांत नरवडे, अजय कांबळे यांच्या पथकाने केली.

सागरच्या वडिलाने जाळले होते आईला!

आरोपी सागर याचे वडील विठ्ठल केसभट हे पत्नीच्या (सागरची आई) चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असत. एक दिवस पत्नीसोबत कडाक्याची भांडणे झाल्यानंतर विठ्ठल केसभटने २०१० मध्ये सातारा परिसरातील डोंगराळ भागात मोकळ्या मैदानात पत्नीला नेत तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते.

तेव्हापासून आरोपी पिता विठ्ठल हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यावेळेस सागरची लहान बहिण ही कडेवर बसण्याच्या वयाची होती. तेव्हापासून सागरला मावशी लक्ष्मीबाई यांनी सांभाळले होते. मात्र, काही वर्षांपासून सागर हा गुन्हेगारी स्वरुपाच्या मित्रांसोबत राहिल्याने तो रेकॉर्डवरील गुन्हेगार बनला.

मावशीला पाहताच लागला रडायला

सागरला तीन बहिणी आहेत. त्यापैकी दोन बहिणींची लग्ने झालेली असून एक अविवाहित आहे. सागर आणि त्याचा साथीदार आरोपी शुभम हे दोघेही पुंडलिकनगरातील एका पेट्रोल पंपावर काम करत असत.

आरोपी सागरला अटक केल्याची माहिती दिल्यानंतर त्याची मावशी लक्ष्मीबाई यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सागरला मावशी लक्ष्मीबाई यांनीच लहानाचे मोठे केले आहे. त्यामुळे मावशीलाच तो मम्मी म्हणत असे. मावशीला पोलिस ठाण्यात पाहताच त्याने मम्मे आली तू? म्हणत मावशीचे पाय धरले.

आठशे रुपयांत घेतल्या नशेच्या सहा गोळ्या

सागरला अटक करुन पोलिस ठाण्यात आणण्यात आले असता, पोलिस त्याची चौकशी करत होते. त्यादरम्यान त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे चार नशेच्या गोळ्या सापडल्या. त्याने पॅन्टच्या खिशाशिवाय इतर भागात लपवून ठेवल्या होत्या.

बायजीपुऱ्यातून एका तरुणाकडून आठशे रुपयांत सहा नशेच्या गोळ्या मिळाल्याचे सागरने पोलिसांना सांगितले. त्याने सकाळी आणि दुपारी नशेच्या दोन गोळ्या खाल्ल्या होत्या.

...तर गुन्ह्यातील चाकू देणार नाही

सागरला ठाण्यात आल्यानंतर एका खोली त्याला तर दुसऱ्या खोलीत दीक्षित कुटुंबीयांना ठेवण्यात आले होते. त्यावेळी आरोपी सागर हा या घटनेत अमृता हिला सोडून द्या, अशी विनवणी करत होता. मात्र तिच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगताच तिला सोडून द्या अन्यथा मी गुन्ह्यातील चाकू, इतर साहित्य देणार नाही, असे तो म्हणत होता. तेव्हाही तो नशेत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com