Chh. Sambhajinagar Drugs Case : देशातील तिसरे मोठे ड्रग्ज हब छत्रपती संभाजीनगर

कोकेनसाठी कच्चा माल थेट साउथ अमेरिकेतून; तपास अधिकाऱ्यांनी कंपनीत कामगार बनून काढली माहिती
chhatrapati sambhaji nagar drugs case 3rd hub of drug dealers officer police cocaine ketamine and MD drugs
chhatrapati sambhaji nagar drugs case 3rd hub of drug dealers officer police cocaine ketamine and MD drugsesakal

- विजय देऊळगावकर

छत्रपती संभाजीनगर : गुजरात पोलिसांची अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी शहरात छापा टाकून कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्जची निर्मिती करणाऱ्या दोन कारखान्यांवर कारवाई केली. यासाठीचा कच्चा माल हा थेट साउथ अमेरिकेतून येत होता.

गंभीर बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे देशातील एमडी ड्रग्जची बनवणारे तिसरे महत्त्वाचे हब असल्याचेही या तपासातून समोर आल्याची गोपनीय माहिती तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

अहमदाबाद गुन्हे शाखा आणी डीआरआयच्या पथकांनी शुक्रवारी पैठण एमआयडीसी येथील महालक्ष्मी इंड्रस्टीज आणि कांचनवाडी येथील एका आलिशान बंगल्यात छापा टाकला होता. यात २५० कोटी रुपयांचे ४४ किलो अमली पदार्थ, तसेच तो तयार करण्यासाठी असलेला २५० कोटी रुपयांच्या कच्च्या मालाचा साठा जप्त करण्यात आला.

यामध्ये आरोपी जितेशकुमार हिंहोरिया आणि संदीप कुमावत यांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर आरोपी जितेश याने बाथरूममध्ये जात खिडकीच्या काचेने गळ्याची आणि हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुसरा आरोपी संदीप पोलिसांच्या ताब्यात आहे.

अत्यंत गोपनीय पद्धतीने अहमदाबाद आणि डीआरआयने ही कारवाई केली. आद्यपही तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रडारवर असलेल्या काही फार्मा कंपन्यांचीदेखील चौकशी सुरू आहे. आणखी एका आरोपीला अटक होणार असल्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली.

राजस्थान, मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्र

या कारवाईबाबत तपास यंत्रणा पूर्णपणे गोपनीयता बाळगत आहे. तपास पथकातील काही अधिकारी आद्यपही शहरात ठाण मांडून आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात गुन्हे शाखेने तीन महिन्यांपूर्वी कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्जची १५ मोठी प्रकरणे उघडकीस आणली.

एकूण तीन राज्यांतील तीन वेगवेगळ्या शहरांतून हा ड्रग्सच्या व्यापार होत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. यामध्ये तपासात राजस्थान येथील संचोर शहर, मध्यप्रदेश येथील प्रतापगडचे कनेक्शन स्पष्ट झाले होते. गुजरात गुन्हे शाखेने पकडलेल्या प्रकरणांत पाच प्रकरण हे महाराष्ट्र राज्याशी संबंधित होते. मात्र, या मागील नेमके शहर शोधण्यास अडचण निर्माण होत होती.

दोन महिन्यांपासून जितेशवर पाळत

महाराष्ट्रातील ड्रग्ज माफियांवर गुजरात पोलिस लक्ष ठेवून होते. मात्र, या प्रकरणातील आरोपी संपर्कासाठी सोशल मीडियाचा वापर करीत होते. त्यामुळे माग काढणे अवघड होते. गुजरात गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ड्रग्सचा समूळ तपास करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर परवानगी मागितली. तपासासाठी डीआरआयची मदत घेण्यात आली.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील जितेश हिंहोरिया याच्याकडे संशयाची सुई वळली. मात्र, कोणताही पुरावा गुन्हे शाखेकडे नव्हता. दोन महिन्यांपूर्वी एक मोबाइल कॉल पोलिसांना ट्रेस झाला. पण, गुन्हे शाखेने घाई केली नाही.

दोन महिन्यांपासून पोलिस जितेशच्या मागावर होते. त्याचा तांत्रिक तपास सुरू असताना त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. जितेश एकदा मुंबईला जाऊन आला; तेव्हादेखील गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

२० लाख सोडले अन् संशय बळावला

जितेश याचा एका व्यक्तीसोबत २० लाख रुपयांचा व्यवहार होता. ही रक्कम त्याने समोरील व्यक्तीला सोडून दिली होती. ही माहिती तपास यंत्रणेला मिळाली. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिक बळावला. नंतर संयुक्त कारवाईत जितेश आणि संदीपला अटक करण्यात आली.

अधिकारी झाले कंपनी कामगार

अहमदाबाद गुन्हे शाखेचे पथक शहरात ६० दिवसांपासून ठाण मांडून होते. वेगवेगळ्या पातळीवर गुप्तपणे त्यांचा तपास सुरू होता. पैठण येथील महालक्ष्मी इंड्रस्टीज आणि वाळूज एमआयडीसी येथील एक कंपनी प्रामुख्याने रडारवर होती.

पोलिसांना या केमिकल कंपनीत नेमके काय सुरू आहे याचेही ठोस पुरावे जमा करायचे होते. त्या कंपनीत अहमदाबाद गुन्हे शाखेच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून काम केले, अशी माहिती तपास यंत्रणेतील वरिष्ठ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com