Marathwada : इस्लामी राज्यकर्ते, 72 चा दुष्काळ आणि जागतिकीकरण, हजार वर्षांची मराठवाड्याची बदलती खाद्यसंस्कृती

‘‘जगभरात कुठल्याही समाजातल्या खाद्यसंस्कृतीचा धांडोळा घेतला असता हेच दिसून येईल की, ती खाद्यसंस्कृती ही त्या त्या प्रदेशांतल्या अभिजनांची किंवा सत्ताधाऱ्यांची असते
 बदलती खाद्यसंस्कृती
बदलती खाद्यसंस्कृतीsakal

‘‘जगभरात कुठल्याही समाजातल्या खाद्यसंस्कृतीचा धांडोळा घेतला असता हेच दिसून येईल की, ती खाद्यसंस्कृती ही त्या त्या प्रदेशांतल्या अभिजनांची किंवा सत्ताधाऱ्यांची असते. त्यांच्याच खाद्यसंस्कृतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न इतर सामान्य लोक करत असतात. नाहीच जमलं तर, हाती असेल त्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न करत असतात. तत्कालीन मराठवाड्यातल्या शतकानुशतकांच्या खाद्यसंस्कृतीत ठळकपणे बदल झाले ते बाराव्या शतकानंतर; दक्षिणेकडे इस्लामी राज्यकर्ते यायला सुरवात झाली तेव्हा. त्यानंतर १९७२ सालचा दुष्काळ पडल्यावर आणि रंगीत दूरचित्रवाणीचा प्रसार व नव्वदच्या दशकातल्या भारताच्या आर्थिक धोरणात झालेल्या बदलानंतर.’’

शाहू पाटोळे

तशी ''मराठवाड्याची खाद्यसंस्कृती’ एकजीव म्हणावी अशी काही नव्हती वा आजही नाही. आजही बीडचा उत्तर भाग ते औरंगाबाद या भागात बाजरी महत्त्वाची; तर उस्मानाबाद-लातूरकडे पिवळी ज्वारी. पांढरी ज्वारी, जी रब्बीत घेतली जाते, तिचं स्थान प्रमुख. परभणीकडेही टाळकीची ज्वारी महत्त्वाची. म्हणून अद्यापही गावामध्ये कुणी “जेवला का?” असं विचारत नाही; तर, “खाल्ली का भाकर?”

असं विचारतात. बहात्तरच्या दुष्काळापर्यंत गहू आणि तांदूळ हे अन्नघटक प्रामुख्याने सणासुदीला किंवा पाव्हणेरावळे आल्यावर उपयोगात आणले जात असत. दुष्काळात धान्यटंचाईमुळे अमेरिकन गहू, मिलो, पामतेल, सातू हे अन्नघटक सर्वसामान्यांच्या आहारात अचानक अवतरले. त्यातले गहू आणि पामतेल आजही टिकून आहेत. मिलोच्या लाल भाकरी आणि सातूच्या हिरवट चिवट रोट्या दुष्काळाबरोबर आहारातून गेल्या.

बरबडा हे माळावर उगवणारं धान्य काही गरिबांनी जगण्यास्तव स्वीकारलं; तसंच ते लगेच सोडलंही! दुष्काळात अमेरिकन मका आला होता. पण त्याच्या भाकरी कालवणात कुस्करल्यावर आपोआप विरघळत आणि भाकरी टाकणारणीला त्याचं ताजं पीठसुद्धा वळणी येत नसे. म्हणून भाकरीस्तव ज्वारीला पर्याय म्हणून मका टिकू शकला नाही. कारण तो गृहिणीसाठी सोयीस्कर नव्हता, शिवाय चवही नव्हती.

१९७२ नंतरचे बदल

बहात्तरपूर्वी गव्हाचे पदार्थ म्हणजे चपात्या, पुरणपोळ्या, कधी रवा बनवणे, मैदा काढणे आणि कुरडया करणे इतकेच मर्यादित होते. रोजच्या आहारात गहू ही तशी चैन होती आणि बिनतेलाच्या चपात्या ही संकल्पना नव्हती. पण दुष्काळात ज्वारीला पर्याय म्हणून आलेला अमेरिकन गहू नित्य आहारात रूढ झाला आणि त्याच्या बिनतेलाच्या ‘दुष्काळी रोट्या’सुद्धा. सरबती आणि जोड गव्हाच्या नाजूक घडीच्या चपात्यांची जागा आडदांड जाड अशा रोट्यांनी घेतली. रोज तेलाचे लाड परवडणारे नव्हतेच मुळात.

तसंच घाण्यावरच्या आणि नंतरच्या, ऑइलमिलमधून येणाऱ्या, शेंगदाणा आणि करडी तेलाची जागा पामतेलाने घेतली, ती कायमची. बहात्तरपूर्वी मराठवाड्यात ‘सूर्यफूल’ हे पीक फक्त चित्रातून माहीत होतं. ‘कारळं’ हे पीक शेतकरी काकऱ्या-दोन काकऱ्या घेत असत, तेसुद्धा चटणी करण्यासाठी आणि खारात (लोणचे) वापरण्यासाठी. सूर्यफुलाला गावाकडे लोक ‘मोठा कारळा’ म्हणून संबोधत असत. त्याच्या बियांची चटणीसुद्धा सामान्यांमध्ये रूढ झाली. शेंगदाण्याच्या कुटाला पर्याय म्हणून मोठ्या कारळ्याची चटणी काही दिवस वापरात आली.

नंतर त्याचं तेल बाजारात आलं आणि आज ते ‘सनफ्लॉवर ऑइल’ म्हणून घेतलं जातं. तेच ‘सोयाबीन ऑइल’चं. नव्वदच्या दशकापर्यंत सोयाबीनचं तेल कुठं कुठं दिसू लागलं होतं. पण त्याचं पीक कसं असतं हे बहुतेकांना माहीत नव्हतं. आज सोयाबीनचं आहारातलं आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणातलं स्थान कायम झालं आहे. १९७० च्या दशकात संकरित ज्वारीच्या पैदाशीचे प्रयोग या भागात केले जाऊ लागले होते.

त्यात खरिपात घेतल्या जाऊ शकणाऱ्या ''एच -१ नाइन'' या ''हाब्रेट'', अर्थात हायब्रीड, ज्वारीचा समावेश होता. दुष्काळानंतर अशा प्रकारची पिकं रूढ झाली. त्याच्या भाकरी काळपट होतात. ज्यांना पांढरी ज्वारी खाणं परवडत नसे/नाही अशी कुटुंबं ही ज्वारी खात. या पिकांचा उपयोग व्यापारी पांढऱ्या ज्वारीत भेसळीसाठी करतात. किंवा पावसाने ती ज्वारी आणखी काळी पडल्यास ''मद्यार्क'' निर्मितीसाठी तिचा उपयोग होतो. दरम्यानच्या काळात ''मालदांडी'' नामक लालगोंडाळ ज्वारीची जात आली होती, ती का तगली नाही, काही माहीत नाही.

करडी...शेंगदाणा...अन् सोयाबीन तेल

बहात्तरच्या दुष्काळापर्यंत सामान्य माणसांसाठी स्वयंपाकात दररोज खाद्यतेल वापरणं ही चैन होती. तेलाला पर्याय म्हणून शेंगदाण्याचं कूट हेच प्रामुख्यानं वापरात होतं. तिळाच्या तेलालाच फक्त तेल म्हटलं जायचं, त्या तिळाची लागवड खरिपात शेतकरी फक्त गरजेपुरती करायचे. दिवाळीत तिळाच्या करंज्या, संक्रांतीला तिळाचे गोळे-अर्थात लाडू, तिळाच्या पोळ्या आणि चटणी, तर भोगीच्या दिवशी भाकरीला तीळ थापले जात.

बस्स! करडीचंपण तेच. ते काटेरी पीकपण शेतकरी सरसकट घेत नसत. त्याला कीड लागत नसली, तरी त्याची उगनीग जास्त होती. करडी ही गरजेपुरती घेत. करडीची रोपं लहान असताना त्याच्या कोवळ्या पानांची भाजी होई. नव्या करडीचा कुणी सुगरणी करड-खिचडा करत. करडीचं दूध काढून, नंतर करडी घाण्यावर नेऊन त्याचं तेल काढून आणत असत. शेंगदाण्याचा वापर मात्र सगळ्याच स्वयंपाक घरांमध्ये सर्रास होता.

त्याचंही तेल काढून आणत. दुष्काळग्रस्त ग्रामीण भागात दोनच तेलं माहीत होती - करडीचं आणि शेंगदाण्याचं. सणासुदीला किंवा एखाद्या भाजीला फोडणीचा चरका देण्यासाठी म्हणून, रुपया-दोन रुपयाचं किंवा आण्या-दोन आण्याचं तेल शिशीतून आणलं जायचं. दुष्काळाच्या निमित्ताने पामतेल आणि सोयाबीन तेलासारखा स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात तेल नित्याने दिसू लागलं

नव्याकडे वाटचाल

स्वातंत्र्यानंतरच्या वीसेक वर्षांमध्ये बहात्तरच्या दुष्काळापर्यंत मराठवाड्यातली खेडी संस्कृतीबरहुकूम सुस्तावलेली होती. शिक्षण होतं, शाळा होत्या, काही तुरळक हलक्यासलक्या सरकारी नोकऱ्या करणारे लोक होते; तरी ग्रामीण मूलभूत ‘अहिष्णूपणा’ तगून होता. मग दुष्काळ पडला. धनधान्याची टंचाई झाली. रोजगार हमी, खडी केंद्र, नाला बंडिंगची कामं, पाझर तलाव, साठवण तलाव यांची कामं सरकारी पातळीवर सुरू झाली.

अगोदर सर्व जाती-धर्मांचे गरीब या कामांवर रुजू झाले. हाती चार पैसे - नोटा - पहिल्यांदा प्रत्यक्षात दिसू लागल्या. सर्व जण एकाच रांगेत उभे राहून एकाच प्रकारची सुकडी खाऊ लागले. कुणी उकळत्या पाण्यात सुकडी हालवून ‘इन्स्टंट’ (रेडी टू कुक) शिऱ्याचा स्वाद घेऊ लागले. मराठवाड्यातल्या कामगारांनी अशा प्रकारे पहिल्यांदाच ‘रेडी टू इट’ अशा स्वादाची चव घेतली.

पाण्याचे टँकर गावोगावी जाऊ लागल्याने सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकाच टँकरने आलेलं पाणी प्यावं लागलं. टँकरचं पाणी कुठून येतंय, त्यात पाणी भरणारा कोणत्या जातीचा, तो चालवणारा कोणत्या जातीचा, याची कुणीही विचारणा करेनासा झाला. तसंच सुकडी कुणी तयार केली, कशाची व कशापासून बनवली, वाटप करणारे कुण्या जाती-धर्माचे हेही कुणी तपासीनासं झालं. तेच परदेशातून आलेल्या गव्हाचं आणि मका, मिलोचं.

खडी केंद्रांवर आणि इतर कामांवर पाव आणि टोस्ट-खारी विकणारे सायकलिस्ट दिसू लागले. त्या निमित्ताने पावासाठी घरोघरी नित्य चहा तयार होऊ लागला आणि न्याहारीत चहा-पावाचे युग सुरू झाले.

फळे अन् भाज्या

बहात्तरच्या दुष्काळापर्यंत खेड्यांमधील खाद्यसंस्कृतीत गेल्या कित्येक शतकांपासूनचा बाज टिकून होता. रोख पैशाच्या वाढत्या चलनवलनाने पारंपरिक वस्तूंच्या खरेदीत वाढ झाली. शेतमजुरीसाठी प्रामुख्याने धान्याच्या स्वरूपांत मोबदला दिला जायचा, तो आता रोख रकमेच्या स्वरूपात दिला जाऊ लागला. आठवडे बाजारात मिळणारा खाऊ - शेव, भजे, जिलेबी, पेढा, गुडदाणी, गुडीशेव, बत्तासे, रेवड्या - इथंवरच मर्यादित होता. मुख्य फळ म्हणजे आंबे. मोसंबी ही आजारी माणसांसाठी. रामफळ, सीताफळ, जांब अर्थात पेरू, जांभळं, केळी, पपई (बायकांनी टाळलेलीच बरी हा गैरसमज होता) इतकीच फळं होती. भाज्या बहुतेककरून शिवारात आणि परिसरात ऋतूंप्रमाणे उपलब्ध होत.

भाज्यांमध्ये वांगी, शेवग्याच्या शेंगा, गवार, चुका, पालक, चाकवत, मेथी, शेपू, राजगिऱ्याची पानं, चिघळ किंवा बारका घोळ, भेंडी, हागऱ्या घोळ, चंदन-बटवा, सर्व प्रकारचे भोपळे, दोडका, पारुशी दोडका, कारलं, पडवळ, मुळ्याच्या शेंगा (डिंगऱ्या), पानं आणि मुळे, तांदूळकुंजीर (तांदुळजा).

भाजीसाठी हिरव्या मिरच्या आणि त्यांचं वाटण, ठेचा, खर्डा, वाळवलेल्या मिरच्यांची भुकटी किंवा चटणी. दाळीमध्ये प्रामुख्याने तूर, हरभरा, मूग, उडीद यांचा वापर व्हायचा. दाळी तयार करताना दाळगा, कळणा पडायचा, त्याचाही वापर व्हायचा. ज्वारीच्या पिठात कळणा मिसळून भाकरी केल्या जायच्या. हरभऱ्याची दाळ दळून घेऊन त्या पिठाचा वापर वेगवेगळ्या प्रकारची पिठली बनवण्यासाठी व्हायचा. हरभऱ्याच्या दाळीच्या पिठाच्या काही प्रकारच्या वड्या तयार केल्या जायच्या. ग्रामीण भागात दाळीची आमटी हाच पातळ कालवणाचा प्रकार सातत्याने व्हायचा.

प्रसंगोपात्त मोकळ्या - अर्थात सुक्या - भाज्या व्हायच्या. या भाज्या तयार करण्यासाठी तांबडं तिखट आणि हिरव्या मिरच्यांबरोबरच कांदे, लसूण, हळद, मीठ, कोतमीर (कोथिंबीर), शेंगदाण्याचं कूट, जिरं, मोहरी हे आवश्यक घटक होते. ‘येसूर’ - ज्याला हल्ली ‘काळामसाला’ - म्हणून संबोधलं जातं, तो प्रामुख्याने सामिष पदार्थांसाठी वापरत असत आणि येळवण्याच्या आमटीसाठी वापरत असत.

शेतावर कामाला न जाणाऱ्या गृहिणी निगुतीने वाळवणं घालत. त्यात प्रामुख्याने ज्वारीच्या पापड्या, कोंड्याच्या पापड्या, सांडगे, पापड, कुरवड्या असत. कुणी फळीवरच्या शेवया, बोटवं, नकुलं, फणुलं करून ठेवत. तोंडलावणीच्या चटण्यांमध्ये प्रामुख्याने जवसाची, कारळ्याची, आंबाडीच्या बियांची, तिळाची आणि शेंगदाण्याची चटणी असे. खार - अर्थात लोणचं - वर्षभराचं एकदाच करत असत, तेही फक्त आंब्याचं.

(कैरीचं लोणचं टिकत नाही. आंबा पाडाला आल्यावरच कच्च्या आंब्यांचा खार घातला जायचा.) गोडधोडाचं रोज केलं जात नसे. कधी गोडधोड केलंच; तर शेवया, बोटवं, नकुलं, फणुलं दुधात केलं जाई. शिवाय सांजा म्हणजे शिरा. गव्हाच्या पिठाचं आळण आणि पोळ्या (पोळी म्हणजे पुरणपोळीच) केल्या असतील, तर गुळवणी करावंच लागे. केळी आणि दूध असण्याचा योग आला, तर शिकरण व्हायचं. साखरेपेक्षा गूळ जास्त उपलब्ध असायचा.

सणवार

बहुतेक सणावारांना पुरणाच्या पोळ्या, येळवण्याची आमटी, कुरवड्या, केले तर भजे, गुळवणी आणि भात असायचाच. खाताना अगोदर गोड खायचं आणि नंतर तिखट, असा क्रम असायचा. आंब्यांच्या दिवसात रस केला जायचा (रस म्हणजे फक्त आंब्यांचाच). रसासोबत खाण्यासाठी प्रामुख्याने धिरडी होत. शेवयांचा किंवा बोटव्याचा भात, आणि सोबत चपाती किंवा भात केला जायचा. काही वेळा पुरणपोळ्याही केल्या जायच्या.

रसात गूळ आणि पाणी घातलं जायचं. काही घरांत यांसोबत कुरवड्यापण असत. आंबे भरपूर असतील तर कुणी ज्वारीची भाकरी आणि रस कुस्करून खात. दिवाळी या मुख्य सणाला सामान्यजन गऱ्याच्या करंज्या, तिळाच्या करंज्या करत. शेव पाडून त्याचे गोळे, अर्थात लाडू वळत; तर कुणी गऱ्याचे गोळे बनवत. अनारसे हा फॅशनेबल पदार्थ होता. शिवाय शेव, काटीकोंडबळी - अर्थात चकल्या, धपाटी,

कोंडबळी बनवत असत. येळअमावस्येला आणि म्हाळाच्या (पक्षपंधरवडा) दिवशी पाटवड्या व आंबील बने. कधी चिमकुऱ्याच्या वड्या तळत. शिवाय सुगीच्या दिवसांत शेंगदाण्याची पिठली होत. नव्या मुगाचे मूग-मिर्चू, दाळ-मिर्चू, रब्बीत हुरडा, हरभऱ्याचा हुळा, लोंब्या (ओंब्या) खाल्ल्या जात. साखर कारखान्यांच्या उभारणीने गुऱ्हाळांवर सक्तीने टाच आली.

खेड्यांमधील घराघरात भाकर-चपातीसोबत खाल्ला जाणारा पाक - अर्थात काकवी - आणि मळीचे सांडगे लुप्त झाले. बोरांच्या काळात बोरं खाल्ली जायची. गाजरं खाल्ली जायची. शेंदाडं, शेण्ण्या, वाळकं, काकडी खाल्ली जायची. रताळ्याचंपण तेच. उपवासाचे ठरलेले पदार्थ म्हणजे भगरीचा भात नाहीतर भाकरी, काशीफळ भोपळ्याची भाजी किंवा काशीफळ भोपळा शिजवून, रताळी शिजवून दूध आणि गुळासोबत कुस्करून खाणे. उपवासाला शेंगदाणे चालत. असली तर केळी. कुणी निरंकार उपवास करत, तर कुणी एकभुक्त राहत.

बदलांचा काळ

बहात्तरचा दुष्काळ गेला आणि त्यानंतर ग्रामीण भागातल्या अर्थचक्र आणि अर्थकारणाला वेगळी दिशा लाभली. त्यास असलेले भावनिक कंगोरे जाऊन आर्थिक कंगोरे येऊ लागले. दूरदर्शनचे अँटेने काही घरांवर दिसू लागले. इंदिरा गांधी गेल्या आणि रंगीत दूरचित्रवाणी संच आले. राजीव गांधी आले तेच सॅम पित्रोदांना घेऊन.

भारतीय अर्थव्यवस्थेने ‘डंकेल’चा डंका स्वीकारला आणि पारंपरिक भारतीय अर्थव्यवस्थेबरोबरच खाद्यसंस्कृतीतही बदल होत गेले. विविध सामाजिक स्तरांवरही या आर्थिक बदलाचे परिणाम ठळकपणे दिसू लागले. त्यास खाद्यसंस्कृती कशी अपवाद ठरेल? अर्थव्यवस्थेतल्या बदलांमुळे एकमेव सरकारी वाहिनी न राहता इतर खासगी दूरचित्रवाहिन्याही सुरू झाल्या. त्यांनी पारंपरिक जाहिराततंत्रास सुरुंग लावले आणि जाहिरातींबरोबरच जागतिक वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती थेट घराघरांत आदळू लागली.

हा माहितीचा झंझावात थांबवणं आता कोणत्याच रक्षकांच्या हाती नव्हतं. नवतरुणांच्या स्वप्नांच्या कक्षा भयंकर रुंदावल्या होत्या. सुरुवात झाली ती खडेमीठ जाऊन घराघरांत आयोडिनयुक्त बारीक मीठ येण्याने. विरंगुळा म्हणून दूरचित्रवाणी संचासमोर बसणारा महिला आणि पुरुषवर्ग आता त्याचा आधाशी चाहता झाला होता. ‘हॉटेल चालविणे हे क्षत्रियांचे काम नव्हे!’ असा दुराग्रही अभिमान बाळगणारे लोक बार, ढाबे चालवू लागले.

उखळात केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या चटण्या मशीनवर कुटून मिळू लागल्या. गृहिणीचे कष्ट वाचले होते. थोड्याच काळात मागाल त्या प्रकारची चटणी दुकानांमधून आयती मिळू लागली. पारंपरिक येसवराच्या कालवणाला आंबून-कंटाळून गेलेल्यांना, हॉटेलात मिळणारे पंजाबी, दाक्षिणात्य आणि कॉन्टिनेंटल पदार्थ आवडू लागले.

खेड्यांपर्यंत चायनीजच्या गाड्या पोचल्या. तसंही येसूर तयार करणे हे बायकांसाठी कष्टाचं काम होतं. मधल्या काळात बऱ्याच घरांमधून आयत्या येसराच्या पुड्या दिसू लागल्या. पण त्याला मूळ पारंपरिक चव नव्हती. अलीकडे ‘काळ्या मसाल्यातील पदार्थ मिळतील’ या पाट्या लावलेल्या हॉटेलांमध्ये शेाधण्याच्या प्रयत्नात गर्दी होऊ लागलीय.

रेडिमेडचा जमाना

गावांकडेसुद्धा आता लहान लहान दुकानांत सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांसाठी वापरता येणारे आयते मसाले मिळू लागलेत. आलं-लसणाचं वाटणसुद्धा मिळू लागलं आहे. खेड्यातली वाळवणंसुद्धा कमी झाली. श्रीखंड आणि आम्रखंड कशाला म्हणतात आणि कशाशी खातात हे माहीत नसलेल्या घराघरांतसुद्धा ते सहजपणे पोचलं आहे. आयत्या पदार्थांमुळे चवीसुद्धा जागतिकरीत्या एकजिनसी झाल्या.

मॅगीने तर त्यात आणखी खाद्यक्रांती केली. झटपट म्हणजे कल्पनातीत झटपट खाद्य गावागावात पोचलं. युरोप-अमेरिकेतली गोरी माणसं जे खातात ते इथंही मिळू लागलं. अवघ्या उण्यापुऱ्या पंधरा वर्षांत खाद्यसंस्कृती ही टीव्हीमय झाली. स्थानिक खाद्यसंस्कृतीवरील आक्रमणाने कंदुऱ्या, ढवारे, देवकार्य यांतल्या जेवणाची चव लुप्त होत चालल्याची खंत बाळगणाऱ्यांसाठी मग कंदुरी, ढवारा अशी हॉटेलं निघू लागली. असं जेवण, खाद्य त्यांना घरात दररोज नकोय. पण आपल्या खाद्यसंस्कृतीतला पारंपरिक ठेवा हरवत चालल्याची जाणीव स्थानिकांना आहे. ती त्यांना व्यक्त करता येत नाही इतकंच. म्हणून तर आज बहुतेकांना काळ्या तिखटातल्या भाज्यांचा सोस लागलेला आहे.

 बदलती खाद्यसंस्कृती
Chhatrapati Sambhaji Nagar : फुलंब्रीत पहिल्या महिला सभापतीपदी अनुराधा चव्हाण विराजमान

जगातल्या सगळ्याच बदलांबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, खाद्यसंस्कृतीतले बदल हे अपरिहार्य असतात. नव्वदनंतरचा त्यांचा वेग प्रचंड आहे. त्यास सर्व जाती-धर्मांतला तरुण सहजपणे सामोरा जाताना दिसतोय. पण त्यांच्या ‘पालक पिढीने’ फक्त तांत्रिकता स्वीकारलीय. ते सामाजिक बदल स्वीकारण्यास आजही तयार नाहीत. हा विकास फक्त तांत्रिक आहे.

ता. क.

बहात्तर आणि नव्वदनंतर इतकी आर्थिक आणि सामाजिक स्थित्यंतरं झालेली दिसत असली, तरी ग्रामीण भागातल्या सर्वजातीय मजुरांच्या जीवनमानात आणि खाद्यसंस्कृतीत थोडीफार चलबिचल झाली आहे. पण अजून हे बदल तितके मुळावर आलेले नाहीत. विहिरी आणि पाट जाऊन ठिबक सिंचन आलं आहे; ओढे-नद्या मृत होण्याच्या मार्गावर आहेत,

 बदलती खाद्यसंस्कृती
Chhatrapati Sambhaji Nagar : फुलंब्रीत पहिल्या महिला सभापतीपदी अनुराधा चव्हाण विराजमान

तिथे वाहत्या आणि पाझरणाऱ्या पाण्यावर आपोआप जीव धरणाऱ्या भाज्या कुठून आणि कशा येणार? दारिद्र्यरेषेच्या खालीवर घुटमळणारा एक मोठा मानवीसमूह याच संस्कृतीचा भाग आहे. आणि मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीमध्ये आजवर झालेले बदल हे सेंद्रिय होते. पण आता ते सेंद्रियच राहतील याची शाश्वती वाटत नाही. आता अनेक नवनवीन भाज्या आणि फळं बऱ्याच घरी दिसू लागलेली आहेत.

(लेखक खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक आणि संशोधक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com