
Chhatrapati sambhajinagar : वाहन परवान्यासह कागदपत्रेही डीजी लॉकरमध्ये सोबतच ठेवा
छत्रपती संभाजीनगर : विनापरवाना (अनुज्ञप्तीशिवाय) किंवा कागदपत्रांशिवाय वाहन चालवल्यास एकत्रित दंड दुचाकीच्या किमतीइतका किंवा त्याहून अधिक होऊ शकतो! आरटीओ कार्यालयात जप्त झालेले वाहन सोडवण्यास बहुतांश जण येत नाही, कारण दंडाची रक्कम भरून वाहन सोडवणे परवडतच नाही.
त्यामुळेच बाजारात जाताना दुचाकीवर गेले आणि येताना पायी किंवा रिक्षाने यावे लागले असे होऊ नये! म्हणून आता वाहन चालवाताना बिनधास्तपणा सोडा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यास सुरवात करा, कारण नवीन मोटार वाहन कायद्यानुसार दहा पट दंडाची तरतूद आहे.
काय आहेत तरतुदी?
वाहन चालवताना परवाना (अनुज्ञाप्ती) नसेल तर ५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा ३ महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा आहेत. दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा एक वर्षांची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
परवाना रद्द झालेला असतानाही वाहन चालवल्यास तब्बल १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकणार आहेत. अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास वाहनाच्या मालकाला दोषी ठरवले जाईल आणि २५ हजार रुपये दंडासोबत ३ वर्षांचा तुरुवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. शिवाय, वाहनाची नोंदणी एक वर्षासाठी रद्द केली जाईल. तसेच अल्पवयीन मुलगा २५ वर्षांचा होईपर्यंत त्याला वाहन परवाना दिला जाणार नाही.
दहापट दंडाची तरतूद
केंद्र सरकारने नव्या सुधारणांसह मोटार वाहन (सुधारणा) कायदा एक सप्टेंबर २०१९ पासून लागू केलेला आहे. मात्र जबर दंडाची तरतूद असल्याने जनप्रक्षोभ उफाळू शकतो, म्हणून अनेक राज्यांनी या कायद्याला सुरवातीच्या काळात स्थगिती दिली होती. तत्कालीन युतीच्या सरकारनेही महाराष्ट्रात स्थगिती दिलेली होती.
मात्र आता १ जुलै २०२२ पासून हा कायदा महाराष्ट्रातही लागू झालेला आहे. अजूनही पोलिस यंत्रणा त्याचा पाहिजे तसा वापर करत नाही, असे असले तरीही आरटीओ अधिकारी त्याचे कटाक्षाने पालन करत आहेत. म्हणूनच आरटीओने पकडलेली दुचाकी सोडवताना प्रचंड दंड भरावा लागतो. हा दंड अनेक वेळा वीस ते तीस हजारांपेक्षाही अधिक होतो, त्यामुळे जप्त दुचाकी सोडून द्यावी लागते अशी सध्याची परिस्थिती आहे.
डीजी लॉकरची सोय
केंद्र सरकाने सुरू केलेल्या डीजी लॉकर या ॲपमुळे वाहनधारकाला सोबत प्रत्यक्ष कागदपत्र ठेवण्याची गरज उरली नाही. कुठलीही कागदपत्रे यात सहज साठवून ठेवता येतात. तुम्ही तुमचा वाहन परवाना, आरसी, पीयूसी, विमा प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र डीजी लॉकरमध्ये ठेवू शकता. डीजी लॉकर व्हेरिफाइड प्रमाणपत्र दाखवल्यास ते ग्राह्य धरले जातात, त्यामुळे तुम्हाला सोबत कागदपत्र ठेवण्याचे दिवस आता संपलेले आहेत. मात्र अजूनही अनेकांना याबाबत माहिती नाही.