Chhatrapati Sambhajinagar News : कानून के लंबे हाथ कशाखाली अडकलेत? संतप्त नागरिकांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणाई गांजा, बटण आणि देशी दारूच्या आहारी जात आहे. व्यसनामुळे गुन्ह्यांचेही प्रमाण वाढत आहे.
Police
PoliceSakal

छत्रपती संभाजीनगर - शहरातील तरुणाई गांजा, बटण आणि देशी दारूच्या आहारी जात आहे. व्यसनामुळे गुन्ह्यांचेही प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम कुटुंब, समाज यांनाही भोगावा लागत असताना पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे ‘कानून के लंबे हाथ’ कारवाई करण्यास का थरथरत आहेत, ते ‘कशाखाली अडकलेत?’ असा संतप्त प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहराचे वाटोळे होणार

अक्षय बाहेती (वकील) - मागील तीन वर्षांत युवकांचे जेवढे खून झाले त्यातील ९० टक्के खून हे नशेतून झाले आहेत. खरे तर बटण, गांजा हे आता सहजपणे उपलब्ध होत आहे, याचेच खर तर आश्चर्य आहे. पोलिसांनी यात लक्ष घालून लवकरच कडक भूमिका घेतली नाही तर शहराचे वाटोळे होणार हे निश्चित.

आरोग्यावर होतो विपरित परिणाम

पंकज वीरकर (जिम ट्रेनर) - तरुणांनी नशेच्या आहारी जाऊ नये. त्याचा परिणाम आरोग्यावरच होतो असे नाही तर कुटुंबावरही होतो. नशेमुळे विचार करण्याची क्षमता कमी होते. त्यातून गुन्हेगारी वाढीस लागते. त्यामुळे तरुणांनी नशेच्या आहारी जाण्यापेक्षा फीटनेसकडे लक्ष दिल्यास नक्कीच व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी होईल.

हवी व्यापक जनजागृती

चरणजित सिंग संघा (सचिव, जिल्हा सायकल संघटना) - व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईसाठी शासनाने क्रीडा संकुल नि-शुल्क करावे; जेणेकरून व्यसन सोडून व्यायामाच्या दिशेने युवक जातील. जिल्हा सायकल संघटना व्यसनमुक्तीसाठी दरवर्षी सायकल फेरीचे आयोजन करत असते. यामध्येही आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती करतो.

पोलिसांची भूमिका बघ्याची नको

रणजित निकम (शिक्षक) - बीड बायपासला लागूनच मोकळे मैदान आहे. तेथे दिवसभर नशाखोर मुले बसलेली असतात. अशा मुलांना अनेक वेळा हटकलेही आहे. मात्र, त्यांना फरक पडत नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता ठोस कारवाई करावी. हे पदार्थ पुरवणाऱ्यांना पकडावे; तरच या पिढीचे भविष्य वाचेल.

नशेचे पदार्थ पोचतातच कसे?

सुरेखा डोमाळे (शिक्षिका) - विद्यार्थिदशेत जर मुले नशा करीत असतील तर गंभीर बाब आहे. पालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या कोवळ्या मुलांपर्यंत नशेचे पदार्थ पोचतातच कसे? याचा तपास पोलिसांनी करावा. यात दोषी असलेल्यांवर कठोरपणे कारवाई करणे गरजेचे आहे.

यंत्रणा काहीच का करत नाही?

सुमित सनपूरकर (पालक) - लहान मुलेही नशा करतात, हेच गंभीर आहे. ज्या पदार्थांवर बंदी आहे, ज्या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या जात नाहीत त्या या मुलांना मिळताच कशा? पोलिस, अन्न व औषध प्रशासन आणि इतर यंत्रणा काहीच का करत नाही? सर्व यंत्रणांनी मिळून देशाच्या भवितव्यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे.

थातूरमातूर कारवाई नको, ठोस हवी

राहुल वेल्हाळ (नागरिक) - बीड बायपास भागातही नशाखोर वाढले आहेत. बऱ्याच वेळा उघड्या मैदानावर नशा केल्याचे दिसते. पोलिसांनी केवळ थातूरमातूर कारवाई करण्याऐवजी ठोस कारवाई करावी. अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होतो, याचे मूळ शोधावे आणि कारवाई करावी. तरच याला आळा बसेल.

खरंच हे खूपच भयंकर आहे

योगिता सुधीर शास्त्री (मुख्याध्यापिका) - खरंच हे खूपच भयंकर आहे. समज नसलेल्या वयात व्यसनांच्या आहारी जाणे घातक आहे. हे सगळे वेळीच रोखण्यासाठी एक पालक म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचे वेळीच समुपदेशन केले पाहिजे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेतही मुलांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. मुलांना काय समस्या आहेत त्या जाणून घेऊन मार्गदर्शन करणे, पालकांनी मुलांना वेळ देणे, संवाद साधणे आवश्यक आहे.

पुरवठा साखळी शोधा

श्रीनिवास देव (सामाजिक कार्यकर्ते) - ही अतिशय गंभीर बाब आहे. नशेतून अनेक ठिकाणी खून, मारहाण झाल्याचे प्रसंग आपल्या शहरात घडले. नशेच्या गोळ्यांबद्दल जागरूकता निर्माण करून त्याचे दुष्परिणाम समजावून सांगावे जेणेकरून त्याबद्दलचे आकर्षण संपेल आणि तरुण पिढी ‘जस्ट-ट्राय’सुद्धा करणार नाही. पुरवठा साखळी शोधून कारवाई करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com