Sambhaji Nagar News : शाळांसाठी धाराशिव, बीडमधील उपक्रम राबवा ; खंडपीठाचा आदेश

जिल्हा परिषद शाळांच्या परिसरात चालणाऱ्या अनैतिक बाबींना प्रतिबंध करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. आर. एम. जोशी यांनी सर्व जिल्ह्यांच्या पोलिस यंत्रणेला दिले.
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar News sakal

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शाळांच्या परिसरात चालणाऱ्या अनैतिक बाबींना प्रतिबंध करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. आर. एम. जोशी यांनी सर्व जिल्ह्यांच्या पोलिस यंत्रणेला दिले. विशेषतः धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत अवलंबण्यात आलेल्या पद्धतीचा अवलंब अन्य पोलिसांनी करावा, असेही निर्देशही खंडपीठाने दिले. राज्यातील जिल्हा परिषदेसह विविध शाळांच्या परिसरातील गैरप्रकार रोखण्यासाठीच्या याचिकेवर खंडपीठाने गुरुवारी (ता. २१) दिलेल्या आदेशानुसार धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे शुक्रवारी (ता. २२) व्यक्तिशः खंडपीठात हजर झाले होते. त्यांच्या जिल्ह्यातील शाळांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी दिली.

धाराशिव जिल्ह्यात शाळांमधील सर्व प्रकारची माहिती गोळा केली जाते व गुन्हे थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेले ‘गुलाबी पथक’ स्थापन करण्यात आलेले आहे. महिला अधिकारी रोज शाळेला भेट देऊन माहिती घेतात. रात्रीची गस्त वाढवण्यात आलेली आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन प्रणालीद्वारे घटनेची माहिती प्राप्त करून कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोचतात. पेट्रोलिंग, सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे मॉनिटरिंग, संशयास्पद हालचाली आढळल्यास चौकशी आदींद्वारे गैरप्रकारावर प्रतिबंध केला जात आहे. पहाट प्रोग्रॅमद्वारे धाराशिवमध्ये गुन्हेगारांचे पुनर्वसन, समुपदेशन व शैक्षणिक उपलब्धतेद्वारे प्रबोधन केले जाते.

‘पोलिस काका’ व ‘दीदी’ उपक्रम राबवले जातात. धाराशिव व बीडमधील शाळांमध्ये गुलाबी तक्रारी पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यातून आलेल्या तक्रारीनुसार कारवाई केली जात असल्याचे यावेळी खंडपीठात सांगण्यात आले. अशा उपक्रमांची इतर जिल्ह्यांतील पोलिसांनीही अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा खंडपीठाने केली. न्यायालयीन मित्र म्हणून रश्मी कुलकर्णी यांनी प्रधान जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीने पाहणी केल्याचा अहवाल सादर केला. त्यातील बहुतांश शाळांमध्ये अमली पदार्थ, मटका, दारू, जुगार आदी अनैतिक गोष्टी सुरू असल्याचे समितीला आढळले.

Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar Crime : अनैतिक संबंधातून निलंबित कॉन्स्टेबलच्या पतीने काढला उद्याेजक सचिन नरोडेचा काटा

माजी सरपंच, शिक्षकांनी केलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा येथील मनपा शाळेच्या प्रवेशद्वारातच विद्युत डीपी आहे. तर आडगाव (ता. पैठण) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वयंपाकगृहावरून हायटेन्शन वीजतारा गेल्या आहेत. मावसाळा (ता. खुलताबाद) येथे माजी सरपंच व काही शिक्षकांनीच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची २० गुंठे जागा वगळता इतर पाच एकर जागेवर अतिक्रमण केले आहे. २० गुंठ्यांत पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी आणि उर्दू शाळांच्या इमारती आहेत.

ही अतिक्रमणे जिल्हा प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून त्वरित काढावीत, असेही निर्देश खंडपीठाने दिले. सर्व जिल्ह्यांतील प्रधान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समित्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांची प्रशंसा केली. ॲड. कुलकर्णी यांना ॲड. नमिता ढवळे यांनी सहकार्य केले. पुढील सुनावणी ५ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com