महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी दंगलीचे कटकारस्थान : संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी दंगलीचे कटकारस्थान : संजय राऊत

sakal_logo
By
राहुल शेळके

औरंगाबाद : लोकसभा निवडणूकीच्यावेळी आमचे सरकार येऊ द्या शंभर दिवसात महागाई कमी करू असा दावा करणारे , केंद्रात सत्ता आल्यानंतर महागाई कमी करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. लोकांचे प्रश्‍न, नोकरभर्ती, महागाई विषयी न बोलता यावरून लक्ष हटवण्यासाठी सर्जिक स्ट्राईक, भारत - पाकीस्तान, चीनची घुसखोरी, हिंदू मुस्लिम याबद्दल बोलायला सुरूवात करतात. त्यांनी आता दंगलीचे कटकारस्थान करण्यास सुरूवात केली असून अमरावतीत त्याचे चित्र पहायला मिळाले असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे जाहीर सभेत बोलताना केला.

शिवसेनेच्यावतीने येथे शनिवारी (ता.१३ ) केंद्र सरकारच्या विरोधात क्रांती चौक ते गुलमंडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसेना नेते खासदार राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा गुलमंडी येथे जाहीर सभेने मोर्चाची सांगता झाली, यावेळी ते बोलत होते. खासदार श्री. राऊत यांनी भाषणाची सुरुवात करतांना ही रस्त्यावर भर उन्हात उभे राहीलेले शिवसैनिक म्हणजे खरी शिवसेना आहे असा उल्लेख केला. राज्यात सरकार येत जात राहतात मात्र हातात भगवा झेंडा घेवून उन्हातान्हात येतात महागाईच्या विरोधात आक्रोश करणारे शिवसैनिक ही खरी शिवसेना. सरकार मंत्रालयात शिवसेना रस्त्यावरच आहे, हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे. पुढे ते म्हणाले महागाईने सारा देश होरपळत आहे, महागाई ही राष्ट्रीय समस्या झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात, महागाई विरोधात निघालेला हा देशातील पहिला मोर्चा आहे. महागाईविरोधातील हा आक्रोश दिल्ली पर्यंत नक्कीच पोचला आहे. जिथे संघर्ष तीथे शिवसेना, ज्या ज्यावेळी महागाईची झळ सामान्यांपर्यंत पोहचते त्या त्यावेळी शिवसेना रस्त्यावर उतरते.

हेही वाचा: राष्ट्रपतींच्या हस्ते शिखरचा सन्मान

ते म्हणाले, काही जण विचारतात महाराष्ट्रात तर तुमचे सरकार आहे , मग मोर्चा कसा काय काढता. महागाई हा एका राज्याचा विषय नाही, पेट्रोल - डिझलेचा भाव कमी करणे, स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे भाव कमी करणे हे राज्याच्या हातातील विषय नाहीत, या कंपन्या राज्याच्या नाहीत. २०१४ मध्ये ७८ रुपये असलेले पेट्रोल १२५ रुपयापर्यंत गेले आहे. काहीजण विचारतात की, केंद्र सरकारने पाच रुपये कमी केले मग राज्य सरकार किती कमी करणार , त्यांना ठणकावले की, केंद्र सरकारने ५० रुपये कमी करावे मग आम्ही राज्याकडून व्हॅट व इतर कर कमी करू.

हा आक्रोश मोर्चा हा राज्यातल्या आशा शहरात काढण्यात आला आहे. या शहराने निझामशाहीच्या विरोधात लढा देवून यश मिळवले आहे. हा लढा देखील सध्याच्या केंद्रातील निझाम शाहीच्या विरोधात आहे. केंद्र सरकार इडी, सीबीआय आणि इतर संस्थाना पाठवून राज्यातील सरकारीची आर्थिक कोंडी करीत आहे. मात्र आमचे सरकार कोणीही हलूव शकत नाही. उद्धव ठाकरे राष्ट्राचे नेतृत्व करतील. तुम्ही कितीही कटकारस्थान करा, आम्ही छाताडावर पाय देऊ पुढे जाऊ. शिवसेना हा तळपता सुर्य आहे. या आगीशी खेळू नका तुम्ही भस्म व्हाल असा विरोधी पक्षातील नेत्यांना दिला. मंत्री संदिपान भुमरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

loading image
go to top