esakal | स्वॅब देण्यासाठी जा अन् मनस्तापच घेऊन या...
sakal

बोलून बातमी शोधा

corona

स्वतः स्वॅब देण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारी रुग्णालयात तासनतास वेटिंग करावी लागते, तर महापालिकेच्या विशेष रुग्णालयात आधी संबंधित आरोग्य केंद्राची चिठ्ठी घेऊन या, असा निरोप दिला जात आहे. 

स्वॅब देण्यासाठी जा अन् मनस्तापच घेऊन या...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे स्वतः स्वॅब देण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारी रुग्णालयात तासनतास वेटिंग करावी लागते, तर महापालिकेच्या विशेष रुग्णालयात आधी संबंधित आरोग्य केंद्राची चिठ्ठी घेऊन या, असा निरोप दिला जात आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनातर्फे सुरू असलेले उपाय फोल ठरले आहेत. त्यात पुन्हा एकदा केरळ पॅटर्न राबवून रुग्णांच्या संपर्कातील किमान १५ जणांचे स्वॅब घेण्याचे आदेश प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. चार दिवसांपासून रोज दोनशे ते तीनशेच्या प्रमाणात स्वॅब घेतले जात आहेत. एकीकडे जास्तीत जास्त स्वॅब घेतले जात असताना दुसरीकडे संशय आला म्हणून स्वतः रुग्णालयात जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये तासनतास बसवून ठेवले जाते तर महापालिकेच्या केंद्रावर ‘आधी प्राथमिक आरोग्य केंद्रातून चिठ्ठी घेऊन या’ असा निरोप दिला जात आहे. 

हेही वाचा- स्मार्ट बस डेपोसाठी लवकरच जागा हस्तांतरीत करणार

माजी नगरसेवकाच्या तीन दिवस हेलपाट्या 
शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वी तीन दिवस त्यांनी घाटी रुग्णालयात खेट्या मारल्या. रविवारी (ता. २१) सुटी असल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी बोलाविण्यात आले. दुसऱ्या दिवशी पाच तास बसवून ठेवण्यात आले. या अनुभवानंतर त्यांनी खासगी रुग्णालयामार्फत स्वॅब दिला असता तो पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ते पुन्हा घाटी रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेले असता व्हेंटिलेटर शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी माजी खासदाराने फोन केल्यानंतर त्यांची घाटीतून खासगी रुग्णालयात व्यवस्था झाली. तोपर्यंत त्यांचा पल्सरेट ३५ ते ४० पर्यंत आला होता. 

क्वारंटाइनच्या व्यवस्थेनंतर स्वॅब 
अन्य एकजण महापालिकेच्या पदमपुरा येथील केंद्रावर स्वॅब देण्यासाठी गेला असता, स्वॅब घेतल्यानंतर तुमची क्वारंटाइनची व्यवस्था कुठे होणार? हे आरोग्य केंद्रातर्फे ठरविले जाते. त्यामुळे तुमच्या भागातील संबंधित आरोग्य केंद्रात जा आणि चिठ्ठी आणा, असे म्हणून त्यांना परत पाठविण्यात आले. 

हेही वाचा- औरंगाबादची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता