esakal | फोन करून ते घरी पोचले...अन् तिच्यासाठी ठरले देवदूत 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

महिला रेड झोनमध्ये असल्याचे वॉररुममधील डॉक्टरांच्या लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांना तत्काळ फोन करण्यात आला व अवघ्या दीड तासात आरोग्य पथक महिलेच्या घरी पोचले. तिच्यावर प्राथमिक उपचार करून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला.

फोन करून ते घरी पोचले...अन् तिच्यासाठी ठरले देवदूत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्गाला ५० वर्षावरील व्यक्ती सर्वाधिक बळी पडत आहेत. अशा व्यक्तींना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी या हेतून महापालिकेने ‘एमएचएमएच’ (माझे आरोग्य माझ्या हाती) मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. अॅपवर उल्कानगरीतील एका वृध्द महिलेची नोंद करण्यात आली. ही महिला रेड झोनमध्ये असल्याचे वॉररुममधील डॉक्टरांच्या लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांना तत्काळ फोन करण्यात आला व अवघ्या दीड तासात आरोग्य पथक महिलेच्या घरी पोचले. तिच्यावर प्राथमिक उपचार करून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. महापालिकेने दाखविलेल्या तत्परतेमुळे रुग्णासह तिच्या कुटुंबीयांना सुखद धक्का बसला. 

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असले तरी मृत्यूमध्ये ५० वर्षावरील नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी महापालिकेने ‘एमएचएमएच’ (माझी हेल्थ माझ्या हाती) हे अ‍ॅप तयार केले आहे. घरोघरी जाऊन ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याचे सर्वेक्षण करून माहिती अ‍ॅपमध्ये भरून घेतली जात आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या अ‍ॅपवर शुक्रवारी उल्कानगरी येथील ८६ वर्षीय महिलेची माहिती दुपारी १२ वाजेच्या सुमारास टाकण्यात आली.  ही माहिती वॉररूममध्ये बसलेल्या डॉक्टरांनी वाचली. महिलेला उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच तत्काळ कुटुंबीयांसोबत फोनद्वारे संवाद साधून माहिती घेण्यात आली. त्यांचा पल्सरेट ९०, शरीरातील ऑक्सिजन पातळी ८६ तसेच मधुमेह, हायपर टेन्शनचा त्रास असल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. 

दीड तासात पथक पोचले घरी 
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वॉररूममधील डॉक्टरांनी रुग्णाच्या घरी पाठविले. दुपारी १.३० वाजता डॉक्टरांचे पथक रुग्णाच्या घरी गेले व तपासणी करून औषधी दिली. एवढ्या तातडीने पथक आल्यामुळे रुग्णासह नातेवाइकांनी आश्चर्य व्यक्त करून पथकाचे आभार मानले. रुग्णाच्या प्रकृतीतील सुधारणा असल्याचे डॉ. ज्ञानेश्वर लाड यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा


महापालिकेने सुरू केलेल्या अ‍ॅपमुळे अनेक रुग्णांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळत आहेत. प्रत्येकाने हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून माहिती भरावी, त्यामुळे कोणीही वैद्यकीय सेवेपासून वंचित राहणार नाही. 
अस्तिककुमार पांडेय, महापालिका प्रशासक.

loading image
go to top