esakal | कोरोनाची धास्ती : ५९ हजार प्रवाशांची केली तपासणी

बोलून बातमी शोधा

Aurangabad amc news

गेल्या पाच दिवसांत तब्बल ५९ हजार २२३ जणांची तपासणी करण्यात आली असून, दरम्यान, रेल्वे व बससेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्याने तीन ठिकाणची तपासणी रद्द करण्यात आली आहे. 

कोरोनाची धास्ती : ५९ हजार प्रवाशांची केली तपासणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळ, रेल्वे व खासगी वाहनाने शहरात येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. गेल्या पाच दिवसांत तब्बल ५९ हजार २२३ जणांची तपासणी करण्यात आली असून, दरम्यान, रेल्वे व बससेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्याने तीन ठिकाणची तपासणी रद्द करण्यात आली आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व महापालिकेतर्फे सतर्कता बाळगली जात आहे. शहरात पुणे, नाशिक येथून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे त्यांची तपासणी करूनच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती व सिडको बसस्थानक तसेच केंब्रिज स्कूल, हर्सूल व नगर नाका अशा सहा ठिकाणी प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला होता. या ठिकाणी इन्फाईड गनच्या माध्यमातून प्रवाशांची ताप मोजणी करण्यात आली. गेल्या पाच दिवसांत ५९ हजार २५३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली, यापैकी ५७ जणांमध्ये कोरोनाची काही लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना त्यांच्या राहत्या घरीच बाजूला होम क्‍वॉरंटाईन करण्यात आले आहे. यांना १४ दिवस निगराणीत ठेवले जाणार आहे. अशी माहिती डॉ. मेघा जोगदंड यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली. 

हेही वाचा- समजून घ्या जमावबंदी आणि संचारबंदीतील फरक
 
तीन ठिकाणचे सेंटर होणार बंद 
रेल्वेस्टेशन, दोन्ही बसस्थानकांवर सुरू असलेले स्क्रीनिंग सेंटर सोमवारपासून (ता. २३) बंद करण्यात आले आहेत. रेल्वे व बस ३१ मार्चपर्यंत बंद असून, तोपर्यंत तीनही सेंटर बंद राहतील, तर उर्वरित तीन ठिकाणी सेंटर सुरूच राहणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. 

इतर डॉक्टरांची मदत घेणार 
महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांसह सर्वच कर्मचारी सध्या कोरोना व्हायरससंदर्भात उपाययोजना करण्याच्या कामावर आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, एमजीएम आणि आयएमएच्या डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून पाच डॉक्टर महापालिकेला तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले आहेत. उर्वरित डॉक्टर लवकरच मिळणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

हेही वाचा  - पुण्यात सन्नाटा