Corona : काम क्वारंटाईन कक्षात, बंदी गल्लीत... 

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरून थेट विलगीकरण कक्षात ठेवण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या ठिकणी ठेवलेल्या नागरिकांना पाणी, जेवण, चहा, नाश्‍ता, झोपण्यासाठी गाद्या, उशा असे साहित्य द्यावे लागते. ही कामे करण्यासाठी कंत्राटदारामार्फत कामगार नियुक्त केलेले आहेत. हे कामगार विलगीकरण कक्षात काम करीत असल्याची माहिती त्यांच्या गल्लीत पसरताच त्यांना घरीसुद्धा येऊ दिले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकजण एक दिवस काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामावर येत नसल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्याचा शोध महापालिकेमार्फत सुरूच आहे. दररोज १०० ते २०० जणांना त्यांच्या घरातून सोबत घेऊन क्वारंटाइन केले जात आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात किमान २५, तर काही भागांत १२५ जण संपर्कात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. महापालिकेने तेरा ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. या ठिकाणी नागरिकांची काळजी घेण्यासाठी महापालिकेने प्रत्येक केंद्रावर चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, एक गादी, उशी, बेडशीट, टूथब्रश किट देण्यात येत आहे. तेरा केंद्रांवर ९०० पेक्षा अधिक गाद्या, १००० उशा, १५०० बेडशीट, १२०० उशी कव्हर, ३०० बकेट, ३०० मग देण्यात आले आहेत. कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षातून घरी गेलेल्याचे बेडशीट बदलणे, खोली निर्जंतुकीकरण करणे अशी कामे करावी लागतात. मात्र, या ठिकाणी कंत्राटदाराचे कर्मचारी कामच करायला तयार नाहीत. पॉझिटिव्ह रुग्ण नसतानाही कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे हे कामगार राहतात तेथील नागरिकांना याबाबत माहिती मिळाली, की संबंधित कामगारांना वसाहतीमध्ये प्रवेश दिला जात नाही. 

खासगी कंपनीने सोडले काम 
महापालिकेने एका खासगी कंपनीला महापालिकेने बेडशीट बदलणे, ते धुऊन आणणे आदी कामे सोपविली होती. चार दिवसांपूर्वी ही कंपनी काम सोडून गेली. आता महापालिकेच्या काही जुन्या कंत्राटदारांकडून अधिकारी काम करून घेत आहेत. दरम्यान, नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा कमी पडल्यास महापालिकेच्या नावाने ओरड सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com