Toy Laboratory : उभारली देशातील पहिली टॉय लॅबोरेटरी

राज्यासह देशभरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविणारी, तांत्रिक साह्यासह विविध प्रशिक्षणे देणाऱ्या केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी आणि प्रौद्योगिकी संस्थेने (सिपेट) अनेक वर्षांच्या बळावर आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली.
Toy Laboratory
Toy Laboratory sakal

छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविणारी, तांत्रिक साह्यासह विविध प्रशिक्षणे देणाऱ्या केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी आणि प्रौद्योगिकी संस्थेने (सिपेट) अनेक वर्षांच्या बळावर आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली. देशातील पहिली ‘टॉय’ (लहान मुलांची खेळणी) तपासणी करणारी आधुनिक प्रयोगशाळा उभारली. मेहनत, अनुभवाच्या जोरावर हे सर्व करू शकलो, असे अभिमानाने सांगत होते, ते सिपेटचे संचालक ए.के. राव. ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात त्यांनी सिपेटचा प्रवास उलगडला.

राव म्हणाले, ‘‘वर्ष २००६ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सिपेटचा प्रवास सुरू झाला. मागे वळून पाहिले तर सिपेटच्या जागेपासून अडचणीचा डोंगर उभा होता. परंतु, अधीक्षक मिलिंदकुमार भरणे यांच्यासह त्या आजी-माजी सहकाऱ्यांनी या संस्थेला पाठबळ दिले. आज स्वतःच्या जागेत दिमाखात ही संस्था उभी आहे. याच परिसरात भारतातील पहिली टॉय लॅबोरेटरी उभारली आहे.

कौशल्यावर आधारित मनुष्यबळ तयार करणे, स्कील डेव्हलपमेंट, तांत्रिक साह्य, अकॅडमिक रिसर्चला वाहिलेल्या या संस्थेत रोजगार नसलेले, अल्प उत्पन्न असणाऱ्या तरुणांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांचे डिप्लोमा इन प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी (डीपीटी), डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी (डीपीएमटी) हे तीन वर्षांचे, तर बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन प्लॅस्टिक प्रोसेसिंग ॲण्ड टेस्टिंग (पीजीडी-पीपीटी) आणि इंजिनीअरिंग डिप्लोमा केलेल्यांसाठी १८ महिन्यांचा पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन (पीडी-पीएमडी) हे अभ्यासक्रम आहेत.

अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बहुतांश तरुणांना नोकरी मिळाली. महत्त्वाचे म्हणजे या अभ्यासक्रमातून रोजगार, स्वयंरोजगार निर्माण झाला. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर २३ ते २५ हजार रुपयांपासून विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळते. वर्ष २०२२-२३ मध्ये २७९ पैकी २०४ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली. मेटल ते प्लॅस्टिक आणि ग्लास टू प्लॅस्टिक यांसारख्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्याने ‘आयडिया कॅन कन्व्हर्टेड इन्टू रिॲलिटी’ हा अनुभव आला’’, असे राव यांनी नमूद केले. महत्त्वाचे म्हणजे कोविडदरम्यान अनेक मर्यादा आल्या. परंतु, सिपेटने स्टुडंट ॲक्टिव्हिटी, लॅबमधील मशिनरीज वाढविल्या. ५० हून ७५ प्रकारची उत्पादने तपासण्याची क्षमता वाढविली.

उत्पादने तपासण्याची क्षमता वाढविली. यातून अनेक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्या. सध्याही शासनाचे विविध प्रोजेक्ट होतात. त्यामधील उत्पादनांची (प्रोडक्ट) प्री डिलिव्हरी इन्सपेक्शनसाठी पॉलिहाऊस, शेडनेटची जाळी, शेतततळ्याचा कागद, ठिबक नळी, पीव्हीसी पाइप्स, द्राक्षासाठींच्या संरक्षित कव्हरनेटची तपासणी केली जाते. ही उत्पादने तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना विक्री करण्याआधी जिल्ह्याजिल्ह्यांतून सिपेटमध्ये येतात. त्याची तपासणी केल्यानंतरच ते अंतिम विक्रीसाठी जात असल्याची माहिती तांत्रिक अधिकारी किरणकुमार कोळी यांनी दिली.

काय आहे खेळणी प्रयोगशाळा?

लहान मुलांच्या खेळणी बनविणाऱ्या कंपन्यांना संबंधित खेळणी बाजारात आणण्यापूर्वी त्याची गुणात्मक तपासणी करून घ्यावी लागते. लहान मुलांच्या खेळण्यामध्ये बॅटरी असणारे खेळणी असतात, त्याचा आवाज कमी-अधिक प्रमाणात होतो. शिवाय प्लॅस्टिक खेळणी मुलांनी तोंडात घातल्यानंतर केमिकलयुक्त रसायनांचा धोका होऊ नये आदी पॅरामीटरची या प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. चीनच्या उत्पादनांना भारतात बंदी केल्यानंतर भारतातील उत्पादनांची (टॉय) तपासणी करण्यासाठी गरज भासत होती.

त्यातून या ‘टॉय लॅबोरेटरी’चा जन्म झाल्याचे संचालक राव नमूद करतात. याशिवाय या ठिकाणी असलेल्या इतर केमिकल, कॅरेक्टरायझेशन, बायोडिग्रेशन, इलेक्ट्रिकल टेस्टिंग, प्रोडक्ट टेस्टिंग आदी प्रयोगशाळा आहेत. या सर्व प्रयोगशाळांमध्ये शेततळ्याचा प्लॅस्टिक कागद, ड्रेनेज पाइप, टॉइज, गॅस पाइप्स, रस्त्यावरील सिग्नल इंडिकेटर्स, पीव्हीसी पाइप आदी विविध प्रकारची ७५ उत्पादने ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्टसच्या (भारतीय मानक ब्यूरो) नियमानुसार तपासली जातात. या प्रयोगशाळेत सहायक तांत्रिक अधिकारी किरणकुमार कोळी कार्यरत आहेत.

प्रवास सोप्पा नव्हता, पण...

वर्ष २००६ साली सिपेट ही संस्था चिकलठाणा विमानतळासमोर मेल्ट्रॉन येथे होती. तिथून २०१० पासून स्वतःच्या जागेत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित झाली. जागेसंदर्भात अनेक वादही झाले. त्यातून मार्ग काढत ८० एकरांत ही संस्था तग धरून उभी आहे. त्यानंतर अद्यापही संस्थेने यशाचा चढता आलेख सुरूच ठेवला आहे.

मुख्यत्वे करून छत्रपती संभाजीगरनंतर जळगाव; तसेच जालनासारख्या उद्योगाच्या शहराला कुशल मनुष्यबळ तसेच त्या-त्या कंपन्यांच्या मनुष्यबळाला कौशल्यावर आधारित प्रशिक्षणे सिपेटने दिल्याचे अधीक्षक मिलिंदकुमार भरणे सांगतात. महत्त्वाचे म्हणजे भारतभरात असलेल्या सिपेटपैकी छत्रपती संभाजीनगरमधील सिपेटने उद्योगांना अधिकाधिक कौशल्यावर आधारित मनुष्यबळ दिल्याचे भरणे नमूद करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com