esakal | बीडकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

बीडकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असे वाटत असतानाच झपाट्याने खाली उतरलेला आकडा दोनशेच्या खाली आल्यानंतर त्याखाली उतरायला तयार नाही. अलिकडे काही दिवसांपासून दीडशेच्या घरात असलेली कोरोना रुग्णसंख्या कायम आहे. मंगळवारीही (ता. १५) जिल्ह्यात पुन्हा १५७ रुग्णांची नोंद झाली. तर, नवीन- जुन्या २४ कोरोना बळींची नोंद झाली. विशेष म्हणजे पॉझिटीव्हीटी रेटही पुन्हा सहा टक्क्यांच्या घरात गेला.
सोमवारी २,६२० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तपासणीचे अहवाल मंगळवारी आले. यात १५७ जण बाधित आढळले तर २,४६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५.९९ टक्के आहे.

बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात सात, आष्टी ३७, बीड २३, धारूर चार, गेवराई १३, केज २८, माजलगाव नऊ, परळी १४, पाटोदा तीन, शिरूर आठ व वडवणी तालुक्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा ८९ हजार ६४८ इतका झाला आहे. मंगळवारी १९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ८५ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २४ तासांत पाच तर जुन्या १९ अशा एकूण २४ मृत्यूची नोंद झाली. २४ तासांतील पाच बळींमध्ये पाचेगाव (ता. गेवराई) येथील ८० वर्षीय पुरुष, बीड तालुक्यातील पाली येथील २८ वर्षीय पुरुष, वडगाव येथील ४७ वर्षीय महिला, गंगावाडी (ता. गेवराई) येथील ७० वर्षीय महिला व वडझरी (ता. पाटोदा) येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात १,४६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, बाहेर जिल्ह्यात ५१ रुग्ण उपचार घेत आहेत. तर, १२३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण वाढले
कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण समोर आले. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी पाच रुग्णांची वाढ होऊन रुग्णसंख्या १५८ वर पोचली. २२ रुग्णांना डिस्चार्ज दिला असून, २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १०२ रुग्ण उपचार घेत आहेत.

loading image