esakal | रिकाम्या हातांना लिंबोळ्याचा आधार; पाचोडच्या लिंबोळीला परराज्यातून मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

pachod

रिकाम्या हातांना लिंबोळ्याचा आधार; पाचोडच्या लिंबोळीला परराज्यातून मागणी

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद): कोरोनाच्या संकटानंतर पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागातील शेतीचे कामे खोळंबली, अन् शारीरिक श्रमावर पोट असणाऱ्याची पंचाईत झाली. मात्र रिकाम्या हातांना हंगामी स्वरूपाचा लिंबोळ्यानी रोजगार उपलब्ध करून देऊनही बाजारपेठा बंद असल्याने लिंबोळी विक्रीची पंचाईत निर्माण झाल्याचे चित्र पाचोड (ता. पैठण) सह चौफेर ग्रामीण भागात पहावयास मिळते. गतवर्षापासून कोरोनाने पूर्ण अर्थव्यवस्था विस्कटली गेली अन् हातावर पोट असणाऱ्यांची पंचाईत झाली. हाताला काम नसल्याने शेतमजुरांसमोर अनंत अडचणी उभ्या ठाकल्या. पाचोडसह चौफेर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतीव्यवसायावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी निसर्गावर हवाला ठेवत रखरखत्या उन्हात पेरणीपूर्व मशागती आटोपल्या. घरातील धान्य, दावणीची जनावरे विकून काळी आईची ओटी भरण्यासाठी खते-बियांणाची सरबराई केली. मात्र मृग नक्षत्राच्या रिमझिम हजेरीनंतर पावसाने कायमचीच ओढ दिल्याने रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला. अन् हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब-मजूर वर्गांनी आपला मोर्चा नैसर्गिकरीत्या उगवण झालेल्या कडूलिंबाच्या झाडांकडे वळविला.

नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये उनाड - बोडकी झालेली लिंबाची झाडे मार्च-एप्रिलमध्ये नव्या पालवीसह फुलाकळ्याच्या तोरणांसह लिंबोळ्याचे घसांनी लगडले. मे-जून मध्ये लिंबाच्या झाडाखाली लिंबोळ्याचा सडा पाहून रोजगारांची हात नकळत त्याकडे वळाली. त्यातच शाळेच्या बंद असल्याचा फायदा घेत अनेक विद्यार्थ्यांनीही लिंबोळ्या वेचून त्या पैशातून पेन-वह्या, कंपास तर कुणी स्मार्ट मोबाईल आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी लिंबोळी वेचण्यास पसंती दिली ; तर वयोवृद्ध शेतमजुरांनी लिंबोळ्यातून घरखर्च-आठवडे बाजार, दैनंदिन खर्चाची पूर्तता केली. एप्रिल, मे व जून असे तीन महिने वेचलेल्या लिंबोळ्या विक्रीसाठी पाचोडसह बिडकिन , विहामांडवा, आडूळ, दावरवाडी, बालानगरच्या आठवडे बाजारात येत असे परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद राहुन लिंबोळी विक्रेत्यांची पंचाईत झाली. असे असले तरी ग्रामीण भागात छोटेमोठे नवीन व्यापारी उदयास आले व बंद दरवाजाआड त्यांनी हजारो क्विंटल लिंबोळी पडत्या दराने खरेदी करून घाऊक व्यापाऱ्या स विकल्या.परिसरात लिंबोळी खरेदीसाठी नगर, जालना, पैठण, औरंगाबाद, बीड येथील व्यापारी येत असून दरवर्षी सहाशे ते आठशे रुपये क्विंटल असणारी लिंबोळी यंदा मात्र नऊशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटल ने खरेदी-विक्री होत आहे.

हेही वाचा: AURIC: ‘ऑरिक’मध्ये लघु उद्योजकांचीही ‘एंट्री’

स्थानिक बाजारपेठेतून परराज्यातील बाजारपेठेत झेप :-

येथील व्यापाऱ्याकडून खरेदी केलेली लिंबोळीला परराज्यात विशेष मागणी आहे. व्यापारी खरेदी केलेली लिंबोळी गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, मुंबई येथे पाठवतात. त्यांना प्रती क्विंटलमागे निश्चितच दुप्पट नफा मिळतो. मात्र मजुराकडे दोन ते आठ क्विंटल लिंबोळी असल्याने त्या मजुराला लिंबोळीची परराज्यातील मार्केटिंग परवडत नसल्याचे व्यापारी करीमसेठ सय्यद यांनी सांगितले. परिसरात व्यापाऱ्यां नी आपापल्या घरी काटे उभारून प्रत्येकी पन्नास ते सत्तर टन लिंबोळीची खरेदी केली. आता पावेतो परिसरातुन पाच हजार क्विंटलवर लिंबोळीची व्यापाऱ्यांनी खरेदी केली. त्यातून जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपयांची उलाढाल झाली. लिंबोळ्यातून मजुराला ५०० ते ८०० रुपये रोजंदारी पडल्याचे सिंधुबाई आहेर व रुख्साना शेख यांनी सांगितले.

लिंबोळ्याचा उपयोग खत व औषधीसाठी:

लिंबाच्या झाडाला आयुर्वेदशास्त्रात महत्वाचे स्थान आहे. विविध आजारांवर लिंबाच्या साल, पाला व लिंबोळ्याचा उपयोग केला जातो. बाजारामध्ये व्यापाऱ्यांसह शेतकरी लिंबोळ्या खरेदी करतात. मोसंबीसाठी लिंबोळी खत, कापसासाठी लिंबोळी अर्क औषधी म्हणून वापरले जाते. स्थानिक बाजारपेठेसह परराज्यातील विविध कारखान्यातील औषधी, साबण व पिकांवरील रोगांवर प्रभावी नियंत्रण म्हणून लिंबोळीला मागणी आहे. मुंबई, इंदोर, हैद्राबाद येथील कारखान्यात कृषीविषयक औषधी, साबण निर्मितीसाठी लिंबोळीची खरेदी केली जात असल्याचे व्यापारी संजयसेठ सेठी यांनी सांगितले.

हेही वाचा: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला भरधाव पिकअपचा धक्का

लिंबाच्या संवर्धनाकडे सर्वांचेच दुर्लक्ष:

कडू- लिंबाचे महत्त्व द्विगुणीत असले तरी त्याच्या जोपासनेसाठी शेतकऱ्यांसह प्रशासन उदासीन असल्याचे पहावयास मिळते. शासनाने कडूलिंब, आंबा, जांभूळ या जातीचे वृक्ष तोडण्यावर निर्बंध लादले असले तरी महसूल व वन विभागाच्या संगनमताने राजरोस कडू लिंबाचे झाडे तोडून आरामशिनवर नेण्यात येते. दिवसेंदिवस कडूलिंबाचे महत्व पटत असल्याने एक हजारामागे एक शेतकरी त्याच्या जोपासनेची काळजी घेताना दिसतो. मुंबई येथील एका इसमाने चौंढाळा शिवारात जमीन घेऊन दहा एकरावर कडूलिंबाची लागवड करून नैसर्गिक शेती फुलविल्याचे दिसते. शासनाने वृक्ष तोडीवर निर्बंध घालावे असे, कैलास सुकासे, संजय निंबाळकर, लेखराज जैस्वाल, दत्तात्रय निर्मळ, कैलास भांड, एकनाथ फटांगडे, बद्री निर्मळ यांनी सांगितले.

loading image