फोटो
--
धीरज देशमुख
---
जिल्हा बँक अध्यक्षपदी पुन्हा धीरज देशमुख शक्य
--
उपाध्यक्षपदासाठी हेमंत जाधव की अविनाश जाधव याबाबत उत्सुकता
-----
सुशांत सांगवे : सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १७ : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला. त्यामुळे पॅनलप्रमुख व माजी आमदार धीरज देशमुख यांना पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन आठवड्यांत होणाऱ्या नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्या बैठकीत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सहकार पॅनल’ उतरले होते. दुसरीकडे आमदार संभाजी पाटील, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘परिवर्तन पॅनल’ने आव्हान उभे केले होते. मात्र, या निवडणुकीत सहकार पॅनल बहुमताने विजयी झाले. १९ पैकी १५ जागा सहकार पॅनलला मिळाल्या. त्यामुळे आता जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार, यावर चर्चा रंगू लागली आहे.
गेली पाच वर्षे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा धीरज देशमुख यांनी सांभाळली आहे. या पाच वर्षांत त्यांनी बँकेच्या कार्याचा विस्तार वाढविला आहे. या कार्याची दखल घेऊन गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारचे विविध पुरस्कारही बँकेला मिळाले आहेत. निवडणुकीत उतरलेल्या ‘सहकार पॅनल’चे नेतृत्वही धीरज देशमुख यांनीच केले. त्यामुळे पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी देशमुख यांना मिळणार, हे जवळपास निश्चित आहे.
जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू अविनाश जाधव, जावई आणि भाचे असलेले हेमंत जाधव की धीरज देशमुख यांच्या जवळचे मानले जाणारे सर्जेराव मोरे यांना संधी मिळणार, याबाबत चर्चा सुरू आहे. या तीन नावांत सध्या हेमंत जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसते.
----
१९ पैकी १५ नवे संचालक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध आणि निवडणुकीत निवडून आलेल्या दोन्ही पॅनलमधील १९ पैकी १५ संचालक हे नवे आहेत. ते प्रथमच बँकेचे संचालक म्हणून कारभार पाहणार आहेत. ‘सहकार पॅनल’मधील धीरज देशमुख, सर्जेराव मोरे, जयेश माने तर परिवर्तन पॅनलमधील भगवानराव पाटील यांनी याआधी संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. नव्या दमाच्या १५ संचालकांना घेऊन जिल्हा बँकेचे कामकाज कसे चालविले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.
-----
LTR26B15690