esakal | पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा सरपंचाच्या घरावर 'ढोल मोर्चा'
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा सरपंचाच्या घरावर 'ढोल मोर्चा'

sakal_logo
By
नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा (औरंगाबाद): मांगेगाव (ता. गंगापूर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. मांगेगाव, महालक्ष्मीखेडा, वझर येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी शनिवारी (ता.24) सरपंच लक्ष्मीबाई दिलीप रोडगे यांच्या महालक्ष्मी खेडा येथील राहत्या घरावर सकाळी ढोल वाजवून मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व सरपंच यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. संतप्त ग्रामस्थांनी सरपंच व सरपंच पती यांना धारेवर धरत पाणी प्रश्नाबाबत जाब विचारला. मांगेगाव ग्रामपंचायत अंतर्गत महालक्ष्मीखेडा, मांगेगाव, वझर, देवकरसह आदी गावे येत असून जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमधून या गावांना कायमस्वरुपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी विविध योजना राबवण्यात आलेल्या आहेत.

गावातील नळांना व्यवस्थित पाणी येत नाही, आले तर दूषित पाणीपुरवठा होतो. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमध्येही ग्रामस्थांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचेही यावेळी बोलून दाखवले. वेळेवर पाणी न येणे, दुर्गंधी युक्त पाणी ही प्रमुख मुद्दे या आंदोलनाची होती. सरपंच मुलाची ग्रामपंचायतमध्ये होत असलेली ढवळाढवळ व ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यावरही नाराजी व्यक्त केली. ही साधी साधी कामे होत नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी ही काही ग्रामस्थांनी केली. झोपेचे सोंग घेऊन शांत बसलेल्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ढोल वाजवून मोर्चा काढल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी अशोक गावंडे, रवींद्र गावंडे, माजी सरपंच अशोक पवार, उपसरपंच शिवाजी गावंडे, गणेश उंदरे, तुळशीराम शिंदे, भाऊसाहेब गावंडे, दत्ता गावंडे, शिवाजी गावंडे, परमेश्वर गावंडे, कडुबाळ मावस, दत्तू उदार, जना रोडगे, नंदु परसाय्या आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

हेही वाचा: औरंगाबादेत उभ्या ट्रकवर कंटेनर आदळल्याने चालक ठार

मुद्दा चांगलाच गाजला...

गेल्या महिनाभरापासून ऐन पावसाळ्यात मांगेगाव येथील पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांनी काढलेल्या ढोल बजाओ आंदोलनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरातील ग्रामस्थांनी हा मुद्दा चांगलाच गाजवून लावून धरल्याचे चित्र पहावयास मिळाले.

सदरील ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा करणारा विद्युतपंप गेल्या दोन-तीन दिवसापासून खराब झाल्यामुळे बंद असल्याने तो पंप तात्काळ दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.

-आसाराम धनुरे (ग्राम विकास अधिकारी)

loading image
go to top