Diwali : गोरगरिबांच्या ‘आनंदाचा शिधा’त विघ्न

दिवाळीसाठी किट : औरंगाबाद, नाशिकमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बंद
Diwali
Diwali esakal

औरंगाबाद : गरिबांना आनंदाने, गोड पदार्थांनी दिवाळी साजरी करता यावी यासाठी मोठा गाजावाजा करून ‘आनंदाचा शिधा’ किट राज्य सरकारने वितरणासाठी आणली. मात्र, ऑनलाइन बायोमेट्रिक यंत्रणा बंद असल्याने शनिवारपासून किटचे वाटप झाले नाही. शनिवार आणि रविवारी रेशन दुकानांसमोर गरीब नागरिक ताटकळ्यानंतर दुपारनंतर काही दुकानात ऑफलाइन पद्धतीने किटचे वाटप करण्यास सुरवात झाली. ऐन दिवाळीत गरिबांना ऑनलाइन यंत्रणेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आनंदाचा शिधाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. या किटमध्ये प्रत्येकी एक किलो चणा डाळ, साखर, रवा आणि १ लिटर पामतेल आहे. या किटचे लाभार्थ्यांना १०० रुपयांत वाटप केले जात आहे. जिल्ह्यात याचे जवळपास ६ लाखांवर लाभार्थी आहेत. रेशन दुकानांवर किट आल्यानंतर शनिवार पासून लाभार्थींनी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. मात्र, रेशन घेताना अंगठ्याचे बायोमेट्रिक घेतले जाते, मात्र हीच यंत्रणा बंद असल्याने शनिवारी बहुतांश दुकानात किटचे वाटप झाले नाही. रविवारी सकाळपासून हीच स्थिती असल्याने दुपारनंतर लाभार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने शिधा वाटप करण्यासाठी एक फॉर्म पाठविण्यात आला. सर्व नोंदी करून अखेर लाभार्थ्यांना किट वाटप सुरू झाले.

किल्ले धारूरमध्ये शिधा उशिरा

किल्ले धारूर (जि.बीड) ः सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या अन्न संचाच्या वितरणाची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र, तालुक्यातील ६१ टक्के नागरिकांना दिवाळीपूर्वी शिधा जिन्नसांचा पुरवठाच झाला नाही. यामुळे दिवाळी शिधा वाटपाचे सरकारकडून गाजर दाखविण्यात आल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अन्न संचाच्या वितरणाची घोषणा केली होती. पण, तालुक्यातील १२० दुकानदारांपैकी ग्रामीण भागातील ३० तर शहरातील केवळ १६ दुकानदारांना शिधाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली

आदिवासींना ऑफलाईन ‘शिधा’

नाशिक : ‘आनंदाचा शिधा’ वाटपात मशिनचे सर्व्हर डाऊन असल्याने अडचण आल्याने जिल्ह्यात विशेषत: आदिवासी भागात अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवल्याने आता हा शिधा जिथे अडचण असेल तेथे ऑफलाइन देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तशा सूचना पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत हे किट पोहोचले असले तरी सर्व्हर डाउन असल्यामुळे अडचणी येत आहेत. काहींना शिधा मिळाला तर अनेकांना या तांत्रिक अडचणींमुळे शिधा मिळू शकलेला नव्हता. त्यामुळे आता हा शिधा ऑफलाइन देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने केली आहे.

ऑफलाइनची सोय तात्पुरतीच

ऑफलाइन शिधा वितरणाची नोंद घेताना लाभधारकांचे नाव, शिधापत्रिकेचे शेवटचे चार अंक, मोबाईल क्रमांक, दिलेल्या शिधाजिन्नसचा तपशील, प्राप्त रक्कम (शंभर रुपये) आणि लाभाधारकाची सही घ्यावी लागणार आहे. ही परवानगी केवल ‘आनंदाचा शिधा’ साठीच आहे. नियमित धान्य आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत धान्यासाठी ऑनलाइनचीच पद्धत कायम राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com