दुष्काळाची झळ जनावरांच्या चाऱ्याला
कडब्याच्या एका पेंडीसाठी मोजावे लागताहेत ५० रुपये
..........
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २२ ः यंदाच्या तीव्र दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. पुढील वर्षभरासाठी गोठ्यातील जनावरांच्या चाऱ्याची सोय कशी करायची, या चिंतेत पशुपालक आणि शेतकरी अडकले आहेत. या टंचाईमुळे सध्या ज्वारीच्या कडब्याला सोन्याचे मोल आले असून, त्याचे दर मार्च-एप्रिलमधील सुगीच्या तुलनेत दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे वाया गेलेल्या सोयाबीनचे भुस्कटावर जनावरांचे पोट भरण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.
बाजारात अत्यल्प आवक
मार्च-एप्रिलच्या सुगीच्या काळात जो कडबा २ हजार ते २५०० रुपये प्रतिशेकडा विकला जात होता, तोच दर आता दुष्काळामुळे थेट ४ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. बाजारात क्विंटलचे दर १,७०० ते २,००० रुपये झाले आहेत. दोन ते अडीच किलो वजनाची एक पेंडी ५० रुपयांना पडत असून, एवढी मोठी किंमत मोजूनही कडबा मिळणे कठीण झाले आहे. मागील रब्बीत ज्वारीचे घटलेले क्षेत्र आणि भविष्यातील चाऱ्याची चिंता यामुळे पशुपालक स्वतःकडील कडबा विकायला तयार नाहीत, ज्यामुळे बाजारातील आवक प्रचंड घटली आहे.
...................
((चौकट))
परतीच्या पावसावर चाऱ्याचे गणित अवलंबून
परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यास येत्या रब्बी हंगामात ज्वारी, तसेच इतर चारा पिके घेण्याचा मार्ग मोकळा होईल. समाधानकारक पाऊस न झाल्यास रब्बी हंगाम संकटात येऊन चाऱ्याचे, कडब्याची नवीन आवक होण्यात अडचणी येतील. त्यामुळे उन्हाळ्यात चाऱ्याची भीषण टंचाई जाणवेल. त्यामुळे चाऱ्याचे गणित आता परतीचा पाऊस कसा होतो, यावर अवलंबून आहे.
...................
((कोट))
इतर वेळी बार्शीच्या कडबा मार्केटमध्ये दररोज ८० वाहनांतून तब्बल १६० टन माल येत असे. मात्र, यंदा धाराशिवसह आसपासच्या भागातून आवक खूपच कमी आहे. सध्या केवळ २५ वाहनांतून ५० टन माल येत आहे. दरवर्षी या काळात ८० वाहनांतून १६० टन कडबा रोज बाजारात येत असतो. सध्या गव्हाचा भुस्सा पंजाबहून मागवावा लागत आहे. शेतकरी कडबा विकायला तयार नाहीत. त्यामुळे दर वाढले आहेत.
- संतोष बागमार, कडबा खरेदीदार, बार्शी
.........
((कोट))
दुष्काळी स्थिती अतिशय गंभीर आहे. पुढील ९-१० महिने जनावरांना काय खाऊ घालायचे हा प्रश्न आहे. गंज लावून ठेवलेला कडबा संपत आला असून केवळ ५०० पेंड्या उरल्या आहेत. आता कडबा विकत घेणे आवाक्याबाहेर गेल्याने वाया गेलेल्या सोयाबीनच्या भुस्कटाचाच चारा म्हणून वापर करावा लागणार आहे.
- अमोल माळी, शेतकरी व पशुपालक, भूम
......
धाराशिव ः जनावरांच्या चाऱ्याची वर्षभराची सोय म्हणून शेतकरी प्रमोद माळी यांनी कडब्याची अशी गंज लावून ठेवली आहे.
फोटो क्रमांक ः OSM26B07056