Fake Notes : वाळूजमार्गे चक्क छावणीतून शहरात आल्या बनावट नोटा; संशयित जावळेने दिली कबुली

दुर्लक्ष भोवले अन् ‘मेजर’चे फावले!
fake notes come to chhatrapati sambhaji nagar from camp through waluj suspect confessed
fake notes come to chhatrapati sambhaji nagar from camp through waluj suspect confessedesakal

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणात आरोपी राहुल जावळे याची कसून चौकशी केली. यामध्ये त्याने ‘मेजर’ नावाच्या आरोपीकडून वाळूजमार्गे या नोटांचा पुरवठा होत असल्याची कबुली पोलिसांकडे दिली. ३५ हजार खऱ्या नोटांच्या बदल्यात १ लाखांच्या बनावट नोटा राहुल खरेदी करत होता.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या कर्णपुरा येथील यात्रेत बनावट नोटांचा प्रकार उघडकीस आला होता; तेव्हाच छावणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असती तर हा प्रकार आधीच उघडकीस आला असता.

बनावट नोटा प्रकरणात सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी राहुल जावळे हा प्रमुख आरोपीपैकी एक आहे. राहुल हा स्वतः डीटीपी ऑपरेटर म्हणून काही महिन्यांपूर्वी एका सेंटरमध्ये काम करत होता.

दीड महिन्यांपूर्वी ‘मेजर’ नाव असलेल्या आरोपीसोबत आपली ओळख झाल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. ‘मेजर’ने ३५ हजारांच्या बदल्यात बनावट १ लाख रुपये देण्याचे आमिष राहुलला दाखवले. झटपट श्रीमंत होण्यासाठी राहुल या गोष्टीला तयार झाला.

चक्क वर्गणी करून खरेदी केले बनावट एक लाख!

मोरे आणि ४ अल्पवयीन आरोपीकडे बनावट नोटा खरेदी करण्यासाठी रक्कम नव्हती. त्यामुळे या सर्व आरोपींनी एकत्रित २२ हजारांची रक्कम उभी केली आणि बनावट एक लाख रुपये विकत घेतले. किराणा दुकान, मेडिकल, पानटपरी, छोटी दुकाने यांना ‘लक्ष्य’ करीत ही टोळी बनावट नोटा खपवत होती. आतापर्यंत ‘मेजर’कडून आरोपी राहुलने बनावट साडेतीन लाख रुपये घेतले असून एक लाख ४० हजार चलनात आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

राहुल घेत होता पोलीसाचे सोंग

जावळे हा स्वतः पोलीस असल्याचे भासवत होता. ट्रू कॉलरवर नंबर सेव्ह करताना त्याने पीएसआय जावळे असे नाव सेव्ह केले होते. तसेच व्हाटसअप डीपीवर देखील त्याने ‘महाराष्ट्र पोलीस’ असलेला लोगो लावला होता. दुचाकीवर फिरताना तो तोंडाला महाराष्ट्र पोलीस लिहिलेला निळा मास्क वापरत असल्याचे समोर आले आहे.

एकाला सोबत घेत बनवली अल्पवयीन मुलांची टोळी

राहुलने ‘मेजर’कडून बनावट नोटा खरेदी केल्यानंतर त्या बाजारात चलनात आणण्यासाठी नवीन शक्कल लढवली. त्याच्या एका मित्रामार्फत त्याची देवेंद्र मोरेसोबत भेट झाली. मोरेला त्याने बनावट नोटा चलनात आणण्यासाठी कमीशन देण्याचे आमिष दाखवले. मोरे बेरोजगार असल्यामुळे तो या गोष्टीसाठी तयार झाला. संजयनगर, मुकुंदवाडी येथील अल्पवयीन मुलांची टोळी त्याने तयार केली.

छावणी पोलिसांनी लक्ष दिले असते तर..

या टोळीने कर्पुरा यात्रेत ५०० च्या बनावट नोटा चलनात आणल्या. त्या वेळी हा प्रकार काही दुकानदारांच्या लक्षात आल्यामुळे छावणी पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी ३ बनावट नोटा देखील जप्त केल्या होत्या. मात्र, हा प्रकार गांभीर्याने घेण्यात आला नसल्याने हे आरोपी हाती लागले नव्हते.

बनावट नोटा नेमक्या तयार कुठे झाल्या?

पोलीस उपायुक्त परिमंडळ २ आणि मुकुंदवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट नोटा प्रकरणातील प्याद्यांना अटक केली आहे. यात ४ तर अल्पवयीन मुले आहेत. मात्र, पोलीस या गुन्ह्यातील मुख्य आरोपीपर्यंत पोचले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल जावळे हा मेजर नावाच्या आरोपीचे नाव घेत आहे.

मात्र, हा मेजर कोण, कुठला याचा अद्याप पोलिसांना उलगडा झालेला नाही. या बनावट नोटांचे नेमके कनेक्शन कुठपर्यंत आहे, हे देखील पोलिसांना ठोस सांगता आलेले नाही. डीटीपी ऑपरेटर असलेल्या राहुलने या नोटा स्वतः तयार केल्या का? या नोटा शहरात तयार करण्यात येत होत्या की बाहेरून पुरवठा करण्यात येत होता आदी महत्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत.

पकडलेले आरोपी हे मेजर नावाच्या आरोपीकडून या नोटा घेतल्याचे सांगत आहे. या बनावट नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसतात. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु असून तो ताब्यात आल्यानंतर या नोटा शहरात तयार करण्यात आल्या अथवा बाहेरून पुरवठा झाला हे स्पष्ट होईल.

— शीलवंत नांदेडकर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com