पान ४ साठी

पान ४ साठी
Published on: 
‘शेतकऱ्यांच्या पाठीशी, धीर सोडू नका’ शिरूर कासार ः पावसाने ओढ दिल्याने आष्टी, पाटोदा आणि शिरूरकासार तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिरूर कासार तालुक्यात आमदार सुरेश धस यांनी दुष्काळ निवारण आढावा बैठका घेतल्या. ते म्हणाले की, महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कुणीही धीर सोडू नये. मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी गावोगावी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच जायकवाडीतून ३.५७ टीएमसी पाणी आणण्यासाठी व मनरेगातून काम देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले. चारा छावण्या किंवा थेट अनुदानाबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आमदार धस यांनी स्पष्ट करत विरोधकांच्या जनआक्रोश मोर्चावरही जोरदार टीका यावेळी त्यांनी केली. ------ फोटो आहे पाण्यासाठी खारुताईची तगमग परळी वैजनाथ ः जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून माणसांबरोबरच मुक्या जीवांनाही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. थेंबभर पाण्यासाठी तगमग करणाऱ्या एका चिमुकल्या खारुताईचे दृश्य दुष्काळाची भीषणता अधोरेखित करणारे आहे. ------- उधारीवरून तरुणाला बेदम मारहाण बीड ः धाब्यावरील पैशांच्या उधारीवरून एका तरुणाला पळवून नेत पट्ट्याने, काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कुमशी रोड परिसरात घडली आहे. अमोल बबन शिंदे असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. २ ऑक्टोबरला रात्री बळिराम मोहिते याने अमोलला दुचाकीवर बसवून मोकळ्या जागेत नेले. तेथे अगोदरच असलेल्या टोळक्याने पैशांच्या वादातून अमोलला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. प्रकरणी तपास सुरु आहे. ------ हुंड्यासाठी विवाहितेचा छळ बीड ः लग्नात ठरल्याप्रमाणे सोने, लॅपटॉप व नवीन गाडी आणण्यासाठी केज येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. वैष्णवी बाजीराव भराटे यांचा विवाह सोमेश योगीराज थोरात यांच्याशी झाला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी त्यांना टोमणे मारणे, मारहाण करणे व चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने छळ करण्यास सुरवात केली. तसेच नोकरी करू न देता त्यांची शैक्षणिक कागदपत्रे काढून घेतली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पती सोमेश थोरात, सासरे वकील योगीराज थोरात, सासू नंदा थोरात आणि नणंद योगेश्वरी थोरात यांच्यावर पोलिसांनी आता रीतसर गुन्हा नोंदवून या घटनेचा पुढील तपास वेगाने सुरू केला आहे. ------- परळीत मोबाइल चोर जेरबंद परळी वैजनाथ ः शहरातील न्यू आर्यन मोबाइल शॉपी हे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने ग्राहकांचे दुरुस्तीला आलेले व नवे असे ७० मोबाइल आणि गल्ल्यातील रोख रक्कम पळवली होती. चार ऑक्टोबरला पहाटे घडलेल्या या घटनेप्रकरणी दुकान मालक गणेश तोडकरी यांच्या तक्रारीवरून संभाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तपास पथकाने तांत्रिक माहिती व परळी ते परभणी दरम्यानचे तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोराचा अचूक सुगावा लावला. याप्रकरणी पोलिसांनी शाहरूख हमीद शेख याला परभणी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा लाख एकतीस हजार चारशे वीस रुपये किमतीचे एकूण ७५ मोबाईल जप्त करण्यात आले असून, यात माजलगाव येथील चोरीचा एक मोठा गुन्हाही उघडकीस आला आहे. ------ शिरूर कासारच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण सुरू शिरूर कासार ः शहरातील जिजामाता चौक ते जुने पोलिस ठाणे या मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि धुळीमुळे नागरिक, व्यापारी तसेच वाहनचालक त्रस्त झाले होते. दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. नागरिकांच्या या गंभीर समस्येची आमदार सुरेश धस यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी संबंधित यंत्रणेला थेट सूचना करून रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे कडक निर्देश दिले. त्यानंतर गुरुवारी प्रत्यक्ष कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. या कामामुळे वाहतूक सुरळीत होणार असून नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय कायमची दूर होणार आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने शहरवासीयांमध्ये आता मोठे समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे. ------ धर्मराज गुंजाळ यांची जिल्हाध्यक्षपदी निवड बीड ः वडार समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी नगर परिषदेचे विद्यमान सभापती धर्मराज उर्फ बाळासाहेब गुंजाळ यांची नुकतीच अधिकृत निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चोघुले यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही महत्त्वपूर्ण निवड जाहीर केली. या निवडीबद्दल सर्व समाजबांधव, मित्रपरिवार आणि मान्यवरांकडून सभापती बाळासाहेब गुंजाळ यांचे अभिनंदन केले जात आहे. ------- सेवानिवृत्त शिक्षकाचा अपघातात मृत्यू गेवराई ः गेवराई-चकलांबा नव्याने झालेल्या महामार्गावर सोमवारी रात्री दहा वाजता दुचाकीला झालेल्या अपघातात सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव खेडकर (वय ६१, रा. चकलांबा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते चकलांबा येथील शाळेतून सहा महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले होते. सोमवारी रात्री गेवराईहून गावाकडे परतताना देवपिंप्री गावात टाकण्यात आलेल्या मोठमोठ्या गतिरोधकांचा त्यांना अंधारात अंदाज आला नाही. गतिरोधकावर कुठलेही सूचना फलक किंवा रंगपट्टे नसल्यामुळे त्यांची दुचाकी वेगात आदळली आणि या भयंकर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. -------- ‘शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट मदत जमा करा’ पाटोदा ः पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पाटोदा तालुक्यातील खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मूग व उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून उभी पिके करपली आहेत. पाहणी दौरे आणि पंचनाम्यांमध्ये वेळ न घालवता दिवाळीपूर्वी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट आर्थिक मदत त्वरित जमा करावी, अशी आक्रमक मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव यांनी केली. मंत्र्यांचे पाहणी दौरे सुरू असले तरी शेतकऱ्यांना आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष पैशांची अत्यंत गरज आहे. शासनाने तातडीने मदत न दिल्यास काँग्रेसच्या वतीने तालुक्यात तीव्र आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा थेट इशारा राहुल जाधव यांनी दिला आहे. ---- भगिनी निवेदिता कन्या विद्यालयाचा संघ विभागीय स्पर्धेत कडा ः बीड येथे नुकत्याच पार पडलेल्या १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत कडा येथील भगिनी निवेदिता कन्या विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. परभणी येथे १२ ऑक्टोबरला होणाऱ्या स्पर्धेत हा संघ सहभागी होईल. विजयी संघात शिवांजली वाल्मिक कर्डिले, सानिका शहादेव सावंत, श्रेया अशोक औटे, कोमल सतीश रोमाडे आणि वैष्णवी जालिंदर कुलाळ या विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्यांना शिक्षक परमेश्वर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनील देशमुख व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे मनापासून अभिनंदन केले. ----- सफा शेख हिची रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड कडा ः आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील १४ वर्षीय सफा शेरअली शेख हिने रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येत्या २२ व २३ ऑक्टोबरला ही स्पर्धा होणार असून, सफाच्या यशामुळे साबलखेडसह आष्टी तालुक्यातून तिचे कौतुक होत आहे. सफा शेख ही कडा येथील इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. तिला टीम टॉपर रायफल शूटिंग क्लबचे प्रशिक्षक अहमद पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ----- गंगा माउली शुगरचा गळीत हंगाम सुरू केज ः गंगा माउली शुगरच्या पाचव्या गळीत हंगामाचा प्रारंभ माजी खा. रजनी पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी कारखान्याचे चेअरमन लक्ष्मण मोरे यांनी ऊस उत्पादकांना प्रतिटन तीन हजार रुपये पहिली उचल जाहीर केली. तसेच सीबीजी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेला हा कारखाना शेतकऱ्यांना वेळेत ऊसबिले देत असून मोरे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे प्रगती करत असल्याचे रजनी पाटील म्हणाल्या. कार्यक्रमास प्रकाश महाराज बोधले, उद्धव आपेगावकर, किरण पाटील, काँग्रेसचे राहुल सोनवणे, राजेंद्र बोडके, मयूर बोडके, नवनाथ थोटे व अविनाश मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले, तर सर्वांचे आभार अविनाश आदनाक यांनी मानले. ------- शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा केज ः मागील हंगामातील थकीत ऊसबिले तातडीने मिळावीत, यंदाचा नवा ऊसदर त्वरित जाहीर करावा आणि सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऊसाला प्रतिटन ५०० रुपये अनुदान देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी मांजरा ग्रीन बेल्टमधील ऊस उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. धनेगाव कॅम्प येथे झालेल्या बैठकीत, अंबासाखर, येडेश्वरी आणि गंगामाऊली कारखान्यांकडील थकीत रक्कम देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत योग्य भूमिका घ्यावी, असे आवाहन नेते कुलदीप करपे यांनी यावेळी स्पष्टपणे केले आहे. प्रशासनाने व कारखान्यांनी मागण्यांची दखल न घेतल्यास मंगळवारी धनेगाव फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा अंतिम इशारा या बैठकीत देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com