ABD26J79054 ABD26J79053
--------
शाकाहारी, मांसाहाराची सरमिसळ
----
‘शेळके मामा ढाब्या’वर ‘एफडीआय’चा छापा, अन्न परवाना निलंबित
---
छत्रपती संभाजीनगर, ता. ९ ः अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शरणापूर फाटा परिसरातील शेळके मामा ढाब्यावर बुधवारी (ता. नऊ) धाड टाकली. यावेळी शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे न ठेवता सरमिसळ करणे, अस्वच्छता, कीटक-झुरळांचा वावर आदी प्रकार समोर आला. यामुळे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियम व विनियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ‘एफडीए’ने ‘शेळके मामा ढाबा रेस्टॉरंट’चा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती ‘एफडीए’तर्फे देण्यात आली.
अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी यापूर्वी रेस्टॉरंटची तपासणी करून त्रुटी दूर करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानंतर झालेल्या फेरतपासणीतही विविध त्रुटी कायम असल्याचे समोर आले होते. अन्न हाताळणीच्या ठिकाणी पाणी साचणे, निचरा व्यवस्थेतील त्रुटी, खाद्यपदार्थांच्या प्रयोगशाळा चाचण्यांच्या नोंदींचा अभाव, अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पॅकेजिंग साहित्याबाबत आवश्यक माहिती नोंदी नसणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे आदी त्रुटीही आढळल्या. महत्त्वाचे म्हणजे अन्न हाताळणारे कर्मचारी अप्रॉन, हातमोजे, हेड गिअर, शू कव्हर वापरत नसल्याचे तपासणीत समोर आले. त्यानुसार, सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी जनहिताच्या दृष्टीने निलंबनाचे आदेश दिले. निलंबनाच्या कालावधीत संबंधित परवान्याअंतर्गत अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
----
‘पिझ्झा हट’वरही कारवाई
बजाजनगर परिसरातील (वाळूज एमआयडीसी) येथील मे. सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेड (पिझ्झा हट) यांनाही अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी पिझ्झा हटचा परवाना निलंबित करण्यात आला. येथे व्हेज आणि नॉन व्हेज पिझ्झासाठी एकाच ओव्हनचा वापर केला जात होता. खाद्यपदार्थांच्या चाचण्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमार्फत केल्याच्या कोणत्याही नोंदी नव्हत्या. कामाच्या ठिकाणी स्वच्छता, घाण व कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी योग्य काळजी घेतली जात नव्हती. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची वेळोवेळी गुणवत्ता (रंग, चव आणि तरंगणारे घटक) तपासली जात नव्हती. पॅकेजिंग मटेरियल फूड ग्रेडचे असल्याचे किंवा एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. महत्त्वाचे म्हणजे ‘सर्व अन्नपदार्थ व्हेजिटेबल सोयाबीन तेलात केले जातात’, असा बोर्ड असताना प्रत्यक्षात मात्र मिक्स व्हेजिटेबल फॅट आणि राईस ब्रान तेलाचा वापर केला जात असल्याचे समोर आले.