esakal | वाढीव दराने खत विक्री होतेय? मग 'अशी' करा तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

fertilizers

वाढीव दराने खत विक्री होतेय? मग 'अशी' करा तक्रार

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद: जिल्ह्यात सोमवारी इफको (IFFCO) कंपनीची १०:२६:२६ या खताची रेक आली. मात्र ही रेक सुधारित दर घोषित होण्यापूर्वी निघाल्याने या बॅगांवर १७७५ रूपये असा दर छापलेला आहे (fertilizer prices). असे असले तरी इफको कंपनीने घोषित केलेल्या सुधारित दर ११७५ रुपये असल्याने याची याच दराने विक्रेत्यांनी विक्री करावयाची आहे. शेतकऱ्यांनीही सुधारित किंमतीची शहानिशा करुन खरेदी करावी. तसेच चढ्या दराने विक्री होत असेल तर तात्काळ तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या एनबीएस (न्युट्रीयंट बेसड पॉलिसी) पॉलिसीनुसार युरिया वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचे अधिकार संबंधित खत उत्पादक कंपनीला आहेत. एप्रिल २०२१ पासून युरिया वगळता डीएपी, संयुक्त खते, एमओपी, एसएसपी या रासायनिक खतांच्या किमती खत उत्पादक कंपन्यांनी वाढवल्या होत्या. केंद्र शासनाने २० मे २०२१ च्या अधिसुचनेनुसार फॉस्फेट ह्या अन्नद्रव्यावरील अनुदानात १४.८८ रूपये प्रति किलोग्रॅमवरून ४५.३२ रूपये किलो ग्रॅम एवढी वाढ केली आहे. त्यामुळे डीएपी, संयुक्त खते, एमओपी, एसएसपी या खतांच्या किंमती पुन्हा कमी झाल्या आहेत. यामुळे विविध खत कंपन्यांनी आपापल्या सुधारित किंमती नव्याने जाहीर केलेल्या आहेत. याची सर्व विक्रेते व शेतकऱ्यांनी नोंद घेऊन त्यानुसार खतांची खरेदी व विक्री करावयाची आहे.

हेही वाचा: मराठवाड्यातील रुग्णसंख्या घटतेय पण बीडमधील परिस्थिती चिंताजनक

तालुका व जिल्हा स्तरावरुन तक्रारीची तात्काळ दक्षता घेऊन संबधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे , कृषि विकास अधिकारी आनंद गंजेवार व जिल्हा परिषदेचे कृषि सभापती एल. जी. गायकवाड यांनी संयुक्तपणे केले आहे. विक्रेता सुधारित दराने विक्री करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी किंवा जिल्हा संनियंत्रण कक्षाच्या ०२४०-२३२९७१७ या दुरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा: PM CARES Fund: 'व्हेंटिलेटर्सला राजकीय रंग देऊ नका'

सुधारीत दरांचे फलक लावा-
काही विक्रेत्यांकडे सुधारित किमतीपेक्षा ही कमी किंमतीत असलेले खत शिल्लक असल्यास त्यांनी त्या कमी किंमतीनेच खत विक्री करावी. विक्रेत्यांनी त्यांच्याकडील सुधारित दरांची भाव फलकावर नोंद घेणे आवश्यक असून त्यानुसार त्यांनी त्यांचे फलक अद्यावत करणे बंधनकारक आहे.