पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या हवाली, शासकीय संकलन केंद्रे बंदच

Cotton Purchasing Centre At Pachod
Cotton Purchasing Centre At Pachod

पाचोड (जि.औरंगाबाद) : दुष्काळासह निसर्गाच्या विविध लहरीपणाने होरपळलेला शेतकरी पहिल्याच वेचणीचा कापूस शासकीय कापूस संकलन केंद्रे बंद असल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या घशात घालत आहेत. आठवडे बाजारासह गावागावात व्यापारी रस्त्या- बोळ्यात, बांधावर काटे उभारून कापसाची खरेदी करीत आहेत. तूर्तास पहिल्या वेचणीच्या कापसाला प्रतिक्विंटल साडेतीन ते चार हजार रुपयाचा भाव मिळत आहे.

व्यापारी कापसाच्या आद्रतेचे कारण पुढे करून शासकीय हमी भावाकडे हेतु पुरस्सरपणे दुर्लक्ष करीत आहे. एकंदरीत आठवडे बाजारासह गावागावात शेंगदाण्याच्या पुड्या विकल्या जाव्यात. त्याप्रमाणे कापुस विक्री होत आहे. तुटपुंज्या रकमेतून कापूस उत्पादक आपल्या गरजांची पूर्तता करीत असल्याचे चित्र पाचोडसह (ता.पैठण) परिसरात पाहावयास मिळते. गेल्या आठ-दहा वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना यंदा वरुणराजाने वेळेवर व दमदार हजेरी लावल्याने दिलासा मिळाला.

मात्र सुरवातीपासूनच पाऊस सुरू असल्याने भारी व काळीच्या जमिनीतील पिके वायाला गेली, तर हलक्या व मुरबाड रानातील तीस टक्के कापसासह खरिपाची पिके तरली. त्यातही परतीच्या पावसामुळे कापसाचे पिक वायाला गेले. अपेक्षित उत्पन्नाऐवजी निराशाच पदरी आली. त्यातच सततच्या पावसाने 'लाल्या'चा प्रार्दूभाव वाढून दहा मंडळाअंतर्गत ५७ हजार ५०९ हेक्टरवरील कापसाचे पिक संकटात सापडले. प्रथमच बारा वर्षानंतर दसऱ्याला पूजेसाठी “सकुना”चा कापूस घरात येण्यास प्रारंभ होण्यापूर्वीच कापसाच्या उभ्या झाडा वरच कापसाच्या वाती झाल्या.

अद्याप शासकीय कापूस संकलन केंद्रे बंद आहेत. दसऱ्यालाही ही केंद्रे सुरु होण्याची चिन्हे दिसेनात. व्यापारी अत्यल्प दराने कापसाची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे परराज्यातील काट्याकडे लागले आहे. परंतु स्थानिक व्यापारी मुहूर्त म्हणून स्वत:चे काटे उभारून आठवडे बाजारासह गावोगावी पहिल्याच वेचणीचा कापूस खरेदीचा सपाटा सुरु केला आहे. व्यापाऱ्यानी मागील आठवडे कापसाच्या आर्द्रताचे कारण पुढे करून २८०० रुपये प्रतिक्विंटल कापसाची खरेदी केली. अन् आता ३५०० ते ४२०० रुपये क्विंटल दराने कापुस खरेदी करत आहे.

कापुस वेचणीचा दर प्रतिकिलो चौदा रुपये असल्याने शेतकऱ्यांना मजूरासोबतच बाजारभाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. बहुतांश ठिकाणी ऐन रब्बीच्या हंगामातच कापूस वेचणीस आल्याने मजूराअभावी तो शेतातच तळून तर पावसाने गळून जात आहे. अनेक ठिकाणी एकदाच वेचणी होऊन सुरवातीच्या एकाच बहराचे उत्पादन पदरात पडून आता शेतात केवळ पऱ्हाटीच उभी राहीली. अतिवृष्टीमुळे कापसाचा हंगाम आटोपता झाला असला तरी, अद्याप पाचोडसह पैठण, बालानगर, निलजगाव, विहामांडवा, बिडकीन, लोहगाव येथील शासकीय कापूस संकलन केंद्रे बंद आहेत.

कापसाची आवक जेमतेम असून शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने यंदा कापसाचे आगार म्हणून परिचित असलेल्या पैठण तालुक्यातील कापूस काळवंडल्याचे चित्र पाहावयास मिळते. पाचोड येथे स्थानिक व्यापाऱ्यासह परराज्यातील व्यापाऱ्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून महामार्गालगत मोठमोठे दहा ते बारा जिनिंग प्रेसिंग उभारले. मात्र अलिकडील काळात निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पन्नात कमालीची घट झाल्याने जिनिंग प्रेसिंग चार-पाच वर्षांपासून धूळखात पडून आहेत. एवढेच नव्हे तर बियाणे, औषधी, खते, मशागतीवर झालेला खर्च, केलेली उधार-उसनवारी फेडण्याची, मुली-मुलांचे लग्न करण्याची धास्ती कापूस उत्पादकांना लागून आहे.


यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाने पाठ न सोडल्याने खरीप हंगामाची वाट लागली. बी-बियाणे, खते, औषधी व मशागतीवरील खर्चही पदरी पडण्याची शाश्वती राहिली नाही. सावकराचे देणी, उधार -उसनवारी कशी फेडावी अन् पुढील हंगामात शेती कशी कसावी या चिंतेने झोप उडविली आहे. शासनाच्या तुटपुंज्या अनुदानाने एका एकरावरचा ही खर्च निघेना. आत्महत्येशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही.
-  माऊली पठाडे, शेतकरी, कुतुबखेडा


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com