
जालना : अतिवृष्टी अनुदान घोटाळा करताना गुन्हे दाखल झालेल्या २८ महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून इतर जिल्ह्यांतील बॅंक खात्यावर निधी वर्ग केल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित बॅंकांशी पत्रव्यवहार करून या खातेदारांच्या खाते क्रमांकासह अन्य माहिती मागवली आहे. इतर जिल्ह्यांतील बॅंकांचे खातेदार हे जालना जिल्ह्यातील नसल्याचा संशय आहे. दरम्यान संबंधित महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांच्या खात्यांवर निधी वर्ग केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे येत आहे.