कोरोनाने घालविला फुलांचा सुगंध 

Aurangabad City news
Aurangabad City news

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे देवदर्शन बंद, लग्नसमारंभ बंद, कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर त्यावर फुले उधळणेही बंद. या साऱ्यांचा परिणाम फुलशेतीवर झाला आहे. लॉकडाउनमुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अशरक्ष: कंबरडेच मोडले आहे. फुलांचा यंदा सुगंध येण्याऐवजी फुले शेतातच चुरगळून गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी फुलांवर नांगर फिरवला. 

पारंपरिक पिकाला फुलशेतीची जोड देण्यासाठी जिथे थोड्याफार सिंचनाची सोय आहे तिथे शेतकऱ्यांनी २० ते ४० गुंठ्यामध्ये फुले लावली होती. यामध्ये झेंडू, पांढरा, पिवळा गलंडा, शेवंती, निशिगंध, जर्बेरा, मोगरा, गुलाब यांचा समावेश आहे. काही शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेडनेटमध्ये फुलशेतीचे प्लॉट तयार केले; परंतु लॉकडाउन सुरू झाला आणि फुले शेतातच सडून गेली.

फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथे तब्बल २८ शेतकऱ्यांनी फुलशेती केली होती. येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर भोकरे यांनी सांगितले, की गावातल्या शेतकऱ्यांनी जवळपास ३० एकरांमध्ये शेवंती, गलंडा, निशिगंध, गुलाब, झेंडू फुलांची लागवड केली होती. यापैकी आता फक्त आठ एकरांत उद्या लॉकडाउन संपेल तर बाजारात विकू या आशेवर शेतकऱ्यांनी ठेवला आहे. तर तब्बल २०- २२ एकरांतील फुलांवर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला आहे. 

फुलांत सोडल्या बकऱ्या 
आडगाव सरक येथील आजिनाथ डुगले यांनी ३५ गुंठ्यांत गलंडा आणि बिजली ही फुलझाले लावली होती. बाजारात जायचीच सोय राहिली नाही मग फुले कशी नेणार. फुले तशीच खराब झाली. आठ- दहा हजारांचे नुकसान झाले आहे. फुलाच्या वावरात बकऱ्या सोडून दिल्या; पण त्यांनीबी खाल्लं नाही. आता पुन्हा ३० गुंठ्यांत गलंडा आणि शेवंती लावली आहे. जुलैमध्ये ही फुले येतील त्यावेळी झालेले नुकसान भरून निघेल असा त्यांनी आशावाद व्यक्त केला. 
 
मोगऱ्याला प्राधान्य द्यावे 
डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे फुलशेतीतज्ज्ञ किशोर निर्मल म्हणाले, जर्बेरा, डच रोझ, कार्नेशियन यासारखीही विदेशी फुलांची लागवड करत आहेत. वाढता लागवड खर्च यामुळे आधीच हे प्रमाण कमी आहे, त्यात यंदा लॉकडाउनमुळे जी फुले लावली त्याला बाजारपेठच मिळाली नाही. शेतकऱ्यांनी विदेशी फुले लावण्याऐवजी आपल्या येथील वातावरण अनुकूल असणाऱ्या आणि जास्त खर्च नसलेल्या मोगऱ्याचे जास्त उत्पादन घेण्याकडे वळावे. 

सिटी चौकातील फुलबाजाराचा बेरंग 
निजाम काळापासून भरणाऱ्या सिटी चौकातील फुलमार्केटमध्ये गलांडा हे निजामाबादमधून, गुलाब शिर्डीवरून, मोगरा व इतर फुले नांदेड, नगर तर शहर परिसरातील शेतकऱ्यांकडून गलांडा व इतर फुले विक्रीसाठी येतात. दर दिवशी व्यापारी त्याच्या ऑर्डरनुसार हा माल खरेदी करत असतो. सिटी चौकातील फुलमार्केट हे बाजार समितीच्या अधिपत्याखाली येत नाही. यामुळे या मार्केटमध्ये येणाऱ्या फुलांची माहितीची कुठलीच नोंद बाजार समितीकडे नाही. मुख्य हंगाम लॉकडाउनमध्ये गेल्यामुळे आमचे कुटुंब आता उघड्यावर आले आहेत. येथे साधारणता पंधरा ते सोळा होलसेल व्यापारी आहेत, तर शहरात चारशे ते साडेचारशे छोटे-मोठे फुलविक्रेते असल्याचे फूल असोसिएशनचे बाबू भाई यांनी सांगितले. तर नजीम अन्सारी हे फुलाचे ठोक विक्रेते म्हणाले, की आता तर आम्ही डिप्रेशनमध्ये जातो की काय अशी परिस्थिती आहे. 

शहरावर एक नजर 
ठोक फूलविक्रेते १५ ते १६ 
शहरात लहान-मोठे ४०० ते ४५० फूलविक्रेते 
५ ते १० क्विंटल सर्व प्रकारच्या फुलांची आवक 
 एक ते दीड कोटीची उलाढाल 
 ३ ते ५ क्विंटल सर्व प्रकारच्या फुलांची बाजार समितीतील मार्केट 
 निजामाबाद, शिर्डी, नगर, नांदेड, परतूर, पिसादेवी, शहर, पळशी, पोखरी येथून फुलांची आवक 
 आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतूक बंद असल्यामुळे फुलांची वाहतूक बंद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com