
Chhatrapati Sambhaji Nagar: महापालिकेने करून दाखविले, आता जबाबदारी नागरिकांची
छत्रपती संभाजीनगर : महिला-२० परिषदेच्या अनुषंगाने महापालिकेने अवघ्या महिनाभरात शहराचा कायापालट केला. रस्ते, चौक, दुभाजकांमध्ये लावण्यात आलेली झाडे, विद्युत रोषणाई, कारंजे पाहण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून नागरिकांची रात्रीच्या वेळी झुंबड उडत आहे.
शहरातील नागरी समस्यांबाबत वारंवार ओरड होते, पण महापालिकेच्या कामाची प्रथमच वाहवा होत आहे. असे असतानाच काही नतद्रष्टांनी रस्त्यावर लावण्यात आलेल्या कुंड्या चोरणे, झाडे तोडणे, लायटिंग फोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सुशोभीकरणाचे संवर्धन कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
महिला-२० परिषदेच्या तयारीसाठी राज्य शासनाने महापालिकेला ५० कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातून ८५ कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. दुभाजकांचे सुशोभीकरण, चौक, रस्ते, ऐतिहासिक दरवाजांवर विद्युत रोषणाई, ग्लो गार्डन तयार करणे, जागोजागी कृत्रिम झाडांवर रोषणाई, उड्डाणपुलावर रोषणाई, दुभाजकांमध्ये फुलांच्या कुंड्या ठेवणे, मोठ्या झाडांवर विद्युत रोषणाई, अशी कामे करण्यात आली.
या झगमगाटाने संपूर्ण शहराचा लुक बदलला. शहरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचे व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच गेल्या चार दिवसांपासून नागरिकांची रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे. सुशोभीकरणाच्या ठिकाणी थांबून कुटुंबासह सेल्फी घेत आहेत.
विमानतळापासून क्रांती चौकापर्यंत तर दुसरीकडे हर्सूल टी पॉइंटपर्यंत रात्री उशिरापर्यंत गर्दी सुरू आहे. नागरी समस्येवरून महापालिकेच्या कारभाराला नेहमी नाव ठेवणारे नागरिक या सुशोभीकरणाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. अवघ्या महिनाभरात शहराचे चित्र बदलू शकते? हे महापालिकेने सिद्ध करून दाखविले आहे.
पण आता आव्हान आहे ते सुशोभीकरणाचे संवर्धन करण्याचा. कारण गेल्या चार दिवसात अनेक कुंड्या चोरीला गेल्या आहेत. काही ठिकाणी दिवे फोडण्यात आली, कुंड्यांतील झाडे तोडण्यात आली, अशा नागरिकांचा बंदोबस्त कसा करायचा? हा प्रश्न असल्याचे महापालिका अधिकाऱ्याने सांगितले.
तयारी पाहून डोळ्यात अश्रू आले
महिला-२० परिषदेच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी महापालिका, जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. मी तयारीची पाहणी करण्यासाठी शहरात आले होते. त्यावेळचे चित्र पाहून याठिकणी विदेशी पाहुणे कसे येतील? असा प्रश्न पडला होता. पण त्यावेळी मला सांगण्यात आले की, आम्ही करून दाखवू. त्याप्रमाणे संपूर्ण शहर प्रशासनाने सजविले आहे. ही तयारी पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले, अशी प्रतिक्रिया डॉ. पुरेचा यांनी व्यक्त केली.