esakal | लॉकडाउनमध्ये दुसऱ्यांदा हनुमान जयंती साजरी, भाविकांनी लांबूनच घेतले दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनमध्ये दुसऱ्यांदा हनुमान जयंती साजरी, भाविकांनी लांबूनच घेतले दर्शन

लॉकडाउनमध्ये दुसऱ्यांदा हनुमान जयंती साजरी, भाविकांनी लांबूनच घेतले दर्शन

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) :  श्री हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी होणाऱ्या भाविकांच्या रांगा सलग दुसऱ्या वर्षीही लॉकडाऊनमुळे दिसून आल्या नाहीत. हनुमान मंदिरात मंगळवारी (ता.२७) पहाटेच पुजाऱ्यांनी अभिषेकाचा विधी लगबगीने पूर्ण केले. काही भाविक पहाटे पाचपासून दर्शनासाठी जात असल्याचे चित्र दिसून आले. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान राष्ट्रीय महामार्गापासून अडीचशे मीटर लांब असलेल्या काळा मारूती मंदिर  हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर काटेरी फांदे टाकुन रस्ता बंद करून तेथे भाविकांना रोखण्यासाठी पोलिस, होमगार्ड  तैनात करण्यात आले आल्याने भाविकांनी प्रवेशद्वारावरील पुलाच्या कठड्यावर एका दगडाला शेंदूर लावून हनुमानाचे लांबूनच दर्शन घेतले.

हेही वाचा: सर ! माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, काय करू?

शहरातील सर्वात जुना असलेला दक्षिणमुखी हनुमान मंदिरात होणारे हरिजागर व विविध कार्यक्रमाचे आयोजन रद्द करण्यात आले. प्रवेशद्वारावरच भाविकांनी फिजिकल डिस्टन्सचा अवलंब करत दर्शन घेतले. मलंग प्लॉट येथील  वृंदावन नगर, चालुक्य कॉलनी, एस. टी. कॉलनी, डिग्गी रोड, काळामठ, मुळज रोड, जुनी पेठ, सराफ लाईन आदी ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली नाही. ठिक-ठिकाणी दुपारी चारच्या नंतर होणारा काला, गुलालाचा व महाप्रसादाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. काळा मारूती मंदिर परिसरात होणाऱ्या जंगी कुस्त्यासाठी फडही होऊ शकला नाही. दरम्यान लॉकडाऊनच्या स्थितीमुळे अत्यंत साधेपणाने हनुमान जयंती साजरी करण्याची वेळ भाविकावर आली. भाविकांवर लांबूनच साष्टांग दंडवत घालण्याची वेळ आली तर पुजाऱ्यांना मंदिरात बसण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे दुसऱ्यांदा भाविक व पुजाऱ्यावर अशी वेळ आली.

loading image
go to top