esakal | एका तासाच्या कोसळधारेने... औरंगाबादकरांचे हाल-बेहाल
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद

एका तासाच्या कोसळधारेने... औरंगाबादकरांचे हाल-बेहाल

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: शहरात मंगळवारी रात्री झालेल्या ढगफुटीने हाहाकार उडाला. शेकडो घरे, दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाकडे मदतीसाठी धावा घेतला. एक तास अग्निशमन विभागाचे फोन खणखणत होते. तब्बल ६० जणांनी फोन करून मदतीची मागणी केली. त्यानंतर रात्रभर अग्निशमन विभागाच्या जवानांनी धाव घेत २५ ठिकाणी तळमजला व घरात शिरलेले पाणी उपसून काढले. टिळकपथवरील एक भिंतीवर अडकलेल्या महिलेची सुटका केली. बुधवारी (ता. आठ) दिवसभर मदतकार्य सुरूच होते, असे अग्निशमन विभागप्रमुख राजू सुरे यांनी सांगितले.

शहरात मंगळवारी रात्री एका तासामध्ये तब्बल १२४ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. त्यानंतर अवघ्या काही क्षणात शहरात दाणाणाण उडाली. नाले दुथडी भरून वाहू लागल्याने पावसाचे गुडघ्यापर्यंत पाणी रस्त्यावर साचले होते. नाल्याकाठावरील सखल भागातील नागरिकांच्या घरात तसेच बाजारपेठेतील तळमजल्यातील दुकानात पावसाचे पाणी शिरले. पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की, बचाव करण्यासाठी नागरिकांना वेळच मिळाला नाही. घाबरलेल्या नागरिकांनी अग्निशमन विभागाकडे मदतीसाठी याचना सुरू झाली. तासभर फोन खणखणत असल्याने अग्निशमन विभागही गोंधळून गेला. त्यातही रात्रभर २५ ठिकाणी जाऊन तळघरातील दुकाने, घरामध्ये शिरलेले पाणी उपसण्यात आले, असे सुरे यांनी सांगितले.

हेही वाचा: कोरोना काळात वेतनावर औरंगाबाद महापालिकेची उधळपट्टी!

महिलेची केली सुटका
एका कापड दुकानासमोर भिंतीवर महिला अडकल्याची माहिती धीरज पवार यांनी अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान अजिज, सुभाष दुधे यांनी या महिलेची सुटका केली.

या ठिकाणी मदत कार्य
मोतीवाला नगरमधील आयटी वर्ल्ड शाळेतील पाणी उपसले. विभागीय क्रीडा संकुल कार्यालयावर पडलेले झाड बाजूला केले. गोमटेश मार्केट, बालाजीनगर, जाफरगेट, बीड बायपासवरील सहारा सिटी, पुंडलिकनगर, गुरुसाहनीनगर, सिडको एन-३ अजयदीप कॉम्प्लेक्स, औरंगपुरा, रोशनगेट, खिवंसरा पार्क, झांबड हाइट्स, विभागीय आयुक्त कार्यालयात कोसळलेले झाड हटविले. उस्मानपुरा, जवाहर कॉलनी, औरंगपुरा, मयूर पार्क, क्रांती चौक या ठिकाणी पाणी उपसण्याची कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा: पोलिसांच्याच परीक्षेत डमी उमेदवार अन् दुसऱ्याच्या कानाला ‘हेडफोन’!

या भागात झाले नुकसान
क्रांती चौक वॉर्डातील न्यू श्रेयनगर, सिद्धेश्वरनगर भागातील नाल्याची संरक्षक भिंत पडली. दीपाली अपार्टमेंटचीही भिंत कोसळली. श्रेयनगरमधील पुलाजवळील भिंत पडली. त्यामुळे पावसाचे पाणी श्रेयनगर, सिद्धेश्वरनगरमध्ये शिरले. हे पाणी परिसरात उभ्या असलेल्या कारमध्येही शिरले. त्यामुळे सूर्यकांत खंडेलवाल यांनी माजी सभापती राजू वैद्य, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांच्याकडे मदतीची मागणी केली. वैद्य यांनी महापालिकेच्या यंत्रणेला माहिती दिली. वॉर्ड अधिकारी संपत जरारे, अभियंता परदेशी, नाना पाटील, सफाई कर्मचारी दाखल झाले.

loading image
go to top