esakal | पोलिसांच्याच परीक्षेत डमी उमेदवार अन् दुसऱ्याच्या कानाला ‘हेडफोन’!
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद

याप्रकरणी एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोघा परीक्षार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले

पोलिसांच्याच परीक्षेत डमी उमेदवार अन् दुसऱ्याच्या कानाला ‘हेडफोन’!

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: चक्क पोलिस चालक पदाच्याच परीक्षेत एक महिला डमी उमेदवार तर दुसऱ्या उमेदवाराने हेडफोन डिव्हाईस लावून परीक्षा केंद्राबाहेर प्रश्नपत्रिका पाठवत उत्तरे सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोघा परीक्षार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना मदत करणाऱ्यांविरोधातही एमआयडीसी सिडको आणि सातारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर पोलिस दलातर्फे बुधवारी (ता.८) चालक (कॉन्स्टेबल) पदासाठी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात येत होती.

पहिल्या घटनेत सातारा ठाण्याच्या अंमलदार भैरवी बागूल यांच्या फिर्यादीनुसार एमआयटी इंजिनिअरिंग महाविद्यालयात चालक परीक्षेदरम्यान निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता डी. फासाटे, एस. शिरसाठ, के. एच. खिल्लारे, सुरेश चव्हाण मंगेश जाधव, गोपाल देठे, सुचित्रा देव यांचे पथक परीक्षेदरम्यान परीक्षार्थ्यांचे ओळखपत्र, त्यावरील फोटो आदी तपासणी करत असताना सकाळी पावणेदहादरम्यान संशयित अल्पवयीन मुलगी परीक्षेसाठी आली होती. तिची कागदपत्रे पोलिसांच्या पथकाने पाहिले असता, फोटो वेगळा दिसला. त्याविषयी तिची चौकशी करण्यात आली असता तिने आपण दुसऱ्या मुलीच्या नावावर पेपर देण्यास आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अधिकची चौकशी केली असता एका मुलीच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आलेली ही मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले.

हेही वाचा: Nanded Rain: गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

‘तो’ देणार होता ‘तिच्या’साठी पैसे-
दरम्यान, एका मुलीच्या नावावर ही मुलगी पेपर देणार होती. यासाठी तिला संशयित आरोपी रणजित राजपूत (बहुरे) (रा. शेकटा) या युवकाने डमी उमेदवार म्हणून पाठविल्याचेही तपासादरम्यान समोर आले. रणजितने तिच्यासोबत ब्लूटूथ हेडफोन डिव्हाईसही पाठविले होते. या बदल्यात काम फत्ते झाल्यानंतर रणजित हा तिला पैसे देणार होता. काम फत्ते होण्यासाठी खबरदारी म्हणून रणजित याने तिच्याकडे असा टी शर्ट दिला होता, ज्यामध्ये मोबाईल ठेवण्यासाठी खिसा तयार करण्यात आला होता, तसेच खिशाच्या समोर मोबाईलचा कॅमेरा दिसू शकेल असे छिद्र करून देण्यात आले होते.

चिकलठाणा केंद्रावरही ‘हेडफोनवाला’ परीक्षार्थी
एमआयडीसी सिडको ठाण्याच्या हद्दीतील न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयावर सदर पदासाठी परीक्षा होती. दरम्यान निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमरनाथ नागरे, एस. बी. मांटे, दिनकर सोनगिरे, कॉन्स्टेबल पुरी, बनसोडे, सुवर्णा ढाकणे हे परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी होते. दरम्यान राहुल मदन राठोड (२३, रा. पारुंडी तांडा, ता. पैठण) याच्याकडे मोबाईल, मास्टर कार्ड ब्लूटूथ डिव्हाईस, ब्लूटूथ मख्खी हेडफोन आदी साहित्याद्वारे त्याचा बाहेर बसलेला सहकारी सतीश राठोड याच्याकडून उत्तरे मिळविताना पकडला. पुढील तपास उपनिरीक्षक नागरे करत आहेत.

हेही वाचा: नेटवर्कचा परीक्षेत खोडा! विद्यार्थ्यांना मिळणार फेरपरीक्षेची संधी

साडेतीन हजारपैकी केवळ दीड हजारांनी दिली परीक्षा-
शहर पोलिस दलातर्फे बुधवारी सकाळी १० ते ११ः३० या वेळेत घेण्यात आलेल्या पोलिस चालक लेखी परीक्षेसाठी ३३६० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४९१ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. शहरातील विविध १० केंद्रांवर ही परीक्षा पार पडल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र साळोखे यांनी दिली.

loading image
go to top