Hingoli : हिंगोली लोकसभा भाजप लढवणार

डॉ. भागवत कराड यांची माहिती ः आता संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा
BJP
BJPsakal

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघाची जागा भाजप लढविणार आहे. या ठिकाणी भाजपचा उमेदवार जिंकेल, असा सुतोवाच केंद्रीय राज्य अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला. यामुळे शिवसेनेकडे असलेल्या या मतदार संघात विद्यमान खासदार यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. शिवाय भाजपकडून कोण उमेदवार असेल, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी (ता. चार) हिंगोलीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. भाजपने काही लोकसभा जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये हिंगोली लोकसभेच्या जागेचा समावेश असल्याचे कराड यांनी सांगितले.

या ठिकाणी भाजप निवडणूक लढवून जिंकणारच, असा दावा त्यांनी केला. केंद्रीय राज्यमंत्री कराड यांच्या या वक्तव्याने राजकीय मंडळीच्या या संदर्भात चर्चा सुरू सुरू झाल्या आहेत. यावेळी शिवसेनेची जागा भाजप घेणार, अशी चर्चादेखील रंगली आहे. या लोकसभेवर भाजपने दावा केला आहे. त्यासाठी भाजपचे मंत्री, प्रदेश पदाधिकारी हे या लोकसभा मतदार संघात येऊन आगामी निवडणुकीनिमित्त चाचपणी करीत आहेत. भाजपकडून युवा चेहरा म्हणून रामदास पाटील सुमठाणकर यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चाही आहे.

असे आहेत लोकप्रतिनिधी

हिंगोली लोकसभा मतदार संघात भाजपचे तीन आमदार आहेत. शिंदे गटाचा एक आमदार तर राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे. मागील निवडणुकीत या ठिकाणी शिवसेना-भाजप युतीचे हेमंत पाटील यांनी विजय मिळविला. मात्र, शिवसेनेचे फूट पडल्यानंतर खासदार पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

नेत्यांचे दौरे

जिल्ह्यात आतापर्यंत केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांचा जिल्हा दौरा झाला. त्यानंतर भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राज्यमंत्री कराड येऊन गेले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही दौरा होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हिंगोली लोकसभा भाजप लढविणार असल्याची चर्चा रंगत आहे.

हेमंत पाटलांचे काय?

जर भाजपने या ठिकाणी उमेदवार दिला तर शिंदे गटात गेलेल्या खासदार हेमंत पाटलांचे काय होणार, या बाबत चर्चा रंगली आहे.या मतदारसंघांमध्ये सध्या हिंगोली जिल्ह्यामधील तीन, यवतमाळ जिल्ह्यामधील एक आणि नांदेड जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com