Omicron Update Latur - गाव अन् घर न सोडता झाली लागण; ओमिक्रॉन लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona And Omicron Update Marathi News
गाव अन् घर न सोडता झाली लागण; ओमिक्रॉन लागण

Omicron Update : गाव अन् घर न सोडता झाली ओमिक्रॉन लागण...

लातूर : ओमिक्रॉन या कोरोनाच्या (Omicron and Corona) नवीन व्हेरीएंटची लागण आतापर्यंत केवळ परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांनाच झाली. यामुळे परदेशातून आलेल्यांनाच ओमिक्रॉनची बाधा होते, असा आरोग्य विभागाचा(Health Department) समज होता. मात्र, रविवारी विभागाचा हा समज बाजूला पडला. तांदुळजा (ता. लातूर) येथील एका ज्येष्ठ नागरिकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचा अहवाल पुण्याच्या आरोग्य प्रयोगशाळेतून आला आहे. त्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. शनिवारी (ता. आठ) उपचाराअंती घरी सोडल्यानंतर ज्येष्ठाला ओमिक्रॉनचीही लागण झाल्याचे उघड झाले. (Corona And Omicron Update Marathi News)

हेही वाचा: Corona Update : बारामतीत 24 तासात 45 जण बाधित...

या ज्येष्ठ नागरिकाने घर व गाव न सोडताही त्याला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. यामुळे ओमिक्रॉन आता कोणालाही होऊ शकतो, असे यावरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी याला दुजोरा दिला. आता घरी पाठवलेल्या त्या रुग्णांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. आरटीपीसीआरनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरच त्यांना पुन्हा उपचारासाठी परत बोलावण्यात येणार असल्याचेही डॉ. वडगावे यांनी स्पष्ट केले. यामुळे ओमिक्रॉनचे लोण ग्रामीण भागात पोचल्याचे आणि तो कोणालाही होऊ शकत असल्याचे दिसून आले आहे.

तांदुळजा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला (वय ६०) २८ डिसेंबर रोजी कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यांना ताप असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरटीपीसीआरसाठी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. २९ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या पत्नीला अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे दोघांनाही येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघांच्या संपर्कातील मुलाचा अहवाल मात्र, निगेटिव्ह आला होता.

हेही वाचा: देशात दिवसभरात १.६८ लाख नवे रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४,४६१

परस्पर नमुना पुण्याला

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू आरोग्य प्रयोगशाळेला जिनोम स्विक्वेन्सिंगसाठी परस्पर पाठवण्यात येतात. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर रँडमली हे नमुने पाठवले जातात. ज्येष्ठ नागरिकाच्या पॉझिटिव्ह अहवालानंतर त्याचाही नमुना रँडमली पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवला गेला. दुसरीकडे ज्येष्ठांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर शनिवारी त्यांना घरी सोडण्यात आले आणि रविवारी पुण्याहून त्यांचा अहवाल आरोग्य विभागाकडे आला. त्यानुसार ज्येष्ठाला ओमीक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: "शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी चार्ज दिलाय का?"

जिल्ह्यात ३०३ फॉरेन रिटर्न

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पाचपर्यंत ३०३ जण विविध देशातून प्रवास करून आले आहेत. यात लातूर शहरातील १४५ तर १५८ जण जिल्ह्याच्या विविध भागातील आहे. यातील २९१ प्रवाशांचा संपर्क झाला असून, बारा प्रवाशांचा अजून संपर्क झालेला नाही. संपर्क झालेल्यांपैकी २६९ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यात तिघे पॉझिटिव्ह आले असून, २४८ जण निगेटिव्ह आले आहेत. १८ प्रवाशांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी दोघांचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. त्यापैकी एकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे पुढे आले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :omicronOmicron Variant
loading image
go to top