लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा १९ सप्टेंबरपासून
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ : शालेय स्तरावरील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोळगे चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केली आहे. ही स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. शुक्रवारी (ता. ४) एका पत्रकार परिषदेत लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा आयोजनाची घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेस औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे, सचिव शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष सचिन मुळे, सहसचिव करण डोगरा, खजिनदार अनिल इरावणे, कार्यकारिणी सदस्य सुशील वकील, सुधीर भालेराव, सुयोग माछर, आजीव सभासद किरण जोशी, चक्रधर दळवी, जगदीश भावठाणकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. माजी रणजीपटू अनंत नेरळकर यांनी स्पर्धेच्या नियोजनाची माहिती पीपीटीद्वारे दिली.
या स्पर्धेत शहरातील २० निमंत्रित शाळांचे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जातील. हे सामने एडीसीए आणि देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. विजेत्या संघाला ५१ हजार रुपये रोख व मानाचा चषक, तर उपविजेत्या संघाला ३१ हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरविणार आहे. याशिवाय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मालिकावीर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर अशी वैयक्तिक पारितोषिके देऊन प्रोत्साहित केले जाईल.
नियोजनासाठी संयोजन समिती
स्पर्धेच्या नियोजनासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून राहुल टेकाळे काम पाहत आहेत. त्यांच्यासोबत समिती सदस्य म्हणून अनंत नेरळकर, सय्यद जमशेद, प्रसाद कुलकर्णी, पवन डोंगरे, जगदीश भावठाणकर, मनोज शाह, ॲड. कल्पेश शाह, विद्याधर पांडे, असिर सिद्दिकी, सिद्धार्थ भरणे, उदय बक्षी आणि हेमंत मुळे हे जबाबदारी सांभाळत आहेत.