औरंगाबाद शहरात आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट

बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार
Kindergarten to 4th grade School Start
Kindergarten to 4th grade School Startesakal

औरंगाबाद : कोरोना संसर्ग वाढताच बंद केलेल्या शाळा पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यात दहावी, बारावी, दुसऱ्या टप्प्यात आठवी, नववी, अकरावी तर तिसऱ्या टप्प्यात पाचवी ते सातवीचे वर्ग सुरळीत सुरू झाल्यानंतर सोमवारपासून (ता.१४) महापालिकेसह खासगी शाळांमधील बालवाडी ते चौथीचे वर्ग व खासगी कोचिंग क्लासेसला अटी-शर्तींच्या अधीन सुरू होणार आहे. यामुळे प्राथमिक शाळांमध्‍ये गेल्‍या दोन वर्षांपासून बंद असलेला किलबिलाट पुन्‍हा एकदा ऐकावयास मिळणार आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यावेळी प्राथमिकच्या वर्गांतील विद्यार्थ्यांना तब्बल दोन वर्षांनंतर शाळेत हजेरी लावण्याची संधी मिळाली होती. प्रसंगी विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद केल्या होत्या. त्यामुळे मुलांच्या आनंदावर विरजण पडले होते. आता मनपा प्रशासनाने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णयावर भर दिला आहे.

तिन्ही टप्प्यांत शाळा सुरळीत सुरू झाल्यानंतर आजपासून बालवाडी ते चौथीचे वर्ग सुरू होणार आहेत. यामुळे आता खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्वपदावर येणार आहे. बालवाडीपासून सर्वच शाळा सुरू झाल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाणार असून याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही लवकरच जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने रविवारी सर्व शाळांमध्ये सॅनिटायझेशन, स्वच्छता करण्यात येत होती.

गर्दी टाळण्यासाठी पालकांना बंदी

कोरोना नियमांच्या पालनासह शाळेत गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या गेटच्या आत प्रवेश देण्यात येऊ नये, असे पालिका प्रशासकांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर, एका वर्गात अधिकाधिक १५ ते २० विद्यार्थीच बसवण्यात यावेत, अशा सूचना शाळांना केलेल्या आहेत.

आजपासून कोचिंग क्लासेसही सुरू

कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद केले होते. मात्र, आता प्रशासकांनी जारी केलेल्या आदेशानुसार शहरातील सोमवारीपासून (ता.१४) पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व कोचिंग क्लासेस सुरू करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. शाळांप्रमाणेच कोरोनाच्या सर्व अटी कोचिंग क्लासेससाठी लागू केलेल्या आहेत.

पहिली ते चौथीच्या ६३७ शाळा

शहरात महापालिकेच्या हद्दीत पालिकेसह खासगी अशा मिळून पहिली ते चौथीपर्यंतच्या एकूण ६३७ शाळा आहेत. या वर्गात एकूण एक लाख १२ हजार ७०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमधील पूर्वतयारीचे काम पूर्ण केले आहे, अशी माहिती सर्व शिक्षा अभियानाचे अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com