esakal | 'हाताला काम नाहीतर सरसकट मदत तरी द्या'

बोलून बातमी शोधा

labour day
'हाताला काम नाहीतर सरसकट मदत तरी द्या'
sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: गेल्या लॉकडाउनमध्ये कामगारांचे मोठे हाल झाले होते. त्यातून थोड्याप्रमाणावर सावरल्यानंतर आता पुन्हा लॉकडाउन लागल्‍यामुळे असंघटित कामगारांचे मोठे हाल होत आहेत. काम द्या अथवा सरसकट मदत देण्याची मागणी कामगारांकडून केली जात आहेत. गेल्या वर्षभरापासून या कामगारांची वाताहत झाली आहे. या काळात कामगारांना खऱ्या अर्थाने अन्नधान्याच्या स्वरूपात मदतीची गरज आहे.

गेल्या लॉकडाउनचा अनुभव सोबत ठेवत काही कामगारांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घरचा रस्ता धरला. तर शहरात राहणारे अनेक कामगारांचे सध्या मोठे हाल सुरू आहेत. काम नसल्याने शहरातील कामगार चौकात कामगारांचे जत्थेच कोणीतरी काम देईल या आशेने थांबून असतात. घरगुती काम करणाऱ्या महिलांचीही हीच स्थिती आहे.

हेही वाचा: दोन्ही पाय तोडून शस्त्राने चिरला गळा; औरंगाबादमधील घटना

राज्य सरकारने जाहीर केलेली दीड हजार रुपयांची मदत मिळेल याचीही अनेक कामगारांना शाश्‍वती नाही. नाक्यावरील कामगार आणि घरगुती कामगार महिलांच्या नोंदणीचे नूतनीकरण झाले नसल्याने हजारो कामगार या मदतीपासून वंचित राहणार आहेत. यामुळे सरसकट मदतीची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा: आईच्या मृत्यूनंतर तीन वेळेस गेला जीव द्यायला!

गेल्या वेळी मदत मिळाली होती. मदतीपेक्षा नियमित कामे मिळावीत. आता आमची कामगार आयुक्तांकडे नोंदणीचे नूतनीकरण झाले नसल्याने राज्य सरकारची मदत मिळेल असे वाटत नाही. १४ दिवसांपासून घरात बसून आहे. रेशनही कोणीच दिलेले नाही. अर्धा दिवस उपाशी राहावे लागत आहे.

-रूपचंद ढवळणपुरे, बांधकाम कामगार

कोरोनामुळे अनेकांनी मोलकरीण महिलांना कामावर येऊ नका, असे सांगितले. तर काहीजण कमी पगारात काम करा म्हणतात. केशरी रेशन कार्ड आहे तरीही रेशन मिळत नाही. आम्ही काय खावं, कसं जगावं हाच प्रश्‍न आहे. कुटुंबाची जबाबदारी असल्याने बिकट परिस्‍थिती सुरू आहे. सरकारने सरसकट मदत द्यावी.

- संगीताबाई नरवडे, मोलकरीण

इमारत बांधकाम, नाक्यावर काम करणारे, घरगुती कामगारासह सर्व असंघटित कामगारांना आठ हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे. कारण इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे १० हजार कोटींहून अधिक पैसे जमा आहेत. त्यातून ही मदत देत या संकटातून बाहेर काढावे.

-मधुकर खिल्लारे, राज्य उपाध्यक्ष, इमारत बांधकाम कामगार फेडरेशन आयटक.