esakal | दोन्ही पाय तोडून शस्त्राने चिरला गळा; औरंगाबादमधील घटना

बोलून बातमी शोधा

crime news
दोन्ही पाय तोडून शस्त्राने चिरला गळा; औरंगाबादमधील घटना
sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज/लिंबेजळगाव (औरंगाबाद): क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याचा राग आल्याने एका २५ वर्षीय तरुणाचे दोन्ही पाय तोडून व गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना वाळूजजवळील येसगाव शिवारातील गणपती गायरानात शुक्रवारी (ता. ३०) मध्यरात्री उघडकीस आली.

जाहिरातीबाई जायफुल्या पवार (वय साठ) ही महिला येसगाव शिवारातील गणपती गायरानातील दहा एकर शेतीवर उदरनिर्वाह करते. त्यांच्या विजय पवार या मुलाचा मृत्यू झाला आहे. पालम (जि. परभणी) येथे राहत असलेला विजयचा मुलगा राहुल याला शिवा महादू पवारने सहा महिन्यांपूर्वी बोलावून घेतले व तुझ्या वडिलांची असलेली दहा एकर शेती तू घे, असे म्हणाला. त्यावर येत्या उन्हाळ्यात जमीन तुला कसण्यासाठी देऊ, असे जाहिरातीबाई यांनी सांगितले होते. मात्र, शिवा पवार याला भांडण लावायचे असल्याने तो राहुलला भडकावत होता.

हेही वाचा: Corona Updates: चिंताजनक! मराठवाड्यात कोरोनाचे २४ तासांत सात हजार रुग्ण

गुरुवारी (ता.२९) सायंकाळी चारच्या सुमारास जाहिरातीबाईचा मुलगा कल्याण पवारची आत्या विमलबाई परदेशी चव्हाण हिला कल्याण म्हणाला की, तू दारू पिऊन मुलांमध्ये बसू नको. तू तुझ्या मुलांना घेऊन तुझ्या घरी थांब. कल्याण असे बोलल्यावर तिचा मुलगा अनिस परदेशी चव्हाण याला राग आला. त्याने कल्याणला ‘तू कुठला मोठा नेता आहे का? तू माझ्या आईला येथून जा, असे का बोलतोस’ असे विचारले. त्यावर कल्याणने लाकडाने विमलबाई चव्हाण व तिची मुलगी मंदाकिनी यांना मारहाण केली. यावेळी विमलबाईने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. भांडण झाले त्यावेळी राहुल पवार, अनिस चव्हाण, केवल भोसले व पमू भोसले हे तेथे हजर होते.

हेही वाचा: महापालिकेचा फार्मासिस्ट निलंबित, रेमडेसिविर इंजेक्शन चोरी प्रकरण

राहुलने शिवा पवार यास फोन करून सांगितले की, कल्याण याने मारल्यामुळे विमलबाई बेशुद्ध पडली आहे. त्यानंतर शिवा पवार व वाळूज पोलिस घटनास्थळी आले. त्यावेळी सर्वजण तेथेच होते. थोड्याच वेळात विमलबाई चव्हाण उठून उभी राहिली. त्यानंतर पोलिस जायफुल्या पवारला चौकशीसाठी घेऊन गेले. सायंकाळी राहुल, अनिस, केवल, पमू हे वस्तीवर होते. यावेळी राहुल याने धमकी दिली की, आज तुमचे कोणीही भेटू द्या, त्याचा खूनच करेल. त्यामुळे घाबरलेली जाहिरातीबाई मुलाबाळांना घेऊन मिट्टू पवार याच्या घरी मुक्कामाला गेली. त्यानंतर वाळूज पोलिसांनी चौकशी करून जायफुल्याला सोडून दिल्याने तो रात्री उशिरा घरी आला. मात्र त्यांचा मुलगा कल्याण हा बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी जाहिरातीबाई व जायफुल्या हे गेले असता राहुल पवार याच्या वस्तीवर कल्याण पवार याचे दोन्ही हात पाय तोडून व गळा चिरून त्याला ठार मारल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी जाहिरातीबाई जायफुल्या पवार यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे करीत आहे.

हेही वाचा: वीस दिवसांनी कोरोनाबाधितांच्या यादीत नाव, रुग्णसंख्येचे आकडेवारी किती खरी?

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव-

घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्यासह सहायक पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, मीना मकवाना, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले.

चार आरोपी जेरबंद-

कल्याण पवारचा खून करून घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपींपैकी राहुल विजय पवार, अनिस परदेशी चव्हाण, केवल बंडू भोसले व शिवा महादू पवार यांना काही तासांतच वाळूज पोलिसांनी अटक केली. मात्र, पमू बंडू भोसले फरारी आहे. त्याच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे म्हणाले.