esakal | मरणानंतरही विश्रांती नाहीच! रस्ता नसल्याने मृतदेह घेण्यास नकार
sakal

बोलून बातमी शोधा

ब्राह्मणगाव तांडा (ता. पैठण) - रुग्णवाहिकेला वाट करून देताना ग्रामस्थ.

मरणानंतरही विश्रांती नाहीच! रस्ता नसल्याने मृतदेह घेण्यास नकार

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडूळ (जि.औरंगाबाद) - मृत व्यक्तीला गावात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेला रस्ताच नसल्याने संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर दोन ते तीन तासानंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके, तलाठी व ग्रामसेवकाने दोन ते तीन दिवसांत सदरील रस्त्याचे काम करून दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना ब्राह्मणगाव तांडा येथे शुक्रवारी (ता.दहा) घडली.ब्राह्मणगाव तांडा (ता. पैठण) (Paithan) येथील रहिवासी एकनाथ जाधव (वय ५५) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी त्यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पार्थिव अंत्यविधीसाठी रुग्णवाहिकेने ब्राह्मणगाव तांडा येथे आणले जात होते.

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य धक्के

रुग्णवाहिका गावात आल्यानंतर ब्राह्मणगाव तांडा येथे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर गुडघाभर पाणी होते. तसेच रस्त्यावर मोठ- मोठाली खड्डे होते. त्यामुळे रुग्णवाहिका कशी न्यावी? असा प्रश्न रुग्णवाहिका चालकाला पडला होता. दरम्यान, संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी जो पर्यंत रस्त्याचे काम सुरु होत नाही, तोपर्यंत सदरील मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा घेतला होता. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी फोनद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधून सदरील रस्त्याचे काम येत्या दोन ते तीन दिवसांत सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच ग्रामसेवक, तलाठी व पोलिसांनी मध्यस्थी करून नातेवाईक व ग्रामस्थांची समजूत काढली. यानंतर ग्रामस्थांनी स्वतः रुग्णवाहिकेला तात्पुरती वाट करून दिली.

हेही वाचा: 'शहराला नवे कारभारी लाभुदे, साचलेल्या चिखलात कमळ फुलू दे'

कामाची मुदत संपूनही रस्त्याचे काम झाले नाही

ब्राह्मणगाव ते ब्राह्मणगाव तांडा येथील रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. विशेष म्हणजे आडूळ ते ब्राह्मणगाव तांडा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तीन वर्षापासून एका गुत्तेदाराला दिलेले आहे. या कामाची गतवर्षीच मुदत संपूनही अद्यापपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पाऊस येताच ब्राह्मणगाव तांडा या गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटतो. वेळीच रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी कांताबाई राठोड, नारायण जाधव, कल्याण राठोड, लालसिंग राठोड, रमेश जाधव, विनोद राठोड, जनार्दन राठोड, कृष्णा राठोड, रमेश राठोड, सुखदेव जाधव, उपसरपंच अजीमुद्दीन शेख, संजय राठोड यांनी केली आहे.

loading image
go to top