esakal | एकुलत्या एक भावाला वाचविण्याऱ्या बहिणींनीचा लढा ठरला अपयशी, शुभेच्छाही ठरल्या तोकड्या

बोलून बातमी शोधा

null

एकुलत्या एक भावाला वाचविण्याऱ्या बहिणींनीचा लढा अपयशी, शुभेच्छाही ठरल्या तोकड्या

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : बहिणीसाठी भाऊ काहीही कष्ट उपसण्यास तयार असतो. बहिणीला सुख मिळावे यासाठी भावाने आपल्या जीवाची बाजी लावल्याची उदाहरणे आपण पाहतो. पण पाच बहिणींमध्ये असलेला एकुलता एक भाऊ कोरोनातून वाचवा यासाठी त्या पाच बहिणींनी केलेला प्रयत्न अखेर नियतीने अपयशी ठरविला. सधन घरात आपल्या बहिणींचे हात पिवळे केलेल्या भावाला शेवटी काळाने गाठले. तीनच महिन्यांपूर्वी सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात घातलेल्या सरपंचाला आपले गाव आदर्श करण्याचे पाहिलेले स्वप्न हे आपल्या पापण्यातच मिटवून घ्यावे लागले. निलंगा शहरापासून जवळच असलेल्या गुराळ या गावाच्या अशोक वाडीकर व त्यांच्या पाचही बहिणींची लढाई कोरोनाने शनिवारी (ता.२४) संपवली. पाच बहिणींचा भाऊ आणि गावाचा मुकुटमणी कोरोनाने हिसकावला.

हेही वाचा: गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे 'कोरोना'ला रोखले, गावात एकही रुग्ण पाॅझिटिव्ह नाही!

पाच बहिणींमध्ये एकच भाऊ आणि तोही गुणाने, चारित्र्याने, वागण्या बोलण्याने सर्व गावाचा लाडका. त्यांच्या गुणामुळे गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध सरपंच म्हणून गुराळ गावाच्या अशोक वाडीकर यांची निवड करण्यात आली. अशोक यांचा अनेक मोठमोठ्या राजकारण्याशी असलेला संबंध आणि गावासाठी सतत नवीन करण्याची इच्छा असल्याने ग्रामस्थांनी त्यांना सरपंच पदावर निवडले होते. अशोकच्या वडीलांनी पाचही मुली सधन घरात दिल्या आहेत. अशोकला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला. त्यांना लातूर येथील रुग्णालयात भरती केले गेले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने हैदराबाद येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीने त्यांना प्रायव्हेट अम्ब्युलन्स करून हैदराबादला घेऊन जाण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी पाचही बहिणी प्रयत्न करीत होत्या. रविवारी त्यांना हैदराबादला घेऊन जाणार असतांनाच शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणजोत मावळली आणि भावाला वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या पाच बहिणींची मेहनत नियतीने व्यर्थ ठरविली. त्यांच्या निधनाची बातमी गुराळ गावात समजताच अख्खे गाव शोकसागरात बुडाले. कोणाला विश्वासच बसत नव्हता की आपला अशोक आपल्याला असे अर्ध्यावर टाकून अशा प्रवासाला निघून गेला आहे की, तेथून तो कधीही परतणार नव्हता. कुटुंबासह गावाचा लाडका त्याच्या कुटुंबाला आणि गावाला पोरका करून गेला याचे दुःख प्रत्येकाला स्वस्थ बसू देत नाही.

हेही वाचा: जावयाने काढला सासूचा काटा, धारदार शस्त्राचे वार करुन केला खून

दीर्घायुष्याच्या शुभेच्छाही पडल्या तोकड्या

बारा दिवसांपूर्वीच अशोकाचा वाढदिवस होता. कुटुंब, गाव आणि तालुक्यातून प्रत्येकांनी त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या त्यांच्या शुभेच्छा अशोकसाठी शेवटच्या शुभेच्छा ठरतील असे कोणालाही माहिती नव्हते. गाव आणि कुटुंब अशोककडून वेगळ्या अपेक्षा ठेवत असतांना नियती मात्र कुटील डाव खेळत होती याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. अशोकच्या जाण्याचे दुःख केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर गुराळ ग्रामस्थ, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला आहे.