esakal | वीस दिवसांनी कोरोनाबाधितांच्या यादीत नाव, रुग्णसंख्येचे आकडेवारी किती खरी?

बोलून बातमी शोधा

0
वीस दिवसांनी कोरोनाबाधितांच्या यादीत नाव, रुग्णसंख्येचे आकडेवारी किती खरी?
sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात उपचारही घेतले. उपचारानंतर ते बरे झाले व त्यांना रुग्णालयातून आठ दिवसांपूर्वी सुटी देण्यात आली. शुक्रवारी (ता. ३०) आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत त्यांचे नाव आहे. तब्बल वीस दिवसांनी त्यांची नावे यादीत आली. काही रुग्णांची नावे दोनवेळा आली आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांची नावेही अजून यादीत नाहीत. यामुळे आरोग्य विभागाकडून रोज जाहीर होणारी रुग्णसंख्या किती खरी आणि किती खोटी, असा प्रश्न पडला आहे. यामुळे मोठ्या रुग्णसंख्येमुळे लोकांना वाटणारी भीती आणि कमी रुग्णसंख्येमुळे वाटणारा दिलासा फुसकाबार ठरत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने रोज सायंकाळी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जाहीर केली जाते. यात आरटीपीसीआर आणि अँटीजेन तपासणीची संख्या व त्यातून सापडलेल्या रुग्णांची संख्या दिली जाते. यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्याही जाहीर केली जाते.

हेही वाचा: तरुणाने संपवले आयुष्य; आई, पत्नी, तीन मुलींचा आधार हरपला

काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी पन्नास रुग्ण मृत्यू पावल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर मृत्यूची संख्या तीन दिवसांतील असल्याचा खुलासा द्यावा लागला. तेव्हा मृत्यूचे कारण निश्चित होण्यासाठी वेळ लागत असल्याने आजच्या मृत्यूची नोंद कधी कधी दोन दिवसांनीही होत असल्याचे उघड झाले. आता या मृत्यूसोबत रोजच्या कोरोना रुग्णांची नोंदही पंधरा ते वीस दिवसांनी उशिरा घेण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. कोरोना तपासणी करणाऱ्या सरकारी व खासगी संस्थांनी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांची माहिती त्याच दिवशी आरोग्य विभागाच्या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक संस्थांकडे ही माहिती अपलोड करण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नाहीत. काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांचा जीव वाचवायचा की त्याची माहिती अपलोड करायची, असे उलट प्रश्न आरोग्य विभागाला केले जात आहेत. यामुळे आज पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांचे नाव दोन किंवा पंधरा दिवसांनी यादीत येत आहे. काही रुग्णांची नावे तर पॉझिटिव्ह येऊनही यादीत येताना दिसत नाहीत. चुकीचे नाव, पत्ते व मोबाईल नंबर हे तर प्रकार सर्रास घडतात. यामुळे रोजच्या कोरोना आकडेवारीला किती महत्त्व द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अमेरिकेत संशोधन, भारतीय संशोधकाच्या हातात धुरा

आजची नव्हे ती कालची आकडेवारी

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून येणारी रुग्णसंख्येची माहिती ही त्या दिवसाची नव्हे तर कालची असते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी रात्री बारापासून सुरू रात्री बारापर्यंतच्या कालावधित ऑनलाइन पोर्टलवर अपलोड झालेल्या रुग्णांची माहिती दुसऱ्या दिवशी देण्यात येत असल्याचे सांगितले. तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक यांनी सकाळी दहापासून दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत चोवीस तासात नोंद झालेल्या रुग्णांची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. रुग्णांची माहिती चोवीस तासात अपलोड करायला पाहिजे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. सध्या रुग्णांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने माहितीच्या तांत्रिक बाजूकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही डॉ. पाठक यांनी आवर्जून नमूद केले.