esakal | मुरूडमध्ये जनता संचारबंदीत चार दिवसांची वाढ, रोजची रूग्णसंख्या ३५ ने घटली

बोलून बातमी शोधा

रायगडमध्ये कोरोनाबाधित आणखी सहा जण
मुरूडमध्ये जनता संचारबंदीत चार दिवसांची वाढ, रोजची रूग्णसंख्या ३५ ने घटली
sakal_logo
By
विकास गाढवे

मुरूड (जि. लातूर) : गावातील वाढती कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आठवड्याच्या जनता संचारबंदीचे सर्वांनीच कटाक्षाने पालन केले. त्याचा दृश्य परिणाम दिसून आला. रोजची पन्नास रूग्णसंख्या पंधरावर आली. यामुळे या संचारबंदीत आणखी चार दिवसांची वाढ करण्याचा निर्णय रविवारी (ता. २५) घेण्यात आला असून ही संचारबंदी आता गुरूपारपर्यंत (ता. २९) लागू राहिल, अशी माहिती सरपंच अभयसिंह नाडे यांनी दिली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपसरपंच आकाश कणसे, भाजपचे हणमंतबापू नागटिळक, शिवसेनेचे बी. एन. डोंगरे, काँग्रेसचे डॉ. दिनेश नवगिरे, डॉ. बजरंग खडबडे, नवनाथ कोपरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: जावयाने काढला सासूचा काटा, धारदार शस्त्राचे वार करुन केला खून

गावात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सोमवारपासून (ता.१८) रविवारपर्यंत (ता. २५) जनता संचारबंदी पाळण्यात आली. त्याला सर्व घटकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. याचा परिणाम रूग्णसंख्या पन्नासवरून पंधरावर आली आहे. मृत्यूदरही पाचवरून शून्य झाला. आता राहिलेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणखी चार दिवस जनता संचारबंदी पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. यातून पुढील आठवड्यात रूग्णसंख्या पाचवर येण्याची आशा आहे. रूग्णसंख्या कमी होऊन कोरानाची साखळी तुटली तरच गावातील बाजारपेठ सुरू करण्यात येणार आहे, असे श्री. नाडे यांनी सांगितले.

हेही वाचा: गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे 'कोरोना'ला रोखले, गावात एकही रुग्ण पाॅझिटिव्ह नाही!

व्यापाऱ्यांचे सक्तीने लसीकरण

एक मेपासून बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी तसेच लसीकरण सक्तीने करण्यात येणार आहे. गावात शंभर टक्के लसीकरणाचे नियोजन आहे. लसीकरणाशिवाय कोरोना नियंत्रणात येणार नाही. यामुळे एक मेपासून ग्रामपंचायतीमध्ये लसीकरणासाठी १८ वर्षांपुढील सर्वांची नोंदणी आणी लगेच लसीकरण करून घेण्यात येणार आहे. लसीकरण किंवा कोरोना चाचणी केली नसेल तर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दुकान उघडू दिले जाणार नाही, असे श्री. नाडे यांनी सांगितले.

तर ग्रामपंचायतीचा दाखला नाही      

लसीकरण न केल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने कोणताच दाखला व कागदपत्र न देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. येत्या एक ते दीड महिन्यात गावाचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे नियोजन आहे. लसीकरण न करता बाजारपेठ सुरू केल्यास पु्न्हा कोरोना साखळी तयार होऊ शकते. ग्रामीण रूग्णालयातील दहा ऑक्सिजनबेडसाठी दोन दिवसांत ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी दीड लाखाचा खर्च येणार असल्याचे श्री. नाडे यांनी सांगितले.

मुरूडचा पॅटर्न सर्वांनी राबवावा

कोरोनाच्या संकटाच्या काळात सरकारी यंत्रणेवर सर्वस्वी विसंबून रहाता ग्रामपंचायतीने आमचा गाव आमची जबाबदारीचा नारा देत दोनशे बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू केले आहे. त्यापूर्वी ग्रामीण रूग्णालयात कोरोना तपासणीसाठी मदत केली. जनता संचारबंदीला तर लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. यामुळे लोकांचा शंभर टक्के सहभाग आणि ग्रामपंचायतीच्या योगदानाशिवाय आता कोरोनाला पिटाळून लावता येणार नाही, हे सिद्ध झाले आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने मुरूड पॅटर्न राबवून गावची जबाबदारी स्वतः उचलावी, असे आवाहनही सरपंच नाडे यांनी केले आहे.