Chh. Sambhajinagar : दीडशे रुपये रोख नको, धान्यच द्या; अनुदान हस्तांतर योजनेला मिळेना लाभार्थींचा प्रतिसाद

केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबीयांना धान्याऐवजी थेट त्यांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्याची योजना राबवली जात आहे.
Chh. Sambhajinagar : दीडशे रुपये रोख नको, धान्यच द्या; अनुदान हस्तांतर योजनेला मिळेना लाभार्थींचा प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबीयांना धान्याऐवजी थेट त्यांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्याची योजना राबवली जात आहे. दर महिन्याला प्रतिलाभार्थीच्या खात्यात १५० रुपये जमा केले जातात. मात्र, अनेक शेतकरी कुटुंबीय १५० रुपयांऐवजी धान्यच द्या, अशी मागणी करत आहेत.

त्यामुळे ६४ हजार शेतकरी कुटुंबांपैकी फक्त चार हजार कुटुंबांच्या २० हजार ७१२ सदस्यांच्या बॅंक खात्यात १ कोटी ८६ लाख ४० हजार ८०० रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातून देण्यात आली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शेतकरी योजना शिधापत्रिकाधारक लाभार्थींना जानेवारी २०२३ पासून अन्नधान्याऐवजी प्रत्येक महिन्याला प्रतिलाभार्थी त्यांच्या खात्यात रोख १५० रुपये वर्ग केले जात आहेत.

या योजनेसाठी जिल्ह्यात ६४ हजार ११५ शिधापत्रिका व २ लाख ७९ हजार ४२७ नोंदीत लाभार्थी पात्र आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले आहेत.

त्यासोबत शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांची आधार कार्डची छायांकित प्रत, कुटुंबातील महिला प्रमुखांच्या बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत आणि चालूवर्षीचा सातबारा द्यावा लागत आहे.

आतापर्यंत ६४ हजारांपैकी जवळपास ४ हजार शेतकरी कुटुंबांनी अर्ज दाखल केले आहेत. रोख अनुदान वाटप योजनेसाठी शासनाकडून जिल्ह्याला ५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. ज्या शेतकरी कुटुंबांचे अर्ज परीपूर्ण आहेत, त्यांची तपासणी करून अनुदान खात्यावर जमा करण्यास जुलैपासून सुरवात झाली आहे.

जानेवारी ते जून २०२३ या महिन्यांचे १५० रुपयांप्रमाणे प्रत्येक युनिटच्या खात्यावर निधी जमा करण्यात येत आहेत. आतापर्यंत ४६६७ शिधापत्रिकांतील २० हजार ७१२ लाभार्थींच्या खात्यावर एक कोटी ८६ लाख ४० हजार ८०० रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

ज्या पद्धतीने अर्जांची तपासणी पूर्ण होईल, त्यानुसार अनुदान वर्ग करण्यात येणार आहे. रोख अनुदान योजना कार्यान्वित होईल की नाही, यांची शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आता प्रत्यक्षात खात्यावर पैसे जमा होत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी अनेक तालुक्यांतील शेतकरी कुटुंबे अद्यापही धान्यच देण्याची मागणी करीत आहेत.

परिपूर्ण अर्ज दाखल करण्याचे आवाहन

कागदपत्रांची तपासणी पूर्ण करताच अनुदान वर्ग केले जात असून, लवकरच जुलै ते डिसेंबर २०२३ या काळातील अनुदान वर्ग केले जाणार आहे. ज्या लाभार्थींनी अद्याप अर्ज दखल केले नाहीत, त्यांनी लवकर अर्ज भरून आणि कागदपत्रे जोडून संबंधित तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेमध्ये जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com