MNS Flag | औरंगाबादच्या सभेआधी मनसेने बदलला झेंडा? चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns
औरंगाबादच्या सभेआधी मनसेने बदलला झेंडा? चर्चांना उधाण

औरंगाबादच्या सभेआधी मनसेने बदलला झेंडा? चर्चांना उधाण

औरंगाबादमध्ये आज राज ठाकरे यांची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सभा होत आहे. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या या सभेच्या निमित्ताने एका वेगळ्याच विषयाची चर्चा होत आहे. हा विषय म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा. त्यामुळे पक्षाने झेंडा बदलला की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या झेंड्यांमध्ये काहीसा फरक दिसून आला आहे. या झेंड्यांमध्ये राजमुद्रेऐवजी मनसेचं चिन्ह असलेलं रेल्वे इंजिन आहे. हे पाहून राज ठाकरे आता पुन्हा झेंडा बदलणार का अशा चर्चांना उधाण आलं.

औरंगाबादेतल्या सभास्थानी लागलेला मनसेचा झेंडा

औरंगाबादेतल्या सभास्थानी लागलेला मनसेचा झेंडा

२०२० मध्ये मनसेने नव्या झेंड्याची घोषणा केली होती. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश होता. त्यानंतर प्रत्येक सभेमध्ये हाच झेंडा वापरला गेला होता. मात्र औरंगाबादच्या या सभेत वेगळेच झेंडे लावण्यात आल्याचं दिसून येत आहे.

मनसेची स्थापना झाली त्यावेळी हा झेंडा तीन रंगांचा होता. सर्वात वर निळा, तळाला हिरवा तर या दोन्हीच्या मधे भगव्या रंगाची मोठी पट्टी होती. काही काळानंतर हिंदुत्वाची कास धरत मनसेने आपला झेंडा बदलला आणि पूर्णपणे भगव्या रंगाचा नवा झेंडा पक्षाने पुढे आणला.