पदवीधर निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षकांनी दक्ष राहावे
-----
परभणी, ता. १३ : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. मतदान केंद्रावरील प्रत्येक घडामोडीचे बारकाईने निरीक्षण करून निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण सोमवारी (ता. १२) जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आणि शैलेश लाहोटी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका, जबाबदाऱ्या, निवडणूक प्रक्रियेतील बारकावे आणि मतदानाच्या वेळी घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगेवार यांनी निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, विहित कार्यपद्धती आणि मतदान प्रक्रियेच्या निरीक्षणादरम्यान करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली.
दरम्यान, प्रशिक्षणास अनुपस्थित राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. संबंधितांचा खुलासा असमाधानकारक आढळल्यास नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. निवडणुकीसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहून सोपविलेल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडाव्यात, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.