esakal | चिमुरडी खेळता-खेळता पडली शेततळ्यात,आई गेली वाचवायला पण...
sakal

बोलून बातमी शोधा

रंजना बालाजी हानवते  व आशा बालाजी हानवते

चिमुरडी खेळता-खेळता पडली शेततळ्यात,आई गेली वाचवायला पण...

sakal_logo
By
संतोष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : अवघ्या चार वर्षांची मुलगी खेळता-खेळता घराशेजारील शेततळ्यावर गेली व पाय घसरून पाण्यात पडली. आईने हे बघताच तिनेही लेकीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. दरम्यान, पोहताच येत नसल्याने दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पिंप्रीराजा (ता. औरंगाबाद) (Aurangabad) शिवारातील गट नंबर ११४ मधील शेततळ्यात गुरुवारी (ता.नऊ) दुपारी घडली. रंजना बालाजी हानवते (वय २३) व आशा बालाजी हानवते (चार वर्ष, मुळ राहणार भोसी, ता.औंढानागनाथ जि. हिंगोली, हल्ली मुक्काम पिंप्रीराजा ता. औरंगाबाद) अशी या दुर्दैवी घटनेतील मृतांची नावे आहेत. मूळचे हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील असलेले बालाजी हानवते हे पिंप्रीराजा येथे एका शेती मालकाकडे मागील चार वर्षांपासुन सालगडी म्हणून काम करतात. या शेतावरच असलेल्या खोल्यात ते पत्नी व मुलांसह राहतात. गुरुवारी दुपारी बालाजी व पत्नी हे दोघेही दोन वेगवेगळ्या शेत कामात व्यस्त होते.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021: आस्वाद बाप्पाच्या आवडत्या मोदकांचा

यावेळी त्यांची चार वर्षाची आशा ही मुलगी खेळता-खेळता शेतातच असलेल्या शेततळ्याकडे गेली. हे लक्षात आल्याने आई रंजना या तिच्याकडे धावल्या. मुलगी तो पर्यंत शेततळ्यावर गेली व यात तिचा दुर्दैवाने पाय घसरला व ती पाण्यात पडली. या घटनेची साक्षीदार ठरलेल्या आईने क्षणाचाही विलंबही न करता पाण्यात उडी घेतली.दरम्यान, रंजना यांना पोहता येत नसल्याने त्याही पाण्यात बुडाल्या. दुपारी जेवायचे म्हणून बालाजी हे घराकडे आले असता त्यांनी मोठ्या मुलास त्याच्या आई व मुलगी आशा विषयी विचारले. त्या शेतातच असतील म्हणून मुलास त्यांना बोलावुन आणण्यास पाठवले. परंतु रंजना कामावर नव्हत्या. त्यामुळे थोड्या वेळ वाट बघुन बालाजी हे स्वतः त्यांना बघायला कामाच्या ठिकाणी गेले. मात्र, रंजना व मुलगी कुठेच आढळून आल्या नाहीत. यातच शोधाशोध सुरू असताना बाजुलाच असलेल्या शेततळ्यात मुलीचा मृतदेह फुगुन वर तरंगत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा: शेअर मार्केटमधील 'भक्तीभाव'; जाणून घ्या 'नफ्याचा मोदक'

त्यामुळे आई सुध्दा शेततळ्यात असावी म्हणून गावातील तरूणांनी तलावात शोध घेतला असता रंजना यांचाही मृतदेह पाण्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तत्पूर्वी, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी सहकार्‍यांच्या मदतीने मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेबाबत संध्याकाळी उशिरा करमाड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास प्रशांत पाटील हे करित आहेत.

loading image
go to top