अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, बदनामीच्या भितीनं तोंडात बोळा कोंबून बाळाला दिलं फेकून; 'ती' निर्दयी माता सापडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baby

समाजात बदनामी होण्याच्या भितीने तिने प्रसुतीनंतर अवघ्या चार तासात बाळाने ओरडू नये म्हणून बाळाच्या तोंडात दुधाच्या कपड्याचा बोळा कोंबला.

अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, बदनामीच्या भितीनं तोंडात बोळा कोंबून बाळाला दिलं फेकून; 'ती' निर्दयी माता सापडली

छत्रपती संभाजीनगर : अनैतिक संबंधातून बाळाचा (Baby) जन्म झाल्यानंतर बदनामीच्या भितीने अवघ्या चार तासातच बाळाच्या तोंडात बोळा कोंबत चक्क पिशवीत भरुन झाडाझुडपे असलेल्या परिसरात फेकून दिल्याचा प्रकार २५ मेरोजी क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडला होता.

याप्रकरणी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आसपासचा हायप्रोफाईल एरिया असल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला मात्र काही माग निघत नव्हता, अखेर पोलिसांनी (Police) सीसीटीव्हीच्याच मदतीने माग काढत बाळाला फेकून देणाऱ्या महिलेचा शोध घेतला आहे.

तिला बाल न्यायमंडळासमोर हजर केले असता, बाळाचे, सदर माता पित्याचे डीएनए जुळणीसाठी नमुने घेण्याचे आदेश दिल्याची माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली. तीनेही सदर कृत्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मेरोजी रात्री हा प्रकार उघडकीस आला होता.

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता, घटनेच्या २० मिनीटे आधी म्हणजेच आठ वाजून २० मिनीटांनी पिवळा ड्रेस घातलेली एक महिला मंडीतून पिशवीत भाजीपाला घेऊन यावा तसे बाळाला एका पिशवीत टाकून घेऊन जाताना पोलिसांना दिसली.

दरम्यान, दुसऱ्या रिक्षात बसून ती समतानगर परिसराकडे जाताना एका सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यावरुन माग काढत पोलिस तिच्या घरापर्यंत पोहोचले. पोलिस त्या भागात दोन तीनदा आल्याचे तीने पाहिले, अन् तीला पोलिस आपल्या मागावर असल्याची भणक लागली होती. त्यामुळे तीने चिकलठाणा भागातील नातेवाईकांकडे बस्तान बसविले होते. मात्र पोलिसांना सदर महिला गायब असल्याने तीच महिला आरोपी असल्याचा संशय बळावला आणि ती शहरातील तिच्या घरी येताच पोलिसांनी माहिती मिळवत तीचे घर गाठले.

तिला पोलिसांनी विश्वासात घेताच तीने कृत्याची कबुली दिली. आरोपी महिलेचे आई वडील वारलेले असून काही वर्षापूर्वी तिचा पतीही लग्नानंतर सहा महिन्यांतच वारला आहे. तेव्हापासून सदर महिला ही धुणीभांडी करुन एकटी राहते. दरम्यान त्याच परिसरात एका ४७ वर्षीय पुरुषासोबत तीचे सूत जुळले. त्या पुरुषाला चार बायका आहेत. २५ मेरोजी सदर आरोपी महिला प्रसूत झाली तेव्हा तो पुरुष मुंबईला दुसऱ्या पत्नीकडे होता.

दरम्यान, समाजात बदनामी होण्याच्या भितीने तिने प्रसुतीनंतर अवघ्या चार तासात बाळाने ओरडू नये म्हणून बाळाच्या तोंडात दुधाच्या कपड्याचा बोळा कोंबला आणि कोटला कॉलनीतील शनिमंदीर परिसराजवळ झाडाझुडपाच्या भागात बाळाला टाकून दिल्याची कबुली महिलेने दिली. ही कारवाई क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक डॉ. विशाल इंगळे, अंमलदार शरद देशमुख, राम वाणी, नेहा वायभट यांच्या पथकाने केली.